ठसा : माधवराव भिडे

>> विकास काटदरे

मराठी उद्योगक्षेत्रापुरता विचार केला तर मराठी उद्योजकांना एकत्र आणून त्यात मैत्रीचे नाते निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग ज्येष्ठ उद्योगपती माधवराव भिडे यांनी केला. त्यांनी स्थापन केलेला ‘सॅटर्डे क्लब’ हे त्याचेच उदाहरण म्हणता येईल. मराठी तरुणांनी उद्योजक किंवा व्यावसायिक होण्याचे स्वप्न पाहावे, ते प्रत्यक्षात आणावे, त्यात पाय रोवून उभे राहावे आणि यशस्वी होत संपत्ती निर्माण करावी या एका भूमिकेतून माधवरावांनी इसवी सन २००० मध्ये ‘सॅटर्डे क्लब’ची स्थापना केली. अर्थात मराठी उद्योजकांनी स्वतःसोबत इतर व्यावसायिक सदस्यांनाही मदतीचा हात पुढे करावा आणि एकूणच मराठी उद्योगक्षेत्र भरभराटीला न्यावे हा व्यापक हेतू भिडे यांचा होता. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. सॅटर्डे क्लबचा आजचा विस्तार पाहता भिडे यांचे संघटन कौशल्य, माणसे जोडण्याची कला, अफाट जनसंपर्क, ठरवलेले काम पूर्ण करण्याचा निर्धार, त्यासाठी लागणारा उत्साह आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी हे अंगभूत गुण सहज लक्षात येतात. त्यांच्या या मेहनतीमुळेच सॅटर्डे क्लबच्या आज ४५ हून अधिक शाखा आहेत. तसेच त्याची उद्योजक सदस्य संख्यादेखील १ हजार ७००च्या आसपास आहेत.

या क्लबची स्थापना आणि प्रसार भिडे यांनी सेवानिवृत्तीनंतर केली हे विशेष. रेल्वेत काम करताना अनेक प्रकल्पांचा समृद्ध अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने त्याच पद्धतीने पुढेही त्यांनी काम केले. रेल्वेमध्ये असताना दिवा-डोंबिवली-वसई रेल्वे मार्ग प्रकल्प तसेच वांद्रे-खार हार्बर मार्गाचा अंधेरीपर्यंतचा विस्तार, त्यासाठी ‘प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट’ पद्धतीचा पूल हिंदुस्थानी रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच बांधण्यात आला. या अभियांत्रिकी आणि प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर निवृत्तीनंतर त्यांनी भिडे असोसिएटस् ही सल्लागार संस्था नावारूपाला आणली. या संस्थेच्याही देशभरात १५ शाखा झाल्या. पुढे त्यांनी ‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रीज इंजिनीयर्स’ (आयबीबीई) स्थापन केली. ज्या वयात माणसे सेवानिवृत्तीचे आरामदायी जीवन जगतात त्या वयात माधवराव भिडे यांनी दोन महत्त्वाच्या संस्था उभ्या केल्या, त्या वाढवल्या, त्यातून मराठी उद्योजकतेची उभारणी केली. त्यांच्या निधनाने मराठी उद्योगक्षेत्राला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.