संप पेटला!

रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक दडपण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला जात असेल तर सरकारने आपल्या श्राद्धाची तिथी निश्चित केली आहे, असे मानायला हरकत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या मालास हमीभाव हवा आहे. सातबारा कोरा करून हवा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. हे इच्छाशक्तीचे टॉनिकदिल्लीहून मिळाले की, प्रश्न सुटेल. शेतकऱ्यांचा संप पेटला आहे. तो चिघळू नये अशी आमची इच्छा आहे. सरकारची इच्छा काय आहे?

शेतकरी संपावर गेला तरी फरक पडत नाही. अन्नधान्य कमी पडले तर आयात करू, असे आज सरकार पक्षाच्या वतीने बोलले जात आहे. शेतकऱयांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. एका बाजूला ‘मेक इन इंडिया’सारख्या घोषणांचा पाऊस पाडायचा आणि त्याच वेळी अन्नधान्य आयात करण्याच्या गोष्टी करून शेतकऱयांचा स्वाभिमान डिवचायचा. हे पाप गोहत्येपेक्षा भयंकर आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संपावर गेला आहे. एका जिल्हय़ात सुरू झालेल्या संपाचे लोण राज्यभरात पसरत आहे. पंतप्रधान मोदी हे जगाचे प्रश्न सोडविण्यासाठी चार-पाच देशांच्या दौऱयावर आहेत. तेथे जागतिक नेत्यांशी त्यांच्या चर्चा यशस्वी होत आहेत, पण महाराष्ट्रात शेतकऱयांशी चर्चा यशस्वी होत नाही व वातावरण चिघळले आहे. येवल्यात शेतकऱयांवर गोळीबार झाला आहे. पुण्यातील पोलिसांनी संपकरी शेतकऱयांचे नेते डॉ. अमोल वाघमारे यांना पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केली आहे. रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱयांचा उद्रेक दडपण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला जात असेल तर सरकारने आपल्या श्राद्धाची तिथी निश्चित केली आहे, असे मानायला हरकत नाही. शेतकऱयांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला आहे. दूध रस्त्यावर ओतले आहे. बाजारात शुकशुकाट आहे. पुणतांब्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत संपकऱयांशी चर्चा करायला गेले. त्यांना हात हलवत परत यावे लागले. शेतकऱयांना त्यांच्या मालास हमीभाव हवा आहे. सातबारा कोरा करून हवा आहे. सुपीक जमिनीचा बळजबरीने ताबा घेऊन

विकासाची समृद्धी स्मशाने

उभी करू नका ही शेतकऱयांची मागणी आहे, पण सरकारच्या डोक्यात यापैकी काहीएक शिरायला तयार नाही. बळजबरी व दडपशाहीने संप मोडण्याचे त्यांचे प्रयत्न निर्घृण आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अंगात ‘मोरारजी’ संचारू नये अशी आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे. मुख्यमंत्र्यांना असे वाटते की, शेतकरी संपाचे राजकारण केले जात आहे व शेतकऱयांना चिथावणी दिली जात आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकऱयांच्या वतीने विचारू इच्छितो, ‘‘साहेब, विरोधी पक्षाचे नेते असताना शेतकऱयांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळायलाच हवी असे कोणी सांगितले होते? तुमचीच भाषणे एकदा तपासून पाहा.’’ सत्तेवर येताच कोलांटउडी मारणे हाच राजधर्म असेल तर मंत्रालयाच्या दारातच कर्जमाफी मागणाऱया शेतकऱयांसाठी वधस्तंभ तयार करा. वास्तविक राज्यातील शेतकरी स्वखुशीने संपावर गेलेला नाही. शेतकऱयांच्या संपाचे नेतृत्व कोणताही राजकीय पक्ष करीत नसून शेतकरी हाच त्यांच्या आंदोलनाचा नेता झाला आहे. तेव्हा शेतकरी संपावर गेला तरी हरकत नाही, असे सांगणे हे शेतकऱयांच्या स्वाभिमानाची खिल्ली उडविण्यासारखेच आहे. ज्यांनी शेतीतल्या मातीस कधी हात लावला नाही अशा लोकांचे हे उद्गार आहेत. त्यांना आम्हाला इतकेच सांगायचे आहे की, बाबांनो, हा जसा आर्थिक प्रश्न आहे तसाच तो भावनेचाही आहे. बळीराजा शेती धंदा म्हणून जशी करतो तसेच कर्तव्य म्हणूनही करतोय. तो शेतीला माती, बैलाला पशू, तिफणीला वस्तू, नांगराला लाकूड मानीत नाही. शेतीला तो आईच्या रूपात मानतो. ‘काळी आई’ हा शब्द त्याच भावनेतून जन्माला आला आहे.

शेतकऱयांच्या या भावना

सरकारने समजून घेतल्याच पाहिजेत. मात्र त्या समजून न घेता अन्नधान्य रस्त्यावर फेकून देणारा शेतकरी असूच शकत नाही, अशी पोपटपंची सरकारभक्तांनी आता सुरू केली आहे. मग काय हो भगतगणांनो, शेती परवडत नाही व कर्ज वाढले म्हणून फासावर जाणारासुद्धा तुमच्या या तर्कटानुसार शेतकरी असूच शकत नाही. खरे म्हणजे आत्महत्या केलेल्या हजारो शेतकऱयांच्या दुःखाचे भांडवल करून आजची सत्ता तुम्ही भोगत आहात. काँग्रेस राजवटीतही शेतकरी आंदोलन करीत होता व दूध, टोमॅटो, कांदा रस्त्यावर फेकून निषेध करीत होता. तेव्हा हे असे अन्न-धान्य रस्त्यावर फेकून देणारा शेतकरी असूच शकत नाही, असे हे भगतगण का बोलत नव्हते? त्यावेळी आंदोलक शेतकऱयांना पाठिंबा देणारे आज शेतकऱयांचे असे वैरी का बनले आहेत? सत्तेच्या जहाल नशेने त्यांची डोकी कामातून गेली आहेत व सामान्यांच्या प्रश्नात सरकारला विरोधकांचे राजकारण दिसत आहे. अर्थात राजकारण कोणी कोणास शिकवायचे हा तसा प्रश्नच आहे. शेतकऱयांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांनी बारामतीत ठिय्या मांडून गोंधळ घातला होता तेव्हा त्यांना पाठिंबा देणारे कोण होते? बारामतीत महादेव जानकर हे धनगरांच्या प्रश्नांसाठी उपोषणास बसले होते तेव्हा धनगरांचे सर्व प्रश्न सोडवतो, असे वचन देऊन राजकारण करणारे कोण होते? मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकपणाविषयी आमच्या मनात शंका नाही. शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. हे इच्छाशक्तीचे ‘टॉनिक’ दिल्लीहून मिळाले की, प्रश्न सुटेल. शेतकऱयांचा संप पेटला आहे. तो चिघळू नये अशी आमची इच्छा आहे. सरकारची इच्छा काय आहे?