नागपूमध्ये एम्प्रेस मॉलवर ईडीची कारवाई, 483 कोटींची संपत्ती जप्त

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूरच्या एम्प्रेस मॉलवर अंमलबजानी संचालयाने मंगळवारी कारवाई करून मॉलची 483 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली, या कारवाई मुळे एकच खळबळ माजली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नागपूर विभागाने प्रिव्हेंटेशन ऑफ मॅनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट-2002 (पीएमएलए) अंतर्गत मंगळवारी कारवाई करताना केएसएल अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (केएसएल) या मुंबईशी संबंधित कंपनीच्या नागपुरातील एम्प्रेस मॉलची 483 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.

रकमेचा निवासी संकुल व व्यावसायिक बांधकामासाठी उपयोग
ईडीने जप्त केलेल्या संपत्तीमध्ये एम्प्रेस मॉलमधील 2 लाख 70 हजार 374 चौरस फूट जागेचा समावेश आहे. वर्ष 2002 मध्ये शुक्रवारी तलावाजवळील एम्प्रेस मिल बंद झाल्यानंतर केएसएल इंडस्ट्रीजने मिलची जागा खरेदी केली आणि त्यावर निवासी संकुल व एम्प्रेस मॉल बांधले आहे. केएसएल इंडस्ट्रीजसोबत संबंधित असलेले उद्योजक प्रवीण कुमार तायल हे पूर्वी बँक ऑफ राजस्थानचे अध्यक्ष होते. या समूहाने पुलगाव आणि कळमेश्वर येथील बंद झालेली टेक्सटाईल मिल वर्ष 2010 मध्ये विकत घेतली होती. त्यानंतर जमिनीचा वापर व्यावसायिक आणि निवासी परिसर स्थापन करण्यासाठी केला होता.

दोन बँकेकडून 524 कोटीचे कर्ज
ईडीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तायल समूहांतर्गत कार्यरत अ‍ॅक्टिफ कॉर्पोरेशन लिमिटेड, जयभारत टेक्सटाईल्स अ‍ॅण्ड रियल इस्टेट लिमिटेड, केकेटीएल लि., आणि एक्के नीट (इंडिया) लि. या कंपन्यांनी 2008 मध्ये बँक ऑफ इंडिया आणि आंध्र बँकेकडून 524 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचा एनपीएमध्ये समावेश झाला होता. समूहाने कर्जाऊ घेतलेली रक्कम नंतर शेल (बनावट) कंपन्यांमध्ये वळती केली होती. त्यानंतर ही रक्कम तायल समूहाच्या मुख्यत्वे केएसएल अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला पाठविली होती. समूहाने बँकेतून कर्ज स्वरूपात घेतलेली रक्कम विविध शहरांमध्ये रिअल इस्टेट प्रॉपर्टीजमध्ये मुख्यत्वे शॉपिंग मॉल आणि निवासी संकुल बांधण्यासाठी वापरल्याचा ईडीला संशय आहे. ईडीने 483 कोटी रुपयांच्या एम्प्रेस मॉलची मालमत्ता तात्पुरती जप्त केली असून ही कारवाई गुन्ह्येगारी स्वरूपाची असल्याचे ईडीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.