विंडीज धडपडता संघ म्हणून टंगळमंगळ नको!

92

द्वारकानाथ संझगिरी

पाकिस्तानला बुकलून काढलेल्या ओल्ड ट्रफोर्डवर गुरुवारी आपण वेस्ट इंडीजविरुद्ध लढणार आहोत. अफगाणिस्तानने प्राण कंठाशी आणल्यापासून ‘खेळणार’ऐवजी ‘लढणार’ म्हणणेच जास्त योग्य!  छोटे मानले गेलेले संघ आता मोठय़ा संघांना जेरीस आणतायेत. एक पराभव संघाचे आत्मबळ किती कमी करतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंग्लंडचा संघ.

मला इंग्लंडच्या संघाकडे पाहिल्यावर त्यांच्याच ‘टायटॅनिक’ जहाजाची आठवण येते. उत्तर आयर्लंडच्या बेलफास्टमध्ये तयार झालेली अजस्त्र्ा बोट ‘अजेय’ मानली गेली होती. ती साऊदम्प्टनहून न्यूयॉर्कला जायला निघाली तेव्हा काही मंडळी मनाने सुखरूपपणे न्यूयॉर्कला पोहोचलीसुद्धा होती. वाटेत एक आईसबर्ग आला आणि बोट बुडाली. आता ही ऍटलांटिकच्या तळाशी बारा हजार फुटांवर जाऊन विसावलीय. इंग्लंडच्या संघाची अवस्था वेगळी आहे का? श्रीलंकेचा संघ तो आईसबर्ग बनेल असे वाटलेसुद्धा नसेल त्यांना. ऑस्ट्रेलियाने दाखवून दिले की ती बोट बुडायला सुरुवात झालीय. ती चार वर्षांची तयारी, तो सर्वश्रेष्ठ असल्याचा अहंकार, वन डेच्या क्रमवारीतला पहिला क्रमांक, घणाघाती फलंदाजांची फौज, जगातले सर्वात वेगवान गोलंदाज संघात असल्याचा गर्व… सर्वकाही. आणखीन एका पराभवाबरोबर विश्वचषक नावाच्या ऍटलांटिकच्या तळाशी जाऊन पडू शकते.

एक जेसन रॉय जायबंदी झाला आणि इंग्लिश संघाचे यशापयश डळमळीत झाले. शिखर धवन गेल्यामुळे आपले तसे होऊ नये, होणार नाही. आपल्याला अफगाणिस्तानने जागे केलेय आणि आपल्याकडे किमान असे दोन फलंदाज आहेत की जे सेट झाल्यावर मोठी खेळी खेळू शकतात. हिंदुस्थानी संघासाठी एक बातमी चांगली आहे की, काल नेटमध्ये भुवनेश्वर कुमारने गोलंदाजी टाकली, पण तो लगेच वेस्ट इंडीजविरुद्ध खेळेल असे वाटत नाही, पण फिट असेल तर त्याला खेळवावे, असे सचिन तेंडुलकरही म्हणतो. कारण उघड आहे, वेस्ट इंडियन फलंदाज वेगापेक्षा स्विंगपुढे जास्त नमतात, पण गोलंदाजीची आपल्याला तशी चिंता नाही. इथे इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कचे कौतुक खूप होतेय. त्याचा वेग, त्याचा यॉर्कर वगैरेचे, पण आपला बुमरा एक उंगलीही त्याच्यापेक्षा कमी नाही. विकेटस् सध्या स्टार्ककडे जास्त असतील, पण वेगवान गोलंदाजीच्या पूर्ण पॅकेजचा विचार केला तर बुमरा एखाद अंगुल स्टार्कच्या वरच राहील. त्याने अजून कुणाला त्याच्यावर तुटून पडायची संधी दिलेली नाही. स्टार्कला तरी विराट, धोनीने काही फटके असे मारले की, आपण स्टार्क पाहतोय यावर विश्वास बसला नाही. शमीने पहिल्याच सामन्यात पहिल्या स्लिपमध्ये आणि मग हाणामारीच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी टाकली. हॅटट्रिक त्याने भले तळाच्या फलंदाजांची घेतली असेल, पण ते तीन चेंडू उत्कृष्ट होते. पांडय़ा त्याच्या दहा षटकांचा कोटा बऱ्यापैकी सांभाळतोय. त्याच्यावर आखूड टप्प्याच्या, उसळत्या चेंडूची स्ट्रटेजी सोपवलेली दिसतेय. विश्वचषकात वेस्ट इंडीजने पाकिस्तानविरुद्ध हा डावपेच प्रथम वापरला आणि मग तो इतरांनी उचलला. षटकामागे दोन उसळते चेंडू डॉटबॉल होऊ शकतात किंवा हुक, पूल, स्क्वेअर कट, अप्पर कटसाठी जाळी फेकता येतात. काही वेळा फलंदाज जाळय़ात सापडतात. काहीवेळा धावांची लुटालूट होते. तुमच्या चेंडूची दिशा आणि वेग यावर दोन्ही बाजू अवलंबून असतात. पण बाऊन्सरचे जाळे फेकताना मधूनच टाकलेला यॉर्कर, स्लोअर वन, स्क्वेअर बाऊन्सर विकेट देऊन जातो. कारण फलंदाज उसळत्या चेंडूची अपेक्षा ठेवत असतो. पांडय़ाला त्या बाबतीत मिक्स यश मिळालेय. फिरकी गोलंदाज म्हणून चहल यशस्वी ठरतोय. त्याच्या बुद्धिबळाच्या ज्ञानाचा तो उपयोग करतोय. पण कुलदीपला अपेक्षित मोठे यश मिळत नाहीय. विंडीजविरुद्ध जाडेजाला का घेऊ नये? फलंदाजीचे शेपूटही कमी होईल.

