>> दुष्यंत पाटील
कुडालीनं लोकसंगीत जतन करण्याचं काम सुरू केलं. तो थेट गॅलांटाला गेला आणि तिथं त्यानं जवळपास एकशे पन्नास लोकगीतं रेकॉर्ड केली. कुडालीनं बालपणी गॅलांटामध्ये ऐकलेल्या लोकसंगीतातल्या चाली घेऊन पूर्ण ऑर्केस्ट्रासाठी समृद्ध असं संगीत रचलं. हेच संगीत ‘डान्सेस ऑफ गॅलांटा’ म्हणून ओळखलं जातं. हंगेरीच्या लोकसंगीताचा गंध असणारं हे संगीत आजही ऐकलं जातं.
कुडालीनं आपल्या बालपणीची सहा-सात वर्षे पश्चिम हंगेरीमधल्या एका छोटय़ाशा खेडेगावात काढली. या खेडेगावाचं नाव होतं ‘गॅलांटा’. गॅलांटामध्ये कुडालीनं बरंचसं लोकसंगीत, पारंपरिक नृत्यांचं संगीत ऐकलं. वयाच्या तिसऱया वर्षापासून ते दहाव्या वर्षापर्यंत तो गॅलांटामध्ये होता, पण इतक्या लहान वयात ऐकलेल्या संगीताचा त्याच्यावर जन्मभर प्रभाव राहिला. कुडालीचे वडील हौशी व्हायोलिन वादक होते, तर आई निष्णात पियानो वादक आणि गायिका होती. त्यामुळे त्याला घरी क्लासिकल संगीत ऐकायला मिळायचं. बाहेर इतरांकडून तिथली पारंपरिक लोकगीतं ऐकायला मिळायची. या लोकगीतांमध्ये, संगीतात हंगेरीमधल्या ग्रामीण जीवनाचा गंध होता. गावामध्ये एक जिप्सी बँडही होता.
कुडाली दहा वर्षांचा असेपर्यंतच गॅलांटामध्ये होता. गॅलांटा सोडल्यानंतरही लोकसंगीतावरचं त्याचं प्रेम तसंच होतं. तो 13 वर्षांचा असताना त्यानं बेला विकार नावाच्या माणसाविषयी ऐकलं. विकारनं फोनोग्राफचा वापर करत हंगेरियन लोकसंगीताचं रेकॉर्डिंग केलं होतं. लोकसंगीतावरच्या प्रेमामुळे विकारच्या कामाविषयी कुडालीला प्रचंड कुतूहल निर्माण झालं. त्यानं रेकॉर्ड झालेलं संगीत ऐकायला सुरुवात केली. घरी संगीताचं वातावरण असल्यानं त्याला लिहिलेलं संगीत वाचायलाही येत होतंच. मग तो रेकॉर्ड झालेलं लोकसंगीत आणि लिहिलं गेलेलं लोकसंगीत यांची तुलना करायला लागला. त्यांच्यात काहीच फरक नसावा अशी त्याची अपेक्षा होती, पण झालं उलटंच! त्याला लिहिल्या गेलेल्या संगीतात अनेक त्रुटी आढळल्या. मग हंगेरीचं लोकसंगीत काहीही भेसळ न होऊ देता नवं तंत्रज्ञान वापरत जतन करण्याचा त्यानं निश्चयच केला.
कुडाली विकारला जाऊन भेटला. फोनोग्राफचा वापर करून संगीत कसं रेकॉर्ड करायचं हे तो विकारकडून शिकला. याच काळात कुडालीची ओळख बेला बर्टोक याच्याशी झाली. या दोघांनाही हंगेरीच्या पारंपरिक संगीताला असणाऱया धोक्याची नीट जाणीव होती. हंगेरीच्या संस्कृतीवरही परकीय संस्कृतीचा प्रभाव वाढत चालला होता. याशिवाय आधुनिकीकरणाचाही लोकसंगीताला धोका होताच. त्यामुळे हंगेरीचं लोकसंगीत लुप्त होण्याची शक्यता होती. म्हणूनच बर्टोक आणि कुडाली यांना तिथलं लोकसंगीत जतन करण्यासाठी काहीतरी भरीव काम करायचं होतं.
वयाच्या तेविसाव्या वर्षी कुडालीनं लोकसंगीत जतन करण्याचं काम सुरू केलं. तो थेट गॅलांटाला गेला आणि तिथं त्यानं जवळपास एकशे पन्नास लोकगीतं रेकॉर्ड केली! कधी शेतात काम करणाऱया स्त्रियांची लोकगीतं, तर कधी रस्त्यानं जाणाऱया लोकांना ‘ड्रिंक’साठी आमंत्रित करून त्यांच्याकडून गाऊन घेतलेली लोकगीतं त्यानं रेकॉर्ड केली.
कुडालीनं जतन केलेल्या संगीतापैकी बरंचसं संगीत हे लोकनृत्यांसाठीचं संगीत होतं. पुढे कुडालीनं लोकसंगीतावर पीएच. डी. केली. कुडालीनं बर्टोकसहित प्रचंड प्रमाणात लोकसंगीत रेकॉर्ड केलं. लोकगीतांचे शब्द, ज्या विशिष्ट प्रसंगी ते लोकसंगीत वापरलं जायचं त्याविषयीचे तपशील, एकाच प्रकारच्या लोकसंगीतात जागोजागी होत जाणारे छोटे-मोठे बदल या सगळ्याच्या कुडालीनं बारकाईनं नोंदी घेतल्या. एक प्रकारे त्यानं हंगेरियन पारंपरिक संगीत ‘जसंच्या तसं’ जतन करण्याचा प्रयत्न केला. संगीत जतन करतानाच या लोकसंगीतातले बारकावे आणि युरोपच्या क्लासिकल संगीतापेक्षा असणारं त्यातलं वेगळेपण यांचाही त्यानं सखोल अभ्यास केला.
हंगेरीच्या सर्वात जुन्या असणाऱया ‘बुडापेस्ट फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा’ला ऐंशी वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 1933 मध्ये कुडालीला खास संगीत रचण्यास सांगितलं गेलं. मग कुडालीनं बालपणी गॅलांटामध्ये ऐकलेल्या लोकसंगीतातल्या चाली घेऊन पूर्ण ऑर्केस्ट्रासाठी समृद्ध असं संगीत रचलं ! हेच संगीत ‘डान्सेस ऑफ गॅलांटा’ म्हणून ओळखलं जातं. हंगेरीच्या लोकसंगीताचा गंध असणारं हे संगीत आजही ऐकलं जातं. या संगीताचा आस्वाद घेण्यासाठी आपण यूटय़ूबवर ‘Dances of Galanta’ असा शोध घेऊन त्याचं संगीत ऐकू या.