मराठवाड्यासह विदर्भालाही भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

मराठवाड्यासह आता विदर्भालाही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, पुसद भागात सकाळी 7.15 वाजता भूकंपांचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खडखड असा आवाज होत जमीन हादरल्यासारखा प्रकार घडला. विशेषतः टिनाच्या घरांना भूकंपाचे धक्के अधिक जाणवले. सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, पुसद हा भाग मराठवाड्याच्या सीमेलगतचा भाग आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भूकंपाचे हादरे बसले आहेत. हिंगोलीतील रामेश्वर तांडा येथे भूकंपाचे केंद्र होते. भूकंपानंतर यवतमाळ प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अद्याप प्रशासनने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. यवतमाळ जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत हे सविस्तर माहिती घेत आहेत. उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी भूकंपाचे सौम्य झटके स्वतः अनुभवल्याचे सांगितले. तलाठ्यांकडून माहिती घेतली असता उमरखेड तालुक्यात कोणत्याही प्रकारची मालमत्तेचे अथवा जीवितहानी नसल्याचे त्यांनी सांगितले.