फादर्स डे! टीम इंडियाने पाकिस्तानला चिरडले

द्वारकानाथ संझगिरी

हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानला 89 धावांनी हरवलं असं म्हणणं हा परिस्थितीचा विपर्यास होईल.चिरडलं, गाडलं, उद्ध्वस्त केलं. अहंकाराचा चक्काचूर केला असं म्हणणं परिस्थितीच्या जवळ जाणं ठरेल. हिंदुस्थानने खऱया अर्थाने ‘फादर्स डे’ साजरा करीत मागच्या वर्षीच्या ‘फादर्स डे’च्या पराभवाचा पुरेपूर वचपा यंदा काढला.

त्यांना नेस्तनाबूत करणारा माणूस रोहित शर्मा होता. इंग्रजीत एक म्हण आहे. ‘‘First strok is half the battle’’ रोहित शर्माने फक्त अर्धी लढाई जिंकली नाही. जवळजवळ सर्वच लढाई जिंकली. त्याच्या 113 चेंडूंतल्या लखलखत्या 140 धावांनंतर पाकिस्तानी संघ पराभवाच्या काळय़ा छायेतच वावरत होता. त्यांच्या खेळात धुगधुगी फक्त होती. चैतन्य नव्हतं. बाबर आणि फखर जमानच्या शतकी भागिदारीने एक उजेडाची तिरीप त्या काळोखात शिरली होती. पण कुलदीपच्या चायनामनने तीसुद्धा गेली. तो चायनामन कसला? ते भुईचक्र होतं. बाबरसारख्या सेट झालेल्या गुणी फलंदाजाला त्याने बचाव करताना चारीमुंडय़ा चीत केलं. पाकिस्तानी संघ त्यांच्या कोसळण्याच्या गुणधर्माला जागला.

पाऊस, सावळे ढग त्यामुळे स्विंग होणारे चेंडू, डकवर्थ-लुईसची लुडबुड यावेळी टॉस महत्त्वाचा ठरणार असं इम्रान खान सोडून सर्वजण म्हणत होते. इम्रानने पाकिस्तानी संघाला फोन करून टॉस जिंकल्यावर पहिली फलंदाजी घ्यायचा सल्ला दिला. पाकिस्तानी संघाने तो मानला नाही. कदाचित त्यांना तसा निर्णय म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱहाड मारून घेणं वाटलं असेल. विराटनेही म्हटलं की, तो टॉस जिंकला असता तर त्याने क्षेत्ररक्षण घेतलं असतं. पण पाकिस्तानचा आणि कुऱहाडीचा संबंध तिथेच संपला नाही. ती त्यांच्या पायावर रोहित शर्माच्या रूपात मारली गेली.

इम्रान द्रष्टा ठरला. 
हिंदुस्थानने टॉस हरणं हा शाप होता की वरदान?
रोहित शर्माच्या बॅटने ठणकावून सांगितलं, ‘वरदान!’ आम्ही खुळय़ासारखे स्विंग शोधत राहिलो आणि रोहितची बॅट चेंडूला बॅटच्या मध्यावर खेळवत राहिली. आमीरने ओव्हर द विकेट गोलंदाजी टाकत चेंडू बाहेर काढले. अधूनमधून स्लोअरवन टाकले. पण त्याला नवा चेंडू आत आणता आला नाही. आणि खेळपट्टीवर धावण्याबद्दल पंचाने कान उपटल्यावर तर त्याने इनस्विंगचा प्रयत्नच केला नाही. रोहितने हसनला जो पहिला ऑफ ड्राइव्ह मारला ती वाटली फुंकर, पण चेंडू गोळीसारखा गेला. तिथे हसन खचला आणि रोहितची बॅट कुजबुजली, ‘आज माझा दिवस आहे.’ रोहितने हसनच्या आखूड टप्प्याच्या चेंडूचा त्याच्या नेहमीच्या पद्धतीने समाचार घेतला. कधी स्क्वेअर कट तर कधी पूल. षटकार ठोकतानाही त्याची बॅट मिस होते, पण टायमिंग असं असतं की चेंडू सातासमुद्रापलीकडेसुद्धा जाईल असं वाटतं. हसनच्या पहिल्या स्पेलमधली गोलंदाजी 3-0-26-0. हे हिंदुस्थानसाठी धावांचं एटीएम कार्ड होतं. रोहित अशा विध्वंसक फॉर्मात असताना राहुलने धाकटय़ा भावाची भूमिका घेतली. दोघांनी आमीरचे चेंडू सावधपणे खेळून काढले. पण धावांच्या गतीवर त्याचा परिणाम होणार नव्हता. कारण दुसऱया बाजूला धावांचं कोठार होतं आणि दरवाजा लोटलेलाही नव्हता. राहुल-रोहितचं रनिंग बिटविन द विकेटस् सुरुवातीला आश्वासक नव्हतं. एकदा घटस्फोट वाचला. नवं जोडपं आहे, सूर जुळायला लागतात.

