आम्ही खवय्ये : दीक्षित डाएट आवडते

ज्येष्ठ नाट्यकर्मी आनंद म्हसवेकर यांना मांसाहार विशेष प्रिय. दीक्षित डाएटमुळे आहाराला शिस्त लागली.

– ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – आपण जे काही खातो ते फक्त पोट भरण्यासाठी नसावं. अन्न हे पूर्णब्रह्म आहे यादृष्टीनेही त्याचा विचार व्हावा असं मला वाटतं.

– खायला काय आवडतं? – मला खरं तर घाटावरचा असल्यामुळे मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी जास्त आवडते. मांसाहारात चिकन आणि मासे आवडतात.

– खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – सध्या मी दीक्षितांचं डाएट करतोय. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 45 मिनिटं रोज चालतो.रोज अर्धा तास योगा करतो. परदेशातही हा नियम पाळतोच.

– डाएट करता का? – हे खायचं, ते नाही असं डाएट करत नाही. फक्त साखरेचे पदार्थ खात नाही.

– आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता?- बाहेर खाणं हे नाटकाच्या तालमी किंवा दौऱयामुळे होतं. बाहेर खाताना मैद्याचे किंवा पावाचे पदार्थ खात नाही, त्याऐवजी भाजी, डाळ, चपाती, भाकरी, रोटी अशी पथ्यं पाळतो.

– कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – मला कोणतंही मालवणी पद्धतीचे पदार्थ मिळणाऱया हॉटेलमध्ये जायला आवडतं. दादरला शिवाजी मंदिरच्या समोरचं, वांद्रय़ाला हायवेवरच असं जिथे तंतोतंत मालवणी पद्धतीचे मासे खायला मिळतात त्या हॉटेलात जातो. चिकनपेक्षा माशांची कढी खायला प्राधान्य देतो.
कोणतं पेय आवडतं? – कोल्ड्रिंक अजिबातच घेत नाही, पण जेवल्यानंतर कोकम कढी किंवा ताक पितो.
प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – फक्त दोन जेवणांमध्ये आठ तासांचं अंतर ठेवायचं हा नियम पाळतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची औषधं न घेता माझं वजन कमी झालं आहे.

डाएट चिकन
एक जुडी पुदिना, अर्धी जुडी कोथिंबीर आणि अर्धा किलो चिकन आणि अंदाजानुसार कांदा कुकरमध्ये याचे थर ठेवून फक्त शिटी काढायची. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून पुन्हा उकळी द्यायची. तेल आणि मसाले अजिबात न वापरता केलेली अतिशय चविष्ट डिश आहे.