
>> द्वारकानाथ संझगिरी
हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा हैदराबादला यशस्वी पाठलाग करताना हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना सांगितलं, निराश होऊ नका. वर्ल्ड कप आपल्या घरी येऊ शकतो.
टी-20 क्रिकेट हे सध्याचं बदलतं हवामान आहे तसं आहे. क्षणात रंग पालटतं. कधी पाऊस कधी कडक ऊन.
रविवारी अमावास्येच्या रात्री चक्क सूर्य चमकला आणि चंद्र- तारे हसले. सूर्यकुमारने रात्रीचा दिवस केला.
खेळपट्टीमध्ये बाऊन्स होता. कधी तो अपेक्षेपेक्षा जास्त असायचा, पण एखादा घोडेस्वार उसळलेल्या घोडय़ावर स्वार व्हावा तसा सूर्या चेंडूच्या बाऊन्सवर स्वार झाला आणि काही वेळा लेगकडे सरकून जागा करून घेत अफलातून फटके खेळला. समोर दर्जेदार वेगवान गोलंदाज होते, पण बाऊन्सचा घोडा सूर्याच्या बॅटला वश होता.
आधी तडाखेबाज सुरुवात करणाऱया विराट कोहलीने सूर्याचं तेज पाहून स्वतःकडे दुय्यम भूमिका घेतली. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळेल असं पाहिलं आणि सूर्या बाद झाल्यावर गिअर बदलला.
सूर्या आणि कोहलीची भागीदारी 62 चेंडूत 104 धावांची होती. या भागीदारीने पाठलागाचा पायाही खणला आणि मार्गावर रोषणाईसुद्धा केली. सूर्या गेला तेव्हा हिंदुस्थानला जिंकायला 54 धावा हव्या होत्या. ऑस्ट्रेलियाने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण कोहली आणि पंडय़ाने हिंदुस्थानी संघाला पैलतीरी नेले.
या सामन्यात काही सकारात्मक गोष्टी घडल्या आणि काही बाबतीत मागील पानावरून पुढे चालू असंही घडलं.
ऑस्ट्रेलियाच्या ग्रीन याने जो सुरुवातीला हल्ला चढवला त्याने हिंदुस्थानी संघ खचला नाही. 19 चेंडूत त्याने अर्धशतक ठोकले. भुवनेश्वर कुमारने एका षटकात 12 धावांचा नैवेद्य दाखवला होता. अक्षर पटेलच्या एका षटकात ग्रीनकडून तीन चाबूक खाल्ले होते.
पण पॉवर प्लेमध्ये 66 धावा दिल्यावरही कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियावर दबाव टाकला. ग्रीनच्या वादळात त्याने पॉवर प्लेमध्ये 3 षटकांत 31 धावा देऊन 1 बळी घेतला आणि मग 14 व्या षटकात त्याने इंग्लिस आणि वेडला बाद केलं. या मालिकेत त्याने 63 धावा देऊन 8 बळी घेतले. इतर कुणीही 3 च्या वर बळी घेतलेले नाहीत. भुवनेश्वर कुमारने यावेळी धावांच्या लंगरसाठी 18 वे षटक निवडलं आणि आपलं औदार्य सुरूच ठेवलं. स्वर्गात कर्णसुद्धा गहिवरला असं म्हणतात. बुमराहला दुखापतीमुळे गंज चढलेला जाणवला.
त्यामुळे 6 बाद 117 वरून त्यांनी 186 वर उडी घेतली.
घराला अजून डागडुजीची गरज आहे. काही दोष सूर्याच्या तेजाआड लपले आहेत.