आर्थिक मंदीच्या फेऱ्यात जग अडकणार

30

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिका, जपान, हिंदुस्थानसह अनेक देश कर्जाच्या डोंगराखाली अडकले असून संपूर्ण जगच आर्थिक मंदीच्या फेऱ्यात पुन्हा अडकण्याचा धोका असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) म्हटले आहे. यावेळी ‘मंदी’बाईचा फेरा आला तर सावरणे कठीण होईल, असा इशाराही आयएमएफने दिला आहे. सध्या जगावर १६४ लाख कोटी डॉलर्स (सुमारे १०६६० लाख कोटी रुपये) एवढे प्रचंड कर्ज आहे. दरम्यान, हिंदुस्थानवर जीडीपीच्या तुलनेत ७०.२ टक्के कर्ज आहे, तर अमेरिकेवर १०८ टक्के आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाच दिवसांपूर्वी जगाची अर्थव्यवस्था २०१८ आणि २०१९ मध्ये ३.९ टक्के या दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला होता, मात्र वाढत्या कर्जामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील असे स्पष्ट केले होते. आज प्रसिद्ध झालेल्या अहवालात थेट जागतिक आर्थिक मंदीचाच इशारा दिला आहे.

विकसनशील देशांपेक्षा विकसित देशांवर जास्त कर्ज

देश              जीडीपीच्या तुलनेत कर्जाचा बोजा
जपान –          २३६ टक्के
इटली –          १३२ टक्के
अमेरिका –      १०८ टक्के
ब्राझील –         ८४ टक्के
हिंदुस्थान –      ७०.२ टक्के
चीन –            ४७.८ टक्के

आयएमएफने काय म्हटले आहे?
– जगभरात सरकारी आणि खासगी कर्जाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आज जगावर १६४ लाख कोटी डॉलर्स (सुमारे १०६६० लाख कोटी रुपये) इतके प्रचंड कर्ज आहे.
– २०११ पासून कर्जाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. जागतिक जीडीपीच्या तुलनेत हे कर्ज २२५ टक्के इतके आहे.
– २००९मध्ये आलेल्या आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका महासत्ता अमेरिका आणि युरोपला बसला. त्याचा परिणाम जगभर झाला होता. २००९ च्या मंदीतून जग अद्याप पूर्णपणे सावरलेले नाही हेच स्पष्ट होते.
– चीनमध्ये खासगी क्षेत्रात वाढत्या कर्जामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
– आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक देशांनी तत्काळ पावले उचलली पाहिजेत, नाहीतर यावेळी आर्थिक मंदी आली तर त्याचा मुकाबला करणे कठीण होईल.
– अमेरिकेत आर्थिक मंदीचा मोठा फटका बसू शकतो. २०२० पर्यंत अमेरिकेची वित्तीय तूट एक लाख कोटी डॉलर्सपर्यंत जाऊ शकते.

विकासाच्या तेजीसाठी क्षमतेपेक्षा जास्त खर्च
विकास प्रकल्पांमध्ये तेजी आणण्यासाठी जास्त खर्च केला जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त खर्च केला जात असल्याने अनेक देशांवर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे. अशा स्थितीत शिखर बँकांकडून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गैरपरंपरागत पद्धत लागू केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या