ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ईडीचा छापा, फायनलनंतर TMC नेत्यानं दिली ‘ब्रेकिंग न्यूज’

आयसीसी वन डे विश्वचषकाच्या अंतिम लढतीत हिंदुस्थानला पराभव सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवत सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. यामुळे क्रीडा चाहत्यांच्या अश्रूंचा बांध फुटला असून सोशल मीडियावर यावर प्रतिक्रियाही उमटत आहेत. याच दरम्यान, लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा एक ट्विट करत मोदी सरकारला कोपरखळी मारली आहे.

ब्रेकिंग न्यूज, ईडीने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांच्या निवासस्थानावर छापा टाकला आहे. दुसरी बातमी अशी की अहमदाबाद स्टेडियमचे नाव बदलण्यात आले असून टीम इंडिया जवानर लाल नेहरू क्रिकेट स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना हरला, असे ट्विट खासदार महुआ मोईत्रा यांनी एक्स (ट्विटर) वर केले आहे.

ही वाचा – महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस, हिवाळी अधिवेशनात चर्चा आणि मतदान

ईडी, सीबीआय, आयटी या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात केला जातो, असा आरोप अनेकदा विरोधी पक्षांनी केला आहे. एवढेच नाही तर गेल्या काही वर्षात अनेक नेत्यांच्या घरी ईडी, सीबीआय, आयटीचे छापेही पडले आहेत. बदला घेण्याच्या भावनेने या कारवाया सुरू असल्याचा आरोप विरोधक करतात. यावरूनच महुआ मोइत्रा यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, बीएसपी खासदार दानिश अली यांनीही वर्ल्डकप फायनलवर प्रतिक्रिया दिली आहे. आपला संघ विजयाच्या जवळ होता, परंतु खेळाडू मानसिक दबावात होते, त्यामुळे आपण पराभूत झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी सामना पाहण्यासाठी मैदानात येणार असल्याची घोषणा करण्याची आवश्यकता नव्हती. देशासाठी अशा गोष्टींपासून त्यांनी दूर राहिले पाहिजे आणि टीव्हीवर खेळाडू व शास्त्रज्ञांचे कौतुक करावे, असा टोला दानिश अली यांनी लगावला.