कार्ती चिदंबरम यांच्या घरावर ईडीचे छापे

26
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नई आणि दिल्ली येथील घरावर व तीन कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे मारले. एअरसेल- मॅक्सिस केसच्या मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीने शनिवारी सकाळी त्यांच्या घरावर छापे मारून शोध कारवाई केली. दिल्लीतील एका निवासस्थानावर व चेन्नईतील एक निवासस्थान व तीन कार्यांलयावर छापे मारण्यात आले आहेत.
कार्ती चिदंबरम यांना गुरूवारीच ईडीकडून १६ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला होता. मात्र त्यापूर्वी शनिवारी पहाटे साडे सातच्या सुमारास कार्ती यांच्या घरांवर छापे मारले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल साडे तीन तास त्यांच्या घरात शोधकारवाई केली. ११ वाजेपर्यंत ही शोधकारवाई सुरू होती. या छाप्याच्या वेळी ईडीच्या हाती काहीच लागले नसल्याचा दावा कार्तीच्या वकिलांनी केला आहे.
या प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात मे २०१७ मध्ये मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर २०१७ रोजी कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली व चेन्नई येथील काही संपत्ती ईडीने ताब्यात घेतल्या होत्या.
आपली प्रतिक्रिया द्या