ईडीचं पथक मला अटक करण्यासाठी घरी पोहोचलंय! ‘आप’च्या आमदाराचा दावा, झुकणार नसल्याचा इशारा

आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी सोमवारी सकाळी मोठा दावा केला. सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) पथक मला अटक करायला घरी पोहोचले असल्याचे ट्विट अमानतुल्लाह खान यांनी साडे सहाच्या  सुमारास केले. सध्या ईडीचे पथक त्यांच्या घरी दाखल झाले असून अमानतुल्लाह खान यांच्या घराबाहेर दिल्ली पोलिसांचा फौजफाटा आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

अमानतुल्लाह खान हे दिल्लीतील ओखला मतदारसंघाचे आमदार आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी ट्विट करत ईडीचे पथक घरी पोहोचल्याची माहिती दिली. “आज सकाळी हुकूमशहाच्या आदेशावरून त्यांची कठपुतली असणारी ईडी माझ्या घरी पोहोचली आहे. जनतेच्या प्रामाणिकपणे सेवा करणे हा गुन्हा आहे का? ही हुकूमशाही आणखी किती दिवस चालणार?”, असा सवाल करत अमनातुल्लाह खान यांनी एक व्हिडीओही शेअर केला.

यात ते म्हणतात की, ईडीचे पथक सर्च वॉरंटच्या नावाखाली मला अटक करण्यासाठी आले आहे. माझी आई आजारी असून तिला कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. चार दिवसांपूर्वीच तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. मी प्रत्येक नोटीसचे उत्तर ईडीला दिलेले आहे. मात्र सर्च वॉरंटच्या नावाखाली मला अटक करण्याचे षड्यंत्र सुरू आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तपास यंत्रणा माझा छळ करत असून माझ्यावर खोटे खटले दाखल करत आहे. मलाच नाही तर संपूर्ण पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण हुकूमशहापुढे आम्ही झुकणार नाही, तुटणार नाही आणि घाबरणार नाही, असे म्हणत अमानतुल्लाह खान यांनी तसेच कोर्टावर आपला विश्वास असल्याचे म्हटले.

दरम्यान, गेल्या एक वर्षापासून दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी सुरू असून आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांना तुरुंगवासही झाला आहे. यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांचाही समावेश आहे.