
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर बुधवारी सकाळी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला. मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीचे जवळपास 20 अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले होते. या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी करण्यात आलेली छापेमापी ही या आरोपांशी निगडीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
विरोधकांवर खोटय़ा केसेस ही मोगलाई!
चुकीच्या कामाबाबत कारवाई ही झालीच पाहिजे, परंतु उगीचच कुणी केवळ राजकीय विरोधक आहेत म्हणून खोटय़ा केसेस दाखल करून कुणाला संपविण्याचा प्रयत्न करू पाहत असेल तर ते या महाराष्ट्रात सहन केले जाणार नाही. विरोधकांना अडकविण्यासाठी सुरू असलेली ही मोगलाई आम्ही स्वस्त बसून सहन करणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ईडी सरकारला दिला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षाच्या लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहे. तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱया राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विरोधात जाणीवपूर्वक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न विशेषतः भाजपकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला.
आपल्या नागरिकांसोबत काहीही चुकीचं घडलं असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु उगीचच विरोधकांना त्रास देण्यासाठी जर कोणाला तरी गोवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर तो कुणीही सहन करणार नाही. याआधी अशाचप्रकारे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले हे योग्य नाही. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत कुणालातरी पुढे करुन अशा प्रकारचा गुन्हा दाखल करायला लावणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही, असे अजित पवार म्हणाले.
विरोधकांना जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न
विरोधकांना खोटय़ा प्रकरणात गोवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. आम्ही साडेसतरा वर्षे सत्तेत काम केले आहे. आमच्या काळात विरोधक होते, पण आम्ही असा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे असा प्रयत्न कुणी केला तर जनता हे बारकाईने बघत असते, असे अजित पवार म्हणाले.
…तर महाराष्ट्रात उठाव होईल
विरोधकांना संपवण्याचे प्रकार व्हायला लागले तर यावरून महाराष्ट्रात उठाव होईल. महाराष्ट्र शांत किंवा गप्प बसणार नाही. लोकांनाही कळते आहे की, कशा पद्धतीने गोवण्यात येत आहे आणि इतक्या खालच्या पातळीवर राज्यातील राजकारण जाणार असेल आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर होणार असेल तर आम्हालाही वेगवेगळय़ा आयुधांचा वापर करता येईल. असाच अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मूग गिळून बसलेलो नाही, असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
चूक माझी असो वा इतर कुणाचीही तर त्यावर कारवाई करण्याबाबत कुणाचंही दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण मुद्दाम कुभाड रचून कोणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. कुणाला तरी उभं करून तक्रार द्यायला लावणं आणि नंतर कारवाई करणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही.
अजित पवार विरोधी पक्षनेते