चंद्र पृथ्वीच्या छायेत

366

 

दा.कृ.सोमण

येत्या सोमवारी चंद्रग्रहण आहे. निसर्गाचा हा मनोहारी खेळ अवश्य पाहा…

कधी कधी आकाशात चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण दिसते. या ग्रहणांचे निरीक्षण करणे ही खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी असते. चंद्रग्रहण हा सावल्यांचा खेळ असतो तर सूर्यग्रहण हा चंद्र-सूर्याचा लपंडाव असतो. चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहता येते तर सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास तयार केलेला ग्रहणचष्मा वापरावा लागतो.

येत्या सोमवारी ७ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण हिंदुस्थानप्रमाणेच ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका, यूरोप आणि पश्चिम पॅसिफिक महासागरातून दिसणार आहे. सोमवार ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ५४ मिनिटानी चंद्रोदय (ही वेळ मुंबईची आहे.) होईल. त्यावेळी चंद्रबिंब ९९.६ टक्के प्रकाशित दिसेल. नंतर रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी चंद्राचा २४.६ टक्के भाग ग्रासित दिसेल. म्हणजेच चंद्रबिंबाचा २४.६ टक्के भाग पृथ्वीच्या छायेत येईल आणि रात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी चंद्रग्रहण सुटेल. हे चंद्रग्रहण सॅरॉस चक्र ११९ क्रमांकातील आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ९४ हजार ७७० किलोमीटर अंतरावर असेल. हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यानी पाहता येणार आहे. ज्यांच्याकडे दुर्बिण असेल त्यांनी त्यातून चंद्रग्रहण निरीक्षण करण्यास हरकत नाही. यानंतर पुढच्यावर्षी बुधवार ३१ जानेवारी २०१८ रोजी होणारे चंद्रग्रहण हिदुस्थानातून दिसणार आहे.

पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट सावलीत येते त्यावेळी आपणांस चंद्रग्रहण दिसते. जर चंद्रबिंबाचा थोडासाच भाग पृथ्वीच्या दाट सावलीत आला तर त्याला ‘खंडग्रास चंद्रग्रहण’ म्हणतात. जर संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट सावलीत आले तर त्याला ‘खग्रास चंद्रग्रहण’ म्हणतात. जर चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट सावलीच्या भोवती असणाऱया विरळ सावलीतूनच गेले तर त्याला ‘छायाकल्प’ किंवा ‘मांद्य चंद्रग्रहण’ म्हणतात.

प्राचीन काळीही ग्रहणाचे ज्ञान हिंदुस्थानातील ज्योतिर्विदाना होते. सूर्य सिद्धांत, ग्रहलाघव, ज्योतिर्गणित, करणकल्पलता इत्यादी ग्रंथांवरून याची कल्पना येते.

आपण उन्हात उभे राहिल्यानंतर आपली सावली जशी पडते. तशीच चंद्राची सावली अंतराळात पडलेली असते. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या सरासरी अंतरापाशी पृथ्वीच्या सावलीची रूंदी सुमारे ९२०० किलोमीटर असते. त्यामुळे खग्रास चंद्रग्रहणाचा काल एक तास चाळीस मिनिटांपेक्षा जास्त नसतो.

ग्रहणाविषयी गैरसमजुती!

आपल्याकडे प्राचीन कालापासून ग्रहणाविषयी काही गैरसमजुती आहेत, ग्रहण हे एकूण वाईट असते, ग्रहणात राहू-केतू हे राक्षस चंद्र-सूर्याला गिळतात असाही गैरसमज आहे.परंतु प्रत्यक्षात ग्रहण हे वाईट नसते. राहू-केतू हे राक्षस नाहीत. ते सूर्यमार्ग आणि चंद्रमार्ग यांचे छेदनबिंदू आहेत. ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. तो चमत्कारही नाही. ग्रहण कधी होणार कुठे दिसणार हे गणित करून अगोदर सांगता येते. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. ग्रहण पाहणे हे वाईट असते असाही एक गैरसमज आहे. या उलट ग्रहणाचे अगोदर गणित करून ते प्रत्यक्ष निरीक्षण करून गणित तपासणे महत्त्वाचे असते. ग्रहणात दिसणाऱया विविध दृष्यांचे निरीक्षण करणे आनंददायी असते. ग्रहणातील सुंदर छायाचित्रे टिपणेही आनंददायी असते. ग्रहण काळात गरोदर महिलांनी भाजी चिरल्यास जन्मणारे मूल व्यंग घेऊन जन्माला येते हाही एक गैरसमज आहे. हे कुठेही सिद्ध झालेले नाही. याउलट युरोपमध्ये ‘थायलिडोमाइड’ नावाचे चुकीचे औषध अनेक गरोदर महिलानी घेतले त्यामुळे तेथे हजारो व्यंग असलेली मुले जन्माला आली होती. ग्रहण सुटल्यावर पूर्वी लोक आंघोळ करीत असत. मला आठवतेय की पूर्वी ग्रहण सुटल्यावर मुंबई महानगरपालिकेच्या नळाला आंघोळ करण्यासाठी पाणी येत असे. स्वच्छतेसाठी केव्हाही आंघोळ करण्यास हरकत नाही परंतु ग्रहणामुळे काहीही अशुद्ध होत नसते.

पूर्वी ग्रहणकालात माणसे काहीही खात नसत. ग्रहणात वातावरण अशुद्ध होते असा गैरसमज होता. पूर्वी ग्रहणकालात मलमूत्र विसर्जन करू नये असाही एक गैरसमज होता. पूर्वी ग्रहण सुटल्यावर लोक घरातील जुने कपडे दान देऊन पुण्याची अपेक्षा करीत असत. ग्रहण सुटल्यावर भिकारी ‘दे दान, सुटे गिराण’ असे म्हणत रस्त्यातून फिरत असत. गरीब लोकांना मदत करायलाच पाहिजे पण जुने नव्हे! नवीन कपडे द्यावयास हवे आहेत, आणि त्यासाठी ग्रहणांची वाट पाहण्याची काहीही गरज नाही. सध्या या वैज्ञानिक कालात लोकांना एक महत्वाची गोष्ट कळून आली आहे की चंद्र-सूर्याची ग्रहणे ही अशुभ-वाईट नसतात.

आपला चंद्र!

चंद्र हा आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे. तो पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. त्याचा परिवलन काळ आणि पृथ्वी भ्रमण काळ २७.३ दिवस एवढा आहे. हे दोन्ही काल समान असल्यामुळे पृथ्वीवरून पाहताना चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते. चंद्राचा विषुववृत्तीय व्यास ३४७६ किलोमीटर आहे. हिंदुस्थानचे चांद्रयान-१ यानाने चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे जगाला दिले. १९६९ मध्ये अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंग याने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. काळोख्या रात्री दिसणारे चंद्राचे मनोहारी रूप अनेक कवीनी आपल्या काव्यामध्ये सुंदर वर्णन केलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या