जीवनशैली सोपा व्यायाम

91
अ‍ॅसिडिटीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रोज अर्धा तास ते एक तास चालण्याचा व्यायाम करणे फायदेशीर असते.

 

संग्राम चौगुले

[email protected]

कोणत्याही मार्गाने, पण व्यायाम हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे. प्रशिक्षकाशिवाय स्वत:करता येण्याजोगे व्यायामप्रकार.

कुठेही चाला…

घरीच किंवा कुठेही करता येण्यासारखा सोपा आणि सर्वात प्रभावी व्यायाम प्रकार म्हणजे वॉकिंग… चालण्याचा व्यायाम. चालणं कुठेही करता येईल. ठरावीक पावले चालणं शरीराच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. म्हणून गार्डनमध्ये किंवा घरासमोरच्या जागेतही चालू शकाल. पण वॉकिंग करायचं तर जेवणाच्या आधी करायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. जेवण झाल्यावर वॉकिंग करायचं नाही… साधारणपणे लोक जेवणानंतर वॉकिंग करायला निघतात. पण ते चुकीचे आहे. शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर जेवणाआधी वॉकिंग करायचं.

आजच्या धकाधकीच्या जीवनात जिम जॉईन करून व्यायाम करायला कुणाला वेळ आहे… त्यामुळे चुटकीसरशी घरच्या घरीच व्यायाम करता आला तर..? व्यायाम काय कुठेही केला तरी फायद्याचाच! जिममध्ये प्रशिक्षित ट्रेनर असतात एवढाच काय तो फरक.. पण घरीदेखील काही व्यायाम करता येऊ शकतात. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या ट्रेनर्सची गरज लागत नाही.

हल्ली चालणं होतच नाहीय… घरातून निघालं की वाहन… ऑफिसमध्येही बैठे काम… घरी आल्यावरही लिफ्टने आपल्या मजल्यावर जाणं… पण व्यायाम म्हणून जिन्याचा आवर्जून वापर करायचा. ऑफिसही वरच्या मजल्यावर असेल तर तेथेही जिनाच वापरायचा. यामुळे शरीराला चांगला व्यायाम मिळतो. दिवसभरातून असा दोनवेळा शरीराला त्रास दिला तर ते तंदुरुस्त राहणारच… याला ‘कार्डिओ वर्कआऊट’ म्हणतात. अशा लोकांनी वेगळा व्यायाम करण्याचीही मग गरज भासणार नाही.

दोरीउडय़ा हा खेळ तर आहेच, पण तो घरच्या घरी करता येणारा चांगला व्यायामही आहे. मात्र ज्यांचं वजन कमी आहे त्यांना हा व्यायामप्रकार ठीक आहे. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी तो लक्षात ठेवून टाळायचा आहे. लठ्ठ माणसांनी दोरीउडय़ा घातल्या तर त्यांचं सगळं वजन त्यांच्या गुडघ्यांवर पडून त्यांना गुडघेदुखी सुरू होईल. त्यामुळे त्यांनी काळजी घ्यायला हवी.

बऱयाचजणांकडे सायकल असते. सायकल चालवणं हादेखील एक खूप चांगला व्यायाम असतो. सायकलिंग कुठेही करता येईल. घराच्या आवारात किंवा गार्डनमध्येही सायकल चालवायची. दररोज काही वेळ सायकल चालवायची असं ठरवूनच टाकायला पाहिजे. त्यामुळे कॅलरी बर्निंग चांगले होऊ शकते.

योगा… हाही एक चांगला व्यायाम आहे. योगासने किंवा सूर्यनमस्कार घरच्या घरी नियमित घालता येऊ शकतात. सकाळच्या वेळी दिवसातून किमान १२ ते १५ सूर्यनमस्कार जरी घातले तरी शरीरावर त्याचा चांगला प्रभाव पडू शकतो. १५ सूर्यनमस्कार तशी अवघड गोष्ट आहे. पण जिद्दीने केले तर जिमला जाण्याची काहीच गरज नाही. घरीच चांगला व्यायाम होऊ शकतो.

घरीच करता येण्याजोगा आणखी एक व्यायामप्रकार म्हणजे पुशअप्स… ते येत असतील तर महिलांनीही केल्या तरी चालेल. पण त्याच्या पोजिशन्स, म्हणजे हात फोल्ड करून ठेवायचे वगैरे… त्यांना ‘प्लँक’ म्हणतात. त्याच्या जरी ८ ते १० स्टेप्स केल्या तरी खूप झाले. पोटाला चांगला व्यायाम मिळतो. शिवाय जंपिंग जॅकही करता येईल. लहानपणी आपण शाळेत कसरती करायचो.. तशाच करायच्या. हेदेखील घरीच आणि कुणाच्याही मदतीशिवाय करता येऊ शकतात. असे काही प्रयोग घरीच करून पाहिलेत तर जिममध्ये अर्धा ते पाऊण तास व्यायाम केल्यासारखाच परिणाम दिसेल.

 

आपली प्रतिक्रिया द्या