रियाज अकबर अली

59

<<दुर्गेश आखाडे>>

मित्रमंडळींबरोबर कॅरम खेळता खेळता त्याचे स्ट्रायकरशी नाते जुळलं. कॅरमच्या आवडीने तो जिल्हास्तरावरच्या स्पर्धेत सहभाग घेऊ लागला. छोटय़ा स्पर्धांमधूनच विजेतेपदावर नाव कोरत रत्नागिरीच्या या रियाज अकबर अलीने जागतिक स्तरावर झेप घेतली. रत्नागिरीसारख्या छोटय़ाशा शहरातून सुरुवातीला जिह्याचे, नंतर महाराष्ट्राचे आणि पुढे देशाचे प्रतिनिधित्व रियाज करू लागला. लहानपणी मित्रांसोबत कॅरम खेळाणाऱ्या रियाजला कॅरमची आवड निर्माण झाली.वयाच्या ११ व्या वर्षी त्याने सर्वप्रथम जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सहभाग घेतला. १९९४ च्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत रियाजने पहिल्यांदा विजेतेपद पटकावले त्यानंतर रियाजने मागे वळून पाहिले नाही रत्नागिरी जिह्यातील कॅरम खेळात रियाज अकबर अली या नावाचा दबदबा निर्माण झाला. १९९१ ते२००९ याकाळात त्याने ६० वेळा जिल्हास्तरीय स्पर्धांची विजेतीपदे पटकावली. २००७ मध्ये पहिल्यांदा रियाज अकबर अली महाराष्ट्र कॅरम अंजिक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला. या विजयाची पुनरावृत्ती त्याने २०१५ मध्ये केली. २०१० नंतर रियाजने मुंबई कॅरम जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरुवात करताना रत्नागिरीनंतर मुंबईतही त्याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला. २०१० मध्ये त्याने मुंबईतील तीन कॅरम स्पर्धांत विजेतेपद पटकावले. २०१४ पासून राष्ट्रीय स्पर्धेतून त्याने आपल्या खेळाची चमक दाखवली. २०१४ मध्ये त्याने फेडरेशन कपमध्ये विजेतेपद पटकावले. २०१४ आणि २०१५ मध्ये आंतरविभागीय कॅरम स्पर्धेचा तो विजेता बनला. २०१६ मध्ये राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत उपविजेतेपदावर त्याला समाधान मानावे लागले. २०१४ आणि २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत त्याने हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. चमकदार कामगिरीच्या जोरावर २०१५ मध्ये तो हिंदुस्थानचे क्रमांक एकचे मानांकन मिळाले. २०१७ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत त्याला पुन्हा एकदा विजेतेपदाने हुलकावणी दिली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये रियाज अकबर अली याने आपली गुणवत्ता सिद्ध करत एक कारकीर्दीतील महत्त्वाकांक्षी टप्पा गाठला. २०१४ मध्ये मालदीव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत रियाज अकबर अली याने हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळी हिंदुस्थानच्या संघाने सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले होते. २०१५ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रियाजने विजेतेपद पटकावताना हिंदुस्थानला सांघिक सुवर्णपदक पटकावून दिले. या विजेतेपदाबरोबरच रियाज अकबर अलीने जागतिक स्तरावर प्रथम मानांकन पटकावले. २०१६ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही रियाजने चांगला खेळ केला. या स्पर्धेतही हिंदुस्थानने सांघिक सुवर्णपदक पटकावले. गेल्या २५ वर्षांत कॅरम खेळात रियाज अकबर अली ही आपली ओळख निर्माण करणाऱ्या रियाजने मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही प्राप्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या