भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीत आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल नोंदवली गेली. दरम्यान, या भूकंपामुळे जवळपास 15 सेकंद हादरे बसले. भूकंप असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घराबाहेर तसेच कार्यालयांबाहेर पळ काढल्याचे चित्र होते.
भूकंपाचे धक्के भंडारा, गोंदिया, गडचिरोलीसह छत्तीसगडच्या बीजापूर, सुकमा आणि दंतेवाडा येथे जाणवले. त्याचबरोबर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील मुलुगु, हैदराबाद, रंगारेड्डी, भद्राद्री, कोठामुडेम, खम्मम आणि कृष्णा जिह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे अनेक गावांमध्ये घरांच्या भिंतींना तडे गेले. लोकांनी घराबाहेर पळ काढत खुल्या मैदानात आश्रय घेतला. दरम्यान, अशाप्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.