स्वयंपाकातील प्रसंगावधान!

376

>> शेफ विष्णू मनोहर

रेणुका देशकर. निवेदिका, लेखिका आणि खवय्या. पारंपरिक शाकाहारी पदार्थ त्यांचा हातखंडा…

कुठलाही कार्यक्रम म्हटला तर त्यामध्ये निवेदकाची भूमिका महत्त्वाची असते. महाराष्ट्रात नावाजलेले बरेच निवेदक आहेत विदर्भात ज्यांनी निवेदनाद्वारे आपलं एक वलय निर्माण केलं आहे अशा रेणुका देशकर, ज्यांनी आतापर्यंत गेल्या 30 वर्षांत हजारो कार्यक्रमांद्वारे आपल्या निवदेनाची छाप रसिकांवर सोडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन यांसह अनेक नावाजलेल्या मराठी मंडळींनी रेणुकाच्या नावाचं कौतुक केलं आहे. निवेदनाशिवाय ती उत्तम लेखिकासुद्धा आहे. नवनवीन कार्यक्रमाची संकल्पना ती ‘सप्तक’ या नावाजलेल्या संस्थेद्वारे सादर करते. याशिवाय उत्कृष्ट गृहिणीसुद्धा आहे. पारंपरिक पदार्थ तिला जास्त आवडतात.

मी अनेक कार्यक्रम तिच्याबरोबर करत असल्यामुळे तिच्याबरोबर वेगळी लंच डेट घेण्याची गरज पडली नाही. तसं पाहिलं तर आमच्या दोघांचीही आवड सारखीच आहे, ती म्हणजे पारंपरिक पदार्थ आणि कुठल्याही का कारणाने, एकत्र जमून गप्पा-गोष्टी, खाणे. रेणुकाला शाकाहारीच पदार्थ आवडतात. व्यस्त दिनचर्येमुळे ती कार्यक्रमाला जाताना वरण-भात, भाजी-पोळीचा डबा घरूनच नेते. त्यातल्या त्यात तिचे आवडीचे पदार्थ म्हणजे उपवासाची खिचडी, पातळ भाजी, हैदराबादी मुद्दा भाजी, मसाल्याची तळलेली मिरची, दाल खिचडी, कोहळ्याची गाखर भाजी.

सकाळच्या न्याहारीला तिला इडली, चटणी खायला आवडते. मुलगा परदेशात असल्यामुळे काही महिने ती जेव्हा परदेशात होती, तिथेही महाराष्ट्र मंडळात निवेदनाचे कार्यक्रम करता करता अनेक लोकांच्या घरी राहण्याचा योग आला. एका घरी राहायला गेले असताना तिथल्या ज्या काकू होत्या त्यांना हे माहीत होते की, रेणुका उपवासाची खिचडी छान बनविते. त्यांनी परस्पर जाहीर केलं की, आज रेणुकाच्या हातची खिचडी आपल्याला खायची आहे. तसं त्यांनी तिला फोनवर कळवल्यानंतर तिने लगेच ‘हो’ म्हटलं आणि साबुदाणे भिजवून ठेवा असं सांगितलं. काकूंनी साबुदाणे भिजवले तर खरे, पण ते बारीक साबुदाणे होते. त्यातच ते थोडा जास्त वेळ पाण्यात राहिले. त्यांच्या लक्षात ही चूक आली नाही, पण रेणुकाने जेव्हा खिचडी बनवायला घेतली तेव्हा तिचा गोळा होईल हे लक्षात आल्याबरोबर तिने प्रसंगावधान राखून छोटे-छोटे साबुदाण्याचे वडे बनविले आणि काकूंना सांगितलं की, माझ्या मते मला खिचडीपेक्षा वडे छान येतात. काकूंकडील पाहुणे निघून गेल्यावर खरं काय घडलं हे सांगितलं. प्रसंगावधान हा निवेदकाचा महत्त्वाचा गुण असतो आणि तोच तिने इथे वापरला असावा.

रेणुकाची आवडती जेवणाची जागा म्हणजे ‘विष्णूजी की रसोई’ आणि मुलगी कात्यायनी हिने बनविलेली बटाटय़ाची भाजी विशेषत्वाने आवडते. रेणुकाच्या खाण्याविषयीच्या आवडीनिवडीवर बोलायचं झालं तर अजून बरचं काही आहे, पण आपल्याला कुठेतरी आवरतं घ्यावं लागेल.

गजरेला
साहित्य – 2 वाटय़ा गाजर चिरलेले , 4 चमचे कॉर्नस्टार्चे, 1 वाटी साखर, 4 नग पेढे, 2 चमचे तूप, चिमूटभर मीठ .

कृती – गाजर किसून त्यामधे एक चिमटी मीठ व कॉर्नस्टार्च टाका. नंतर तव्यावर थोडे तूप लावून त्यावर किसलेले गाजर डोशाप्रमाणे पसरवा. त्यावर थोडी साखर व पेढे कुस्करून घाला. मंद आचेवर थोडे कडक करून आवश्यकतेनुसार तूप घाला. नंतर त्याचा रोल करून वरून चांदीचा वर्ख लावून सर्व्ह करा.

सत्यनारायणाचा शिरा
साहित्य – सवा वाटी रवा, सवा वाटी साखर, सवा वाटी तूप, सवा वाटी दूध, 1 नग केळी, 8-10 तुळशीची पाने, 1 चमचा वेलचीपूड, 3 चमचे काजू-किसमीस.

कृती – प्रथम रवा थोडा कोरडा भाजून नंतर त्यात तूप घाला. खमंग भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ, वेलची पावडर, काजू-किसमीस व दूध एकत्र करून घाला. थोडे गरम पाणीसुद्धा घाला. नंतर लगेच साखर घालून एक वाफ येऊ द्या. भांडय़ात काढून त्यावर केळ्याचे काप, तुळशीचे पान घालून खायला घ्यावे.

पातळ भाजी
साहित्य – 2 वाटय़ा बारीक चिरलेला पालक, अर्धा वाटी मेथी किंवा अळू, अर्धा वाटी मुळ्याच्या चकत्या, 2 चमचे हिरवी मिरची कापलेली, 2 चमचे आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट चवीनुसार, अर्धा चमचा मेथी दाणे, 2-3 चमचे खोबऱयाचे काप, 1 चमचा भिजलेले शेंगदाणे, अर्धा वाटी चणाडाळ भिजलेली, पाव चमचा हिंग, 2 चमचे धणेजिरे पावडर, अर्धा वाटी तेल .

कृती – प्रथम एका भांडय़ात दाणे, चणाडाळ एकत्र शिजवून घ्या. अर्धा वाटी तेलापैकी थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, लसूण, शिजवलेले दाणे, चणाडाळ, कढीपत्ता, खोबरं-मुळा, हळद, तिखट, मेथीदाणे घालून चांगले परतून घ्यावा. नंतर बारीक चिरलेला पालक, मेथी टाकून खरपूस परतून घ्यावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळल्यावर थोडी बेसनाची पेस्ट करून घट्ट करावी. चवीनुसार मीठ, चिंच, गूळ घालून उकळून घ्यावी. उरलेल्या तेलात पुन्हा मोहरी, हिंग व बारीक चिरलेला लसूण घालून ती फोडणीवरून भाजीवर घालावी.

आपली प्रतिक्रिया द्या