आर्थिक विकासाचा वेग मंदावला; केंद्र सरकारची कबुली

अरुण जेटली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशाच्या आर्थिक विकासात २०१६-१७ मध्ये घसरण झाली आहे. आर्थिक विकासाचा वेग मंदावला असल्याची स्पष्ट कबुली आज केंद्र सरकारने दिली. देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) २०१५-१६ मध्ये ८ टक्के होते. त्यात ०.९ टक्क्यांची घसरण होऊन २०१६-१७ मध्ये जीडीपी ७.१ टक्यांपर्यंत खाली घसरल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सांगितले.

लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासांत अर्थमंत्री जेटली यांनी आर्थिक विकास मंदावला अशी कबुली देतानाच उद्योग आणि सेवा क्षेत्रातही विकासात घसरण झाल्याचे सांगितले. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेतील मंदीमागे विविध कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरण, जीडीपीच्या तुलनेत कमी झालेली फिक्स्ड गुंतवणूक, उद्योग क्षेत्रात कमी झालेली पतवाढ, कॉर्पोरेट क्षेत्रातील घसरण याचा परिणाम देशाच्या जीडीपीवर झाल्याचे जेटली यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०१६ मध्ये जगात झपाट्य़ाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून हिंदुस्थानला पाहिला क्रमांक दिला होता. २०१७ मध्ये हिंदुस्थानचा हा क्रमांक दोनपर्यंत खाली आला आहे, मात्र २०१८-१९ मध्ये अर्थव्यवस्थेला वेग येईल. पायाभूत सुविधा प्रकल्पात सरकारने मोठी वाढ केली आहे. तसेच जीएसटी अंमलबजावणीमुळेही व्यापारउद्योग वाढीला चालना मिळेल असे जेटली म्हणाले.

नोटाबंदीमुळेच वेग मंदावला
८ नोव्हेंबर २०१६ ला केंद्र सरकारने नोटाबंदी केली. नोटाबंदीला एक वर्ष होऊन गेले तरी अर्थव्यवस्था सुरळीत झालेली नाही. हिंदुस्थानचा आर्थिक विकासाचा वेग मंदावला यामागे नोटाबंदीच असल्याचे अर्थतज्ञांचे मत आहे. यासाठी केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या (सीएसओ) आकडेवारीवरून लक्षात येते.
– २०१४-१५ मध्ये देशाचा जीडीपी ७.५ टक्के होता
– नोटाबंदीपूर्वी २०१५-१६ मध्ये जीडीपी तब्बल ८ टक्के होता.
– नोटाबंदीनंतर २०१६-१७ मध्ये जीडीपी सरासरी ७.१ टक्के आहे.
– २०१७-१८ मध्ये तर अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत जीडीपी ५.७ टक्क्यांपर्यंत घसरला. दुसऱ्या तिमाहीत ६.३ टक्के झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या