वेस्ट इंडीजचा संघ हा आक्रमकपणेच खेळणार. त्यांच्या बॅटला आणि बॉलला दुसरी भाषाच येत नाही. तो वेस्ट इंडियन माणसाचा स्वभाव आहे. लंडनच्या ओव्हलवर जेव्हा जमैकातून प्रेक्षक येतात तेव्हा कुठलीही गोष्ट ते मवाळपणे करत नाहीत. बाटल्यांपासून बीअरपर्यंत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निसटत्या पराभवानंतर त्यांचा कर्णधार जेसन होल्डर म्हणाला होता, ‘‘आम्ही आक्रमण करणारच, पण आम्हाला ‘स्मार्ट आक्रमण’ करायला हवे.’’ अगदी खरंय. त्यांनी हातातली मॅच घालवली. कोण कुठला कुल्टर नाईल, त्याने 92 धावा कराव्यात? परवा न्यूझीलंडविरुद्ध ब्रॅथवेटने आपल्या हातातला विजयाचा घास विल्यम्सनला प्रेमाने भरवला. वेस्ट इंडीजकडे जिंकायचा स्मार्टनेस कमी पडतोय. पाकिस्तानविरुद्ध त्याने उसळत्या चेंडूच्या गोळीबारावर विजय मिळवला. त्यावेळी क्षणभर वाटले की, थॉमस, केमार रोच वगैरे मंडळी ती वेगवान गोलंदाजीची जुनी आग पुन्हा लावणार का? ऑस्ट्रेलियाविरुद्ध यांनी आग लावली होती, पण कुल्टर नाईलने ती विझवली. त्यानंतर छोटय़ा मैदानावर सवातीनशेचा पाठलाग अत्यंत लीलया करून बांगलादेशने त्यांची भीती कमी केली आणि मग इंग्लंडने त्यांना हरवले.

