सीमोल्लंघनातील सुरक्षितता

>> डॉ.चंद्रकांत शंकर कुलकर्णी

‘दसऱयाचे वेगळेपण सीमोल्लंघनाच्या संकल्पनेत आहे. तिचे महत्त्व ओळखणाऱयांनी प्रगती साधली. नकारात्मक विचारांची जळमटे झटकून तशी वाटचाल करणे प्रगतीसाठी आवश्यक आहे. आजचे सीमोल्लंघन कोरोनाच्या भीतीयुक्त दाट छायेत साजरे होत आहे. संसर्ग पसरू नये म्हणून जी खबरदारी घेतली तेवढी घेतली तरी पुरेसे आहे.’

दैनंदिन आयुष्याच्या रहाटगाडग्यात काही आनंदक्षण फुलवावेत, हेच तर सण आणि उत्सवांचे प्रयोजन असते. समाजाशी आणि निसर्गाशी असलेले नाते घट्ट करणाऱया उत्सवश्रीमंतीतही दसऱयाचा दिमाख काही वेगळाच. तसा तो अनोखा वाटतो तो त्यातल्या कृतज्ञतेच्या मूल्यामुळे. ज्याला जीव नाही अशा यात्राविषयीही आपलेपण व्यक्त केलं जातं ही भावनाच किती उदात्त आहे!

‘सीमोल्लंघना’च्या संकल्पनेवर तर दसऱयाला वेगळीच झळाळी मिळवून दिली आहे. गावाची वेस ओलांडण्यापासून विचार करण्याच्या पद्धतीतील क्रांतीपर्यंत सगळे आपल्या पोटात सामावून घेण्याची या संकल्पनेची ताकद आहे. ती जेव्हा जेव्हा ओळखली गेली तेव्हा तेव्हा समाजाने पराक्रम केला, काही मानदंड निर्माण केले आणि जेव्हा फक्त घोकंपट्टी केली तेव्हा मात्र सीमोल्लंघन उपचारापुरते उरले अन् जीवनाचे एक साचलेले डबके बनले.

‘मळ्यास माझ्या कुंपण पडले अगदी मला न साहे,’ असे एखादे केशवसुत म्हणून जातात. ‘करी मी जुलमाचे तुकडे तुकडे,’ असेही ते बजावतात. सर्वसामान्य माणसे मात्र या कुंपणानाच घट्ट धरून बसतात. त्यात त्यांना सुरक्षित वाटते. सभोवतालची परिस्थिती पाहता कधी नव्हे एवढी सीमोल्लंघनाची गरज आज निर्माण झाली आहे. ऐतिहासिक काळात दसऱयाच्या सीमोल्लंघनाला सैनिकी संदर्भ होता.

शस्त्रास्त्र घासूनपुसून आणि पुजून सैनिक गावाची, राज्याची हद्द ओलांडत असत. माणसाचे आयुष्य आधुनिक काळात अनेक पदरी आणि व्यामिश्र झाले आहे त्यामुळे अर्थातच आजच्या सीमोल्लंघनाचे स्वरूपही बहुविध असणार आहे. सीमा म्हंटले की, आपल्या डोळ्यांसमोर पहिल्यांदा येतात देशाच्या सीमा (बऱयाचदा त्यांचे उल्लंघन आपले शेजारी देशच करत असतात ही गोष्ट वेगळी), परंतु काळजी फक्त या सीमांचीच नाही. आपल्या मनातही अनेक सरहद्दी वस्तीला असतात.

मनात उसळणारे प्रत्येक क्षण नव्या कल्पनेचे कारंजे त्या अडवतात. नव्या संकल्पनाना बांध घालतात. संभाव्य परिणामांचा खल करीत बसतात. जागतिकीकरणाने सगळ्या खिडक्या-दारे आधीच उघडल्या आहेत. या मोकळेपणाचे, स्वातंत्र्याचे स्वागत करीत आणि येणारे भन्नाट वारे शिडात भरून घेत दमदार वाटचाल कारण्याचा अद्यापही धीर होत नाही. पूर्वी समुद्रबंदीची बेडी आपणच आपल्या पायात घालून घेतली होती. आता ती नसली तरी मनातील अनेक दृश्य-अदृश्य बांध मागे खेचताहेत.

सीमोल्लंघन म्हणजे अर्थातच या सर्व अडथळ्यांना पार करणे. आजचे सीमोल्लंघन म्हणजे ‘विकसनशीलतेकडून’ ‘विकसित’ या प्रतिमेकडे जाणे उसनवारीकडून स्वनिर्मितीकडे जाणे, चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून गांधी तत्त्वप्रणालीतील सूतोवाच ‘स्वदेशी मालाचा स्वीकार करणे’ होय.’ आपणच निर्माण केलेल्या रूढी-संकेतांच्या, पूर्व गृहितांच्या आणि ठोकळेबाज सिद्धांताच्या जोखंडातून स्वतःची सुटका करून घेण्याला दसऱयासारखे दुसरे निमित्त कोणते मिळणार? एकीकडे कोरोनाने आपलं जीवनच असह्य केलंय इतके की सण आणि उत्सवातील आनंदच त्यानं आपल्याकडून हिरावून घेतलाय तर दुसरीकडे विज्ञानाच्या प्रांतात शास्त्रज्ञ जणू काही रोजच्या रोज सीमोल्लंघनच करत आहेत.

एकेकाळी निसर्गातील छोटे-छोटे बदलही दैवाधीन असल्याचे मानणारा माणूस आज मात्र या बदलामागचा कार्यकारणभाव जाणून घेत प्रतिसृष्टीच तयार करण्याच्या खटपटीत आहे. पण या प्रगतीला जर सामाजिक बंधुभावाची जोड दिली नाही तर संस्कृतीचे तारू विध्वंसाच्या खडकावर फुटल्याशिवाय राहणार नाही. तसे होऊ नये यासाठी स्नेहबंधाचे धागे बळकट करण्याचे काम दसऱयासारखे सण करीत असतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या