चौरस आहार

अभिनेता संदेश जाधव. संतुलित जेवणासोबत कांदा, बटाटा भजी आणि मॅगीसुद्धा आवडते.

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – जे चविष्ट आहे.

l खायला काय आवडतं? – चटपटीत कांदा भजी, बटाटा भजी, मॅगी हे पदार्थ विशेष आवडीचे आहेत.

l खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – बऱयाचदा घरचंच जेवण जेवतो. सेटवरही जेवत नाही. माझी बायको पोळी-भाजी, वरण-भात, दही  असा डबा घरूनच देते. पाणीही मी घरूनच घेऊन जातो. गोड जास्त खात नाही. शिवाय दररोज एक तास चालतो.

l डाएट करता का? – आधी करायचो, पण आता करत नाही.

l कोणत्या हॉटेलमध्ये जायला आवडतं?- चेंबूरला रत्नागिरी हॉटेलमध्ये चायनिज आणि शाकाहारी पदार्थ छान मिळतात. त्यामुळे तिथे जातो. मल्हार, आदर्शमध्येही जातो.

l प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – नाटकाच्या दौऱयाला जाताना डबा घेऊन जातो.रात्री प्रयोग संपल्यानंतरच जेवावं लागतं.  रात्री भात खात नाही.

l स्ट्रीट फूड आवडतं का? – शेवपुरी, पाणीपुरी आवडते. आमच्याकडे चेंबूरमध्ये सरोवर नावाचं एक हॉटेल आहे. तिकडे आपल्या हातानेच पाणीपुरी तयार करून खायची असते.

l घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – मटारची भाजी खूप आवडते.  मांसाहारात सुरमई आणि कोलंबी हे खास आवडीचे.

l जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा  काय खायला घालता? – पाहुण्यांची  माशांचीच फर्माईश असते.

 भेंडी मसाला

भेंडी स्वच्छ धुऊन थोडय़ाशा तेलात परतवून घ्यायची. त्यानंतर  तेलात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आवडत असल्यास आणि आलं-लसणाची पेस्ट फोडणीला घालून परतून घ्या. वरून फक्त शेजवान चटणी घालून पुन्हा छानशी परतून घ्या. चवीपुरतं मीठ घाला. हळद अगदी चिमूटभर घालायची. वरून भेंडी घालून वरील मिश्रणात छान एकजीव करा. वाफ येऊ द्या.

आपली प्रतिक्रिया द्या