
गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा पकडण्यात आला आहे. 17 सप्टेंबर रोजी गुजरातमधील मुंद्रा बंदरात 3 हजार किलो हेरॉईन पकडण्यात आले होते. ज्याची किंमत किमान 21 हजार कोटी रुपये होती. या घटनेला 2 महिने पूर्ण व्हायच्या आतच गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हे अंमली पदार्थ पाकिस्तानमधून आणण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी सकाळी पोलिसांना एका आरोपीकडे अंमली पदार्थांची 19 पाकिटं सापडली होती. या आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जी कारवाई केली त्यात त्यांना ड्रग्जची आणखी 47 पाकिटं मिळाली होती.
पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की सज्जाद धोसी (44 वर्षे) नावाचा एक आरोपी अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आला आहे. पोलीस त्याच्या मागावर होते. सज्जादला पकडल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 6.6 किलोचं मेथामेफ्टामाईन आणि 11.4 किलोचं हेरॉईन सापडलं. 3 बॅगांमध्ये लपवून तो हे ड्रग्ज नेत होता. सज्जादकडे सापडलेल्या ड्रग्जची किंमत ही 88 कोटी रुपये इतकी आहे. सज्जाद हा मुंब्र्याचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपण भाजी विक्रेते असल्याचं सज्जादने पोलिसांना सांगितलं आहे. सलीम याकूब कारा आणि अली याकूब कारा या दोघांकडून आपल्याला ड्रग्ज मिळाल्याचे सज्जादने सांगितले. हे दोघे जामनगरजवळच्या सालाया शहरात राहातात. पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा मारला असता त्यांना तिथे ड्रग्जची 47 पाकिटं सापडली होती. या पाकिटांमधील घटक हे अंमली पदार्थच असल्याची खातरजमा पॉरेन्सिक दलाने केली आहे. धोसी हा अट्टल गुन्हेगार असून खुनाच्या आरोपाखाली तो यापूर्वी तुरुंगात जाऊन आला असल्याचं राजकोट परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप सिंह यांनी सांगितलं. तर सलीम कारा याविरोधात यापूर्वी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी, बनावट नोटा प्रकरणी आणि शस्त्र कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे.