ईसीएम मशीन चोरण्यासाठी इको टॅक्सी टार्गेट, चौघांची टोळी जेरबंद

इको टॅक्सीचे ईसीएम मशीन चोरणाऱ्या इम्रान खान,शफिक शेख, आणि शौकत शेख  आणि त्या मशीन विकत घेणारी एक व्यक्ती अशा चौघांना भायखळा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 93 हजार किमतीच्या 35 ईसीएम मशीन हस्तगत करण्यात आल्या.

भायखळा परिसरात दोन ठिकाणी इको टॅक्सीतील ईसीएम मशीन चोरल्याच्या घटना घडल्या होत्या. वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्हीत चोरटे दिसले. मशीन चोरून टॅक्सीने ते नागपाडा जंक्शनपर्यंत गेले होते. दरम्यान, ते आरोपी ताडदेवच्या तुळशीवाडी परिसरात राहणारे असल्याची माहिती खबऱ्यांनी दिली. ते चोरीच्या उद्देशाने माझगावच्या चंगूमंगू गल्लीत येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्यांना अटक केली.

पाच ते सात हजारांत विक्री

इको टॅक्सीतील ईसीएम मशीन चोरणे अत्यंत सोपे आहे. त्यामुळे आरोपी इको गाडीला टार्गेट करायचे. टॅक्सीचालकाची वेशभूषा करून ते जिथे चोरी करायची तिथे टॅक्सीने जायचे. चोरी केल्यानंतर सात ते आठ हजारांत एक ईसीएम मशीन ते इरफान शेख याला विकायचे. त्यानंतर इरफान त्या चोरीच्या मशीन भंगाराच्या बाजारात विकत होता.