हसन मुश्रीफांचे घर समजून भलत्याच घरी मारला ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा

बुधवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी केली. ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी घुसण्याआधी भल्या पहाटे एका भलत्याच उद्योगपतीच्या घरात शिरले होते. त्या उद्योगपतीच्या घरी गेल्यानंतर आपण चुकीच्या घरी छापा टाकतोय असे ईडी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिथून काढता पाय घेतला आणि सकाळी सहाच्या सुमारास ते हसन मुश्रीफ यांच्या घरी धडकले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर बुधवारी सकाळी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला. मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीचे जवळपास 20 अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले होते. या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी करण्यात आलेली छापेमापी ही या आरोपांशी निगडीत असल्याचे सांगण्यात येत आहे.