आता, ताठ मानेने रांचीला जाऊ

द्वारकानाथ संझगिरी

बंगळुरू कसोटीत हिंदुस्थानी संघ पुन्हा एकदा पराभवाच्या छायेतून प्रिंगसारखा उसळला. अचानक वाळवंटात बाग फुलली. विराट कोहलीच्या संघाने कणा दाखवला. ते मला फार महत्त्वाचं वाटतं.

या कसोटीच्या पहिल्या दिवशी टॉस जिंकून हिंदुस्थानने जी फलंदाजी केली, त्याला फलंदाजीपेक्षा ‘पळंदाजी’ हा शब्द योग्य ठरला असता. राहुल सोडून खेळपट्टीवर पेइंगगेस्ट म्हणून राहायला जायचीही कुणाची इच्छा दिसली नाही. विराट कोहलीची चेंडू सोडताना दुसऱ्यांदा जजमेंट चुकावी याचा अचंबा वाटला. नाथन लॉयनने अप्रतिम टप्पा, दिशा ठेवली आणि चेंडू उसळवला. कारण तो चेंडूला खऱ्या अर्थाने फिरकी देतो. पण तरीही हिंदुस्थानी संघ जीम लेकर किंवा प्रसन्नासमोर खराब खेळपट्टीवर फलंदाजी करत नव्हता. खेळपट्टी परीक्षा पाहणारी होती, पण न खेळता येण्याजोगी मुळीच नव्हती.

दुसऱया दिवशी हिंदुस्थानी गोलंदाजीनी टिच्चून गोलंदाजी केली. अश्विन-जाडेजाने या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करण्याची अपेक्षाच होती. पण इशांत-यादवने रिव्हर्स स्विंग, उत्कृष्ट टप्पा, दिशा आणि वेगाचे प्रदर्शन केले. हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज हिंदुस्थानात ‘विकेटटेकर’ वाटायला लागले. पण त्याचबरोबर नवख्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी एक वेगळा पैलू दाखवला. त्यांनी त्यांचा नैसर्गिक आक्रमक स्वभाव बाजूला ठेवला आणि नांगर टाकण्याची क्षमता दाखवली. त्यामुळेच त्यांना ८७ धावांची आघाडी मिळाली, जी त्या क्षणी बहुमोल वगैरे वाटली. कोहलीने अश्विनवर अतिविश्वास टाकून जाडेजाला कमी षटकं दिली ते खटकले; पण तिसऱया दिवशी जाडेजानेच सहा विकेट्स मिळवून ती चूक विराट कोहलीला दाखवून दिली.

तिसऱया दिवशी पुन्हा चांगली खेळी खेळून एका ग्रेट कॅचवर राहुल बाद झाला. तोपर्यंत तो अशा रीतीने खेळत होता की, तो इतरांपेक्षा वेगळ्या खेळपट्टीवर फलंदाजी करतोय. त्यानंतर विराट गेला आणि तानाजी कोसळल्याची भावना झाली. पराभवाच्या रखरखीत वाळवंटात हिंदुस्थानी संघ उभा आहे असं वाटलं. अचानक दोन माळी उभे राहिले. त्यांनी वाळवंटात बाग फुलवली. एक पुजारा, दुसरा रहाणे! या दोघांनी शेलारमामाची भूमिका बजावली. सुरुवातीला पुजारा दही खाऊन आला होता. ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक पुनः पुन्हा त्याच्या हातावर दही ठेवत होते. त्यावेळी राहुलने स्ट्राइक स्वतःकडे घेतला; पण नंतर पुजारा-रहाणेने ऑफस्टंपवर स्टान्स घेतला आणि ऑफस्टंप आणि ऑफस्टंपच्या बाहेर मारा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर हळूहळू वर्चस्व मिळवले. रहाणेसाठी ही खेळी महत्त्वाची होती. त्यांनी एकेरी-दुहेरी धावा वेगात घेतल्या. अधूनमधून सावधपणे आक्रमण केले आणि बाग फुलली.

चौथ्या दिवशी सकाळी नव्या चेंडूचे वादळ आले; पण तोपर्यंत आघाडी २००च्या जवळ आली होती. मला स्वतःला फुललेली बाग कोमेजणार नाही याची खात्री होती. कारण चौथ्या डावात १८८ धावांचा पाठलाग सोपा नव्हता. त्याला अनेक कारणं होती. एक म्हणजे ही ऑस्ट्रेलियन फलंदाजी अननुभवी आहे. वॉर्नर स्मिथ या विकेट्स महत्त्वाच्या होत्या. वीस वर्षांचा रेनशॉ चाळीस वर्षांच्या माणसाचं डोकं असल्यासारखा खेळतो; पण तो पटकन सापडला. पहिल्या कसोटीत स्मिथला आपण इतकी दया दाखवली की, तेवढी पृथ्वीराज चौहाननेही महमद घोरीला दाखवली नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे, चेंडूचं उसळणं, मार्गक्रमण हे गोलंदाजापेक्षा खेळपट्टीच्या लहरीवर जास्त अवलंबून होतं. चेंडूचा वात्रटपणा चौथ्या दिवशी वाढला होता. आपल्या गोलंदाजांनी योग्य जागी टप्पा टाकणं आणि स्वस्त धावा न देणं तेव्हढं महत्त्वाचं होतं. या दोन्ही गोष्टी आपल्या गोलंदाजांनी केल्या. अश्विनने तर सर्वस्व पणाला लागल्यासारखी गोलंदाजी केली. आणि दोन आश्चर्यकारक गोष्टी घडल्या. एक म्हणजे, ऑस्ट्रेलियाचं डीआरएसचं जजमेंट चुकलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे, फॉर दि चेंज हिंदुस्थानी क्षेत्ररक्षकांनी झेल घेतले. पराभवाच्या नजरेला नजर देत फलंदाजी करणे ऑस्ट्रेलियाला जमली नाही आणि हिंदुस्थानी गोलंदाजांनी आपली पकड सुटू दिली नाही. त्यामुळे उंच मानेने आणि ताठ कण्याने हिंदुस्थानी संघ रांचीला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या