पश्चिम बंगालमध्ये प्रचार गुंडाळला, एक दिवस आधीच तोफाबंदी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कोलकाता येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोवेळी झालेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील प्रचार एक दिवस आधीच गुंडाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यातील निवडणूक प्रचार गुरुवारी रात्री 10 पासूनच बंद होणार आहे. आयोगाने पहिल्यांदाच कलम 324 चा वापर केला असून, राज्याचे प्रधान सचिव (गृह) आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) यांनाही तातडीने पदावरून हटविले आहे.

मंगळवारी कोलकाता येथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोचे आयोजन केले होते. रोड शो विद्यासागर कॉलेज हॉस्टेलजवळून जात असताना अमित शहा यांच्या दिशेने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काठय़ा भिरकावल्या, ताफ्यावर दगडफेक केली. त्यानंतर भाजप, तृणमूल आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्ते भिडले. दगडफेक, जाळपोळ झाली. या धुमश्चक्रीत महान विचारवंत, समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली. पोलिसांनी यावेळी लाठीहल्ला केला. कोलकाता येथील हिंसाचाराचे बुधवारी दिवसभर राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली गेली. आयोगाकडून काय निर्णय घेतला जातो याचे गौडबंगाल दिवसभर कायम होते. अखेर सायंकाळी निवडणूक आयोगाने एक दिवस आधीच पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार थांबवावा असे आदेश दिले आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 8 राज्यांतील 59 मतदारसंघात 19 मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यातील निवडणूक प्रचार शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी 5 वाजता संपणार आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील नऊ मतदारसंघांतील प्रचार 19 तास आधीच गुरुवारी रात्री 10 वाजता संपेल.

निवडणूक आयोगाने काय म्हटले?
पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटना, विशेषतः गेल्या 24 तासांत जे काही झाले ते पाहता निवडणूक प्रचार गुरुवारी रात्री 10 वाजता समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

महान विचारवंत ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची झालेली तोडफोड वेदनादायी आहे. हिंसाचार भडकविणाऱ्यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. विविध राजकीय पक्षांकडून तक्रारी आल्या आहेत. तसेच आयोगाचे विशेष निरीक्षक अजय नायक (निवृत्त आयएएस) आणि विवेक दुबे (निवृत्त आयपीएस) यांच्या अहवालाच्या आधारे हिंसाचारमुक्त, खुल्या वातावरणात निवडणूक घेण्यासाठी प्रचार
आधीच थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

कश्मीरपेक्षा पश्चिम बंगालमध्ये जास्त हिंसा
हिंसा आणि दहशतकाद म्हटल्यास पहिले नाक कश्मीरचे येते, परंतु कश्मीरमधल्या पंचायत निकडणुकीतही एकढी हिंसा झालेली नाही त्यापेक्षा जास्त हिंसा प. बंगालमध्ये निकडणुकीदरम्यान होत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोडशो दरम्यान घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प. बंगालमधील राजकीय स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

काय आहे कलम 324?
निवडणुका स्वतंत्रपणे आणि खुल्या वातावरणात घेण्यासाठी निवडणूक आयोगाला कलम 324 नुसार काही अधिकार दिले आहेत. हिंसाचाराच्या घटनांनंतर आयोग या कलमाचा वापर करू शकते. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्ती आणि हकालपट्टी करण्याचेही आयोगाला अधिकार आहेत. मात्र, 324 कलमाच्या आधारे निवडणूक प्रचाराचा कालावधी एक दिवस कमी करण्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल असे आयोगाने म्हटले आहे.

नशीब बलवत्तर म्हणून वाचलो!
कोलकत्यामध्ये काल रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराला तृणमूल कांगेसचे कार्यकर्ते व तृणमूलच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच जबाबदार असून, केवळ नशीब बलवत्तर असल्यामुळेच काल मी वाचलो, अशा शब्दांत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आज ममता बॅनर्जींवर घणाघाती टीका केली.