प्राथमिक चौकशीला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली, परमबीर सिंह यांना हायकोर्टाचा दणका

माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप करणाऱया मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. सिंह यांनी त्यांच्याविरुद्ध राज्य शासनाने सुरू केलेल्या चौकशीला आव्हान दिले होते. मात्र न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळली. एवढेच नव्हे तर या प्रकरणी कॅटकडे दाद मागण्याच्या सूचना देत कॅटने न्यायालयाच्या कुठल्याही आदेशांच्या प्रभावाखाली न राहता स्वतंत्र सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, असे स्पष्ट केले.

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर राखून ठेवलेला निर्णय न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या खंडपीठाने आज जाहीर केला. सिंह यांच्याविरोधातील चौकशी शासकीय सेवेशी निगडित नियमांचे उल्लंघन व भ्रष्टाचाराच्या आरोपाशी संबंधित असल्याने त्यांनी या प्रकरणी कॅटकडे दाद मागणे उचित आहे. उच्च न्यायालयाने यावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ कौन्सिल दरायूस खंबाटा यांनी केली. सिंह यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी सरकार केवळ सूडबुद्धीने चौकशीचा ससेमिरा लावत असल्याचा युक्तीवाद केला. डीजीपी संजय पांडे यांच्या वतीनेही सिंह यांच्या याचिकेला विरोध करण्यात आला. राज्य सरकारचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सिंह यांना दिलासा देण्यास नकार दिला.

आपली प्रतिक्रिया द्या