सकाळी आणि दुपारी शेपूट देवमाशाचे झाले!

द्वारकानाथ संझगिरी

ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानी फलंदाजीचं ‘धड’ धडधडलं नाही; पण तिसऱ्या दिवशी सकाळी आणि दुपारी शेपूट देवमाशाचं झालं.

हार्दिक पंडय़ा गेला. अश्विन गेला. विहारी आला… रवींद्र जाडेजा आला आणि पापलेटचं शेपूट देवमाशाचं झालं. बुडाखालची खुर्ची हलू शकते याची जाणीव झाल्यावर सर्वच टिच्चून खेळतात. विहारीचं पदार्पण हे आगीतलं पदार्पण होतं. पॅव्हेलियनमधून तो निखाऱ्यावरून चालत खेळपट्टीवर आला. नायरवर झालेल्या अन्यायामुळे विहारीवर जबाबदारी वाढली होती. चेंडू भन्नाट स्विंग होत होता आणि अॅण्डरसनच्या चेंडूच्या अंगात वारं आलं होतं. पुजाराला विचारा ते ‘पिसाटवारं’ कसं होतं? त्याच्या बॅटने त्याला कधी तोंडघशी पाडलं कळलंच नाही. रहाणेने खेळलेल्या आठ चेंडूंनी त्याला गेल्या कसोटीत मिळालेला आत्मविश्वास संपवला. ऑफस्टंपपासून दूर असलेल्या चेंडूवर त्याची बॅट अगतिकपणे खेचली गेली. त्यानंतर विहारी आला. त्याला ही आग जास्त जाणवली. कारण या स्तरावर तो प्रथमच खेळत होता. त्या काळातला त्याचा बचाव कागदी बचाव वाटला. त्याचा हूक हे डेस्परेट झाल्याचं दृश्य होतं. तो कसाबसा तरला. त्याला चटके बसले, पण त्यावर निभावलं. पण तिसऱ्या दिवशी सकाळचा विहारी वेगळा होता. थरथरणारे पाय आणि हात स्थिर झाले होते. चेंडूच्या तो जवळ जाऊन खेळत होता. त्याचे पाय योग्य तऱहेने हलत होते. मोईन अलीला त्याने चांगले स्वीप मारले. त्याला झेलबाद दिलं गेलं तेव्हा तो थोडा कमनशिबी वाटला. आजच्या तंत्रज्ञानात बॅट चेंडूला लागलीय की पॅडला हे शंभर टक्के कळणं कठीण असतं. अशा वेळी संशयाचा फायदा फलंदाजाकडे जायला हवा.

पण विहारी-जाडेजा जोडीने लढण्याची जिद्द दाखवली. जाडेजा तर जोस बटलरचा गंडा बांधल्यासारखा खेळला. विशेषतः बुमराबरोबर शेवटच्या विकेटची भागीदारी करताना. नव्या चेंडूने गोलंदाजी टाकणाऱ्या अॅण्डरसनला त्याने ‘झोडपला’ असे म्हणावे लागेल. बुलफायटरच्या थाटात त्याने मदमस्त अॅण्डरसनची शिंगं पकडली.

काही छोटय़ा पण सुंदर लढाया त्यामुळे पाहायला मिळाल्या. 2014 साली कोहलीला दाती तृण (खरं तर बॅट) धरून शरण आणणाऱ्या अॅण्डरसनला त्याने या मालिकेत एकदाही विकेट दिली नाही. अगदी रशिदसकट सर्व महत्त्वाच्या गोलंदाजांनी कोहलीची विकेट घेतली; पण अॅण्डरसनला मिळाली नाही. त्याच्या गोलंदाजीवर विराटचे सोपे झेल चुकले. अनंत वेळा विराटची बॅट अॅण्डरसनच्या चेंडूबरोबर आंधळी कोशिंबीर खेळली. काही पायचीतचे निर्णय केवळ दुर्दैव म्हणून अॅण्डरसनच्या विरोधात गेले. ओव्हलवर अॅण्डरसनने कोहलीला भन्नाट स्पेल टाकला. एकदा तो पायचीत झाला; पण पंच आणि तंत्रज्ञान यांनी कोहलीला वाचवलं. त्यानंतर अॅण्डरसनच्या डोक्यावरचा बर्फ वितळला. इतकं त्याचं डोकं गरम झालं. त्याने राग पंचांवर काढला, पण त्याची झळ पुजारा-रहाणेला लागली. कदाचित नियतीला 2014 साली अॅण्डरसनला अगदीच झुकतं माप दिलं त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं असेल.

पण सध्या अॅण्डरसनचे लढाई हरण्याचे दिवस आहेत. 2014 सालीही त्याच्यात आणि जाडेजात लढाई झाली. इथे अॅण्डरसनच्या हातात नवा चेंडू होता, पण जाडेजा सेट होता. बरोबर अकरावा फलंदाज होता. त्यामुळे बॅट फिरवणे ही काळाची गरज होती. अॅण्डरसनला त्याने सरळ षटकार मारला. त्याला जखमेवर मीठ चोळणं नाही, त्याला फोडणी देणं म्हणतात. अॅण्डरसन ग्लेन मॅग्रापासून फक्त दोन विकेट्स… पावलं म्हणू आपण हवं तर उभा आहे. तीन पावले चालली की तो इतिहासातला सर्वात जास्त बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरू शकतो. त्यातली दोन पावलं ही विराट-जाडेजाच्या जोडीने चालणे त्याला आवडलं असतं.

तिसरी लढत ही तितकीच आकर्षक होती. पूर्वी तळाच्या फलंदाजाला, म्हणजे गोलंदाजाला बाऊन्सर टाकणं हे अनैतिक मानलं जायचं. आता नीतिमत्ता बदलली. ब्रॉडला बुमराचा बाऊन्सर हेल्मेटवर लागला. ब्रॉड खरं तर अशा आघाताच्या दुःखातून पूर्वीच गेलाय. 2014 साली त्याचं तोंड हिंदुस्थानच्या वरुण अॅरॉनने  फोडलं. त्याला चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी त्याला सायकॉलॉजिस्टला भेटावं लागलं. त्यानंतर त्याची फलंदाजीची 24ची सरासरी 13वर आली. पण बुमराच्या आघाताने तो कोलमडला नाही. त्याने काल बुमरा फलंदाजीला आल्यावर बाऊन्सरच्या पायघडय़ा घातल्या. बुमराचं मोठेपण हे की तो त्या पायघडय़ांवरून रुबाबात चालत गेला. दोन संघांमधला धावांचा फरक कमी कमी होत गेला आणि शेवटी तो धावचीत झाला. आपली विकेट त्याने ब्रॉडला दिली नाही.या अशाच काही क्षणांमुळे ही कंटाळवाणी मॅच पाहावीशी वाटते.