धावांचं धरण फुटणं म्हणजे काय याचा रोहितने पाकिस्तानी संघाला अनुभव दिला. ते मानसिकदृष्टय़ा पूरग्रस्त झाले. त्यांचं क्षेत्ररक्षण कोलमडलं. गोलंदाजांचा टप्पा आणि दिशा सैरभैर झाली. आखूड टप्प्याचे चेंडू ‘बाळा’ला जेवण भरवावं तसे भरवले गेले. हिंदुस्थानी फलंदाजांना पायावर चेंडू देणं म्हणजे त्यांना त्यांच्या वाढदिवसाचा केक कापायला देणं. ढगाळ वातावरण, टॉस जिंकलेला, क्षेत्ररक्षण घेतलेलं, दोन्ही बाजूने दोन नवे चेंडू. म्हणजे चेंडू वेगवान गोलंदाजांच्या हातात राहायला हवा. तरीही दहा षटकांच्या आत चेंडू चक्क फिरकी गोलंदाजांच्या हातात आला. दबावाखाली पाकिस्तानी नेतृत्व गोंधळले होते. त्यांच्याकडे आमीर आणि कधी कधी वहाब सोडला तर दर्जेदार गोलंदाज नाहीत. या सामन्यात त्यांची गोलंदाजी अतिसामान्य वाटली. हसनचा प्रत्येक स्पेल म्हणजे ‘अनुदान वाटप’ होतं.

रोहित शर्माच्या फलंदाजीचं वर्णन मी खेळीऐवजी ‘कलाकृती’ असं करीन. त्याच्यावर खरंच दबाव नव्हता का? असेल तर तो ना त्याच्या हालचालीत दिसला ना टायमिंगमध्ये. त्याने कुठला फटका मारला नाही हे आठवणं कठीण झालंय. कदाचित अप्पर कट नसावी. अर्थात संधी आली नाही म्हणून! त्याच्या फटक्यात स्क्वेअर कट होती. लेटकट होती. ड्राईव्हज् होते. पुढे सरसावत मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह होता. हूक-पूलची तर ‘ऍसॉर्टेड डिश’ होती. काही अस्सल पूल, काही नटराज स्टाइलमध्ये, काही तर चक्क चांगल्या चेंडूवर पाय फारसे न हलवता मारलेले. जमलंय तर पाय हलवण्याचे कष्ट का घ्यावे हा अविर्भाव होता. त्याच्या खेळीत जर अभाव कुठल्या गोष्टीचा असेल तर तो ‘कष्टाचा’ होता. त्याला धावा करायला कष्ट पडतायत असं वाटलंसुद्धा नाही. फलंदाजी ही बायकोचं चुंबन घेण्यापेक्षा सोपी गोष्ट आहे असं वाटत होतं. समोरच्या ओठांनी चंबू केलेला होता. त्याला त्याच्या सवडीने ओठावर ओठ ठेकवायचे होते. त्याला बाद करायची ताकद पाकिस्तानी गोलंदाजीत नव्हती. दोनदा त्यांनी संधी गमावली होती. एकदा रोहितला धावचित करण्याची. एकदा त्याची स्क्वेअर कट हवेत गेली. पण तो तोफेचा गोळा होता. त्याने अचानक त्याची एक्झिट ठरवली. हसनला त्याने आधी ठरवल्याप्रमाणे स्कूप करण्याचा प्रयत्न केला. तो वहाबच्या हातात संपला. आपली एक्झिट चुकली हे त्याला जाणवलं. त्याने बॅट पॅडवर आपटली. पॅडची काय चूक? कदाचित नियतीने हसनचा न्याय केला. त्याच्या फाटलेल्या झोळीला सर्वात मौल्यवान विकेटचं ठिगळ लावलं.

