लंच डेट : शिकरण पोळी – All time Favourite!

514

>> शेफ विष्णू मनोहर

सुनील बर्वे. सदाबहार चॉकलेट हिरो. खाण्याच्या आवडीही दिसण्याप्रमाणेच सात्त्विक… सोज्वळ!

मराठी-हिंदी-गुजराती नाटक, मालिका व चित्रपट या तिन्ही क्षेत्रात अभिनयाची छाप पाडणारे एव्हरग्रीन हिरो म्हणजे आपले लाडके अभिनेते सुनील बर्वे. त्यांच्या खाण्या-पिण्याविषयी विचारले असता ते सांगतात मी संपूर्णपणे शाकाहारी आहे. घरचं खायला जास्त आवडतं. जेवणात वरण-भात, पोळी-भाजी, शिकरण पोळी ऑल टाइम फेव्हरेट आहे. चटपटीत म्हणून चाट खायला आवडतं.

स्वयंपाकात रुची आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, मला स्वयंपाकात रुची आहे, पण वेळेअभावी बनवत नाही, दडपे पोहे, पह्डणीचा भात/पोळी, कांदाबटाटे रस्सा, ऑम्लेट, नीर दोसा बनवायचा प्रयत्न केला, पण तो फसला. जेवणात हिंदुस्थानी पदार्थ विषेशतः आवडतात, बाहेर कधी पार्टीला जाताना जेवण घरून करून जातो. मग पार्टीत वाटलं तर थोडं स्टार्टर खातो. पुढे परदेशातील जेवणाविषयी अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले, माझ्या पहिल्या अमेरिकेच्या दौऱयावर प्रवासात असताना फक्त शाकाहारी असल्यामुळे जेवणाविषयी खूप हाल सहन करावे लागले. पण तिथल्या फ्रेंच फ्राईज आणि सबवे सँडविच या पदार्थांनी वाचवलं. त्यानंतर 2003 साली पॅरिसला गेलो होतो तेव्हा मी ऑम्लेट खाऊ लागलो होतो, पण तिथे भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे एकदा हॉटेलमध्ये वेटरला कोंबडीचे अंडे, त्याचे ऑम्लेट हे सगळं समजावून सांगताना तारांबळ उडाली आणि भूकसुद्धा पळाली.

मी घरी असताना मला माझी आई आणि बायकोच्या हातचं जेवण आवडतं. आईच्या हातचे बेसनाचे लाडू, पुरणपोळी अधिक प्रिय आहे. बायकोच्या हातचे आवडते पदार्थ म्हटले तर आलू पराठे, ब्रेड रोल, गुळपापडीच्या वड्या,मक्याचे पॅटिस इत्यादी.

खाण्याच्याबाबतीत काही अडचणी आल्या का असे विचारले असता ते म्हणाले की मुळात खाण्याच्या बाबतीत खूप काटेकोर नसल्यामुळे बाहेरच्या ठिकाणी फार अशा अडचणी आल्या नाहीत, पण प्रयोग आणि शूटिंग दरम्यान प्रवासात बायकोने दिलेले पोळीचे रोल (गूळतुपाचे/साखर तुपाचे) खूप कामी आले. s माझ्या गाडीत बाहेर जाताना नेहमी एक पिशवी कायम वेगवेगळ्या खाद्य पदार्थांनी भरलेली असते. ज्यात भडंग, आवळा सरबत, चकल्या, सुका मेवा, फ्रुट्स, मुखवास, आवळा पॅन्डी, जेवणाचा डबा इत्यादी बरंच काही कायम असतं. माझ्या मित्रांनासुद्धा माहीत असतं आणि ते म्हणतातदेखील की, सुन्याबरोबर जातोय ना, मग ‘अप्पू’ची पिशवी सोबत असणारच. बायकोचे नाव अपर्णा, पण सगळे जवळचे मित्र तिला अप्पू संबोधतात.घरचं जेवण खूप समाधान देऊन जातं,

कॉर्न पॅटीस
साहित्य – 2 कप स्वीट कॉर्न, उकडलेले 3 मध्यम बटाटे, 2 ब्रेडचे स्लाईस, 1 टीस्पून आले किसलेले, 3 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, 2 लहान कांदे, 1/2 टीस्पून जिरे, 1/4 कप कोथिंबीर बारीक चिरून, 1 टेस्पून मैदा, 1/2 कप पाणी, चवीपुरते मीठ.

कृती – बटाटे सोलून पुस्करून घ्यावे. ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करावे आणि ते बटाटय़ात घालावे. दीड कप कॉर्न मिक्सरमध्ये अगदी भरड वाटावेत. उरलेले 1/2 कप कॉर्न अख्खेच मिक्स करावेत. कांदा बारीक चिरून घ्यावा. कॉर्नच्या मिश्रणात पुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, मिरची पेस्ट, आले, जिरे, कोथिंबीर, चिरलेला कांदा, आणि मीठ घालावे. मिक्स करून घ्यावे. तयार मिश्रणाचे 18 ते 20 मध्यम आकाराचे पॅटीस बनवावे. पॅटीस गोल आणि चपटे बनवावेत. पॅटीस एकावर-एक रचू नयेत. सेपरेट ठेवावीत. अर्धा-पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवावे.अर्ध्या तासाने पॅटीस फ्रीजमधून बाहेर काढून 10 मिनिटे बाहेर ठेवावे. कढईत तेल गरम करून मिडीयम आचेवर पॅटीस तळून घ्यावी. जेव्हा पॅटीस तळणीत सोडाल तेव्हा 20-25 सेकंद त्याला डिस्टर्ब करू नकात. एक बाजू थोडी तळली गेली की मगच झाऱयाने बाजू बदलावी. दोन्ही बाजू सोनेरी रंगावर तळाव्यात. तळलेले पॅटीस टिश्यू पेपरवर काढावेत. पुदिना चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर सर्व्ह करावेत.

आलू पराठे
साहित्य – सहा उकडलेले बटाटे, चमचाभर धणे जिरेपूड, चमचाभर आलं-मिरची पेस्ट, चमचाभर आमचूर पावडर, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा पिठीसाखर, कणीक, साजूक तूप.

कृती – उकडलेले बटाटे हलक्या हातानं कुस्करावेत. त्यात कणीक आणि साजूक तूप वगळता बाकीचं सारं साहित्य घालावं. कणीक किंचितशी सैलसर भिजवून त्याचे गोळे करावेत. त्यात वरील सारण अलगद भरून पराठा लाटावा. नॉनस्टिक पॅनवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर खरपूस भाजावा. भाजताना बाजूनं साजूक तूप सोडावं. वाटीभर दाण्याच्या पुटामध्ये किंचित हिंग, मीठ, हळद तिखट, मीठ आणि चमचाभर गोड दही मिसळून त्यासोबत गरमागरम आलू पराठे सर्व्ह करावे.

गुळपापडीच्या वड्या
साहित्त्य – कणीक 2 वाटय़ा, तूप 2 वाटय़ा गूळ 1 वाटी सुकं खोबरं किसलेलं 1 वाटी खसखस वाटल्यास मूठभर पोहे भाजून
कृती – सुकं खोबरं आधी थोडं भाजून घ्यावं कणीक भाजण्यास घ्यावी व तीत हळुहळू तूप सोडावे. मग कणकेत सुकं खोबरं मिसळून मिश्रण खरपूस भाजून घ्यावं. भांडं चुलीवरून खाली उतरवून त्यात गूळ घालून मिश्रण चांगलं एकजीव ढवळून घ्यावं. 5 मिनिटांनी व वरून खसखस घालून वड्या 15 मिनिटांनी कापाव्या.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या