पण तरीही पहिले वेगवान स्पेल्स महत्त्वाचे ठरतील. त्यांची दिशा चुकली तर रोहित शर्माला पूल, कटसाठी ते शतकाचे डोहाळे जेवण असेल. वेस्ट इंडियन गोलंदाज आपली आखूड टप्प्याच्या चेंडूची स्ट्रटेजी पार बदलतील असे वाटत नाही. त्यामुळे त्यातल्या चांगल्या चेंडूंना आदर दाखवणे आणि भरकटलेल्या चेंडूवर धावांचा भरपूर नफा मिळवणे ही आपली आखणी असू शकते. वेस्ट इंडियन फलंदाजांच्या एवढे बेभरवशाचे फलंदाज कुणाकडे नसावेत. गेल किंवा ब्रॅथवेटचे भविष्य कोण सांगणार? भूकंपाचे निदान करता येत नाही. तो झाल्यावर किती रिश्टर स्केलचा होता हे सांगता येते. या दोघांच्याही भूकंपाची तीक्रता ही स्कोअरबुकातूनच कळते. अर्थात गेल इतकी वर्षे आयपीएल खेळतोय की विराट आपल्या बायकोपेक्षा गेलच्या फलंदाजीला जास्त जवळून ओळखत असेल आणि गेलसुद्धा त्याच्या विरुद्ध काय आखणी केली जाणार हे ओळखून असेल. आयपीएलचा हा एक फायदा-तोटा आहे. एकमेकाबरोबर खेळल्यामुळे किंवा ड्रेसिंग रूममध्ये एकत्रितपणे वेळ घालवल्यामुळे खेळाडू एकमेकाला नखशिखांत ओळखतात. त्यांची मैत्री होते. पण वर्ल्ड कपच्या स्टेजवर मात्र मैत्री पॅव्हेलियनमध्ये विसरली जाते आणि एकमेकाला भिडतात ते मैदानावरचे योद्धे. वेस्ट इंडीजकडे होप, हेटमायरसारखे चांगले फलंदाज मधल्या फळीत आहेत. ब्रॅथवेटचा भूकंप होऊन गेलाय. पाय न हलवता एकेरी-दुहेरी धावा फारशा उत्साहाने न घेता केवळ मागच्या आठवणीच्या आधारावर खेळून गेलचा भूकंप होऊ शकतो. पण गुरुवारचा दिवस त्याचा नसावा ही मागणी देवाकडे मागूया. मंगळवारी ओल्ड ट्रफॉर्डला आपला दोस्त पाऊस पुन्हा भेटायला आला. त्यामुळे मग थोडा सराव हिंदुस्थानी संघाने इनडोअर नेटस्मध्ये केला. या इनडोअर नेटस्मध्ये वासीम अक्रमचा साइड ऑन पोझिशनमधला फोटो आहे. तो लँकाशायर कौंटीसाठी खेळायचा. दुखापतीनंतर सराव करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने तो पाहिला असावा. कुठल्याही वेगवान गोलंदाजाला स्फूर्ती मिळावी असा तो फोटो आहे. कदाचित वेदना विसरून गोलंदाजी टाकयचीही स्फूर्ती मिळू शकेल. इनडोअरच्या सरावाच्या वेळी फलंदाजीचा प्रशिक्षक संजय बांगर विजय शंकरकडून टेनिस बॉलवर पूल करण्याचा किंवा चेंडू सोडण्याचा सराव करून घेत होता. याचा अर्थ विजय शंकरला आणखीन एक संधी, असा घ्यायचा का? हो जाडेजानेसुद्धा बराच काळ गोलंदाजी केली. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्याने धावा करणारा आणि पॅव्हेलियनमध्ये सेट होऊन येणारा विराट कोहली आपल्या फटक्यावर घाम गाळत होता. मुख्य म्हणजे ड्राइव्हपासून रिव्हर्स स्विपपर्यंत प्रत्येक फटका मारू पाहत होता. उगीच नाही तो मोठा झाला आणि रवी शास्त्री ‘चाणक्य’ होऊन स्वतः त्यावर लक्ष ठेवून होता. रवी शास्त्रीचे मन कदाचित 1983 सालापर्यंत आठवणींचे जिने उतरत मागे गेले असेल. 1983 साली अनपेक्षितपणे हिंदुस्थानी संघाने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजला याच मैदानावर हरवले होते… 34 धावांनी हरताना वेस्ट इंडीजचा संघ थक्क झाला होता. कारण तोपर्यंत हिंदुस्थानी संघाला वन डेच्या बाबतीत कुणी गृहीत धरत नव्हते. रवी शास्त्री-रॉजर बिन्नीने त्या सामन्यात तीन-तीन बळी घेतले होते. याच सामन्यात वेस्ट इंडीजच्या अजिंक्यत्वाचे कवच प्रथम फुटले आणि लॉर्डस्वर मग कपिलदेवच्या हिंदुस्थानी संघाने त्याचे तुकडे तुकडे केले.

त्यानंतर थेम्स नदीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. हिंदुस्थानी संघ पुन्हा जगज्जेता झाला. वेस्ट इंडियन संघाची रया गेली. आज तो धडपडता संघ आहे. 1983 च्या स्वतःच्या उदाहरणावरून धडपडता संघ काय करू शकतो ते आपण विसरणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या