पण जाण्यापूर्वी हिंदुस्थानी फलंदाजीसाठी साडेतीनशपर्यंत झेप घेण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार केला.
पुन्हा चौथ्या क्रमांकावर हार्दिक पंडय़ा आला. 19 चेंडूतल्या 26 धावांसाठी दांडपट्टा फिरवला. आपला पगार कमावला. अमीरने हाणामारीच्या षटकातल्या स्पेलमध्ये पंडय़ा-धोनीच्या लागोपाठ विकेटस् घेतल्या. पाऊस आला म्हणून मॅच थांबली तेव्हा हिंदुस्थानची धावसंख्या 4 बाद 304 होती. त्यावेळी 46.4 षटकं झाली होती. पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहलीवर समोरच्या बाजूने रोहितची असामान्य सेंच्युरी पाहत फलंदाजी करण्याचं काम आलं. तो हळूहळू सेट झाला. पण शेवटी स्वतःचा स्ट्राइक रेट चेंडूवर एक धावेपेक्षा जास्त घेऊन परतला. पंचांनी लंचटाइम कमी करून हिंदुस्थानच्या डावाची 50 षटकं पुरी केली तेव्हा 350 चं अपेक्षित टारगेट 14 धावांनी केली पडलं होतं.

पाकिस्तानच्या डावात सुरुवातीची षटकं कशी टाकायला हवीत याचा धडा बुमरा-भुवनेश्वरने पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांना दिला. त्यांनी टप्पा पुढे ठेवला. भुवनेश्वर कुमारचं हॅमस्ट्रींग तिसरं षटक टाकताना दुखावणं हा धक्का होता. हिंदुस्थानी संघाची डेसिंगरूम ही हॉस्पिटल वॉर्ड बनू नये. पण क्रिकेटमध्ये कधी कुणाचं नशीब साथ देईल सांगता येत नाही. विजय शंकरचं नाव संघात पाहूनही अनेक भुवया उंचावल्या होत्या. कारण तसा तो अजून तरी आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पाच षटकांचा गोलंदाज आहे. या शंकराने त्याच्या वर्ल्ड कपच्या पहिल्या चेंडूवर तिसरा डोळा उघडला. चक्क विकेट घेतली. तो चेंडूही खोलवर टप्प्याचा होता आणि स्विंग झाला.

पाकिस्तानच्या बाबर-फखर जोडीने सावधपणे शतकी भागिदारी केली. पण 337 धावांचा पाठलाग करताना आणि एक डोळा डकवर्थ-लुईसच्या तक्त्यावर असताना केवळ सावधता उपयुक्त नसते. कारण अपेक्षित धावांची गती वाढतच जाते. तरीही त्यावेळी वाटत होते की, विराटने किमान एक-दोन षटकं बुमराला द्यावी, निदान एक तरी. भुवनेश्वर गोलंदाजी टाकणार नसल्यामुळे त्याच्या सात षटकांचा प्रश्न विराटला सतावणारच होता. त्याने कुलदीपवर अधिक विश्वास टाकला आणि त्याने जादुई चायनामन निर्माण केला. बाबर हा मला तरी पाकिस्तानी संघातला सर्वोत्कृष्ट फलंदाज वाटतो. तो बचाव करू शकला नाही. चेंडू मस्त वळला आणि खेळपट्टीही खूश होऊन पुढे कुलदीपला चेंडू वळवायला मदत करतेय असं जाणवलं. तो चक्क एक निर्धाव षटक टाकून मोकळा झाला.

गरज ती भागिदारी तोडणाऱया एका चेंडूची होती. कारण चांगल्या परिस्थितीतून कोसळणं ही पाकिस्तानची मेहनतीने जोपासलेली कला आहे. दरड कोसळावी तसे ते कोसळतात. पांडय़ा दोन चेंडूंत दोन विकेटस् घेऊन गेला. त्यात एक हिंदुस्थानच्या जावयाची होती. ‘इद’ संपल्याची ग्वाही पांडय़ाने शोएब मलिकला दिली. तीन षटकांत 12 धावांत 3 बळी गेले. भुवनेश्वर कुमारची उणीव भासली नाहीच. उलट त्यामुळे विजय शंकरच्या हातात चेंडू आला. त्याचा दिवसही साजरा झाला.

टॉस हरून, ढग असून, पाऊस येऊन, डकवर्थ-लुईसने सूत्र हाती घेऊनही हिंदुस्थानी संघ जिंकला. कारण आपल्या संघाचं काळीज वाघाचं आहे. गेल्या लेखात मी म्हटल्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थिती नावाचे लोखंडाचे चणे त्यांनी आरामात चघळले. पाकिस्तानला सुतारफेणीही चावता आली नाही. त्यांचं काळीज सशाचं ठरलं.
dsanzgiri@hotmail.com