विजयाचे आत्मचिंतन!

22

काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेशातील पोटनिवडणुका जिंकल्या. कारण सत्ताधाऱ्यांविषयी संताप व चीड होती. काँग्रेसविषयी लोकांच्या मनात प्रेम उफाळले म्हणून तेथे भाजपचा पराभव झाला असे नाही. त्रिपुरातही भारतीय जनता पक्षाविषयी प्रेमाची सुनामी आली म्हणून डाव्यांचा पराभव झाला असे नाही, तर गरिबीत खितपत पडलेल्या लोकांनी गरिबीच्या विरुद्ध बंड केले व श्रीमंतीच्या स्वप्नांचा पाठलाग सुरू केला. देशातील जनतेने २०१४ साली हाच पाठलाग सुरू केला. तो अद्याप संपलेला नाही. ईशान्येकडील त्रिपुरासारखी राज्ये आता या मोहिमेत सामील झाली. विजयाचा उत्सव संपवून आता चिंतनाचा योग करावा.

ईशान्येतील विधानसभा निवडणुकांचा विजयोत्सव आणखी काही दिवस सुरूच राहील. राजा उत्सवात मग्न असला तरी प्रजा भूक, रोजगाराच्या समस्यांनी तळमळत आहे. त्रिपुरा – नागालॅण्डचा विजय हा भूक, रोजगाराच्या समस्यांवरील उतारा नव्हे. त्रिपुरात डाव्यांचे सरकार होते, पण गरिबी, रोजगाराचे प्रश्न सुटले नाहीत. त्रिपुरातील संपूर्ण काँग्रेस भाजपात विलीन झाली व त्या आधारावर त्रिपुरात विजय मिळाला. हे सत्य असले तरी त्रिपुरात वर्षानुवर्षे राज करणाऱ्यांचा नाकर्तेपणा व लोकांना गृहीत धरून राजकारण करण्याचा रोगच भाजप विजयास कारणीभूत ठरला, पण शेवटी विजय हा विजय असतो. भाजपने ईशान्येकडील राज्यांत विजय मिळवून उत्सव सुरू केला असला तरी देशासमोर भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची सुटका त्यामुळे खरेच होईल काय? जे हरले त्यांनी पराभवाचे आत्मचिंतन करावे असे सांगितले गेले, पण पराभवापेक्षा विजयाचे आत्मचिंतन करायला हवे. काँग्रेस किंवा डावे हे मुळापासून का उखडले जात आहेत हा आत्मचिंतनाचा विषय आहे. ‘गरिबी हटाव’चा नारा देऊन गरिबी हटली नाही व ‘अच्छे दिन’चा वादा करून ‘अच्छे दिन’ आले नाहीत. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेतकरी काँग्रेस राजवटीतही मरत होता व तो आताही तडफडतोय आणि मरतोय. कश्मीरात रोज रक्त सांडते आहे ते आपल्याच जवानांचे. त्रिपुरातील विजयोत्सव या

सर्व समस्यांवरचा उतारा
असेल तर तसे सरकारने जाहीर करायला हवे व देशाला सात दिवसांची राष्ट्रीय सुट्टी देऊन विजयोत्सवात सामील होण्याचे फर्मान काढले पाहिजे. काँग्रेस राजवटीत केतन पारेख, विजय मल्ल्या झाले. आता नीरव मोदी व मेहुल चोक्सींनी ‘झेप’ घेतली आहे. त्रिपुरातील विजयाने नीरव मोदी यास बेड्य़ा पडणार आहेत काय व त्याने बँकांचे बुडवलेले हजारो कोटी रुपये वसूल होणार आहेत काय? चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्य़ातील एका कुटुंबाने विषप्राशन करून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाचा हा बळी आहे. असे बळी रोज जात आहेत, बेरोजगारांचा आकडा फुगत आहे. अर्थव्यवस्थेचा पाया खचला आहे व सरकारात कामे करून ‘देणाऱ्या व घेणाऱ्या’ राजकीय दलालांच्या संपत्तीत शतपटीने वाढ होत आहे. चिदंबरम पुत्र कार्ती सीबीआयच्या जाळ्य़ात अडकले, पण नव्या राजवटीतही ‘कार्ती’ बियाणे जोरात आहे व त्रिपुरातील विजयाने या सर्व गोष्टींना आळा बसणार नाही. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार स्वच्छ व साधे होते. ते सायकलवरून प्रवास करीत व त्यांचे घर फक्त पाच हजार रुपयांत चालत होते, पण त्यांच्या साधेपणाचा ‘त्रिपुरा’ला राज्य म्हणून काय उपयोग? त्यांच्या साधेपणाने त्रिपुरातील गरिबी, बेरोजगारी संपली नाही व त्रिपुरातील राजधानीत साधे डांबरी रस्तेही ते निर्माण करू शकले नाहीत. ‘‘मी गरीब आहे. त्यामुळे राज्याने व जनतेनेही गरीब राहावे’’ या भूमिकेचा

तिटकारा आलेल्या जनतेने
माणिक सरकार यांची राजवट उलथवून लावली. राज्यकर्ता हा लोकांची गरिबी दूर करण्यासाठी असतो, गरिबीचे प्रदर्शन करून मते मिळविण्यासाठी नसतो. प. बंगालात डाव्यांना त्यामुळेच जावे लागले व आता त्रिपुराही गेले. त्रिपुरातील लोकांना भाजपने स्वप्ने दाखवली. त्या स्वप्नांचे मृगजळ ठरू नये. त्रिपुरात उद्योग व्हावेत, दळणवळण वाढावे. मोदी हे अंगात किमती कपडे घालतात तसे कपडे व जीवनमान त्रिपुरातील जनतेच्या नशिबी यावे. माणिक सरकार यांनी गरिबी दाखवली म्हणून त्रिपुरातील जनता कमळाच्या श्रीमंतीकडे आकर्षित झाली. माणिक सरकार यांनी जनतेला ‘नरक’ हाच स्वर्ग असल्याचे भासवले व भाजपने त्यांना खऱ्या स्वर्गाचे चित्र दाखवले. मानवी स्वभावानुसार लोक मोहमायेच्या मागे लागतात. त्यामुळे ईशान्येतील विजयाचे आत्मचिंतन करावेच लागेल. त्रिपुरातील विजयाचा आनंद आम्हीही व्यक्त केलाच आहे. काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेशातील पोटनिवडणुका जिंकल्या. कारण सत्ताधाऱ्यांविषयी संताप व चीड होती. काँग्रेसविषयी लोकांच्या मनात प्रेम उफाळले म्हणून तेथे भाजपचा पराभव झाला असे नाही. त्रिपुरातही भारतीय जनता पक्षाविषयी प्रेमाची सुनामी आली म्हणून डाव्यांचा पराभव झाला असे नाही, तर गरिबीत खितपत पडलेल्या लोकांनी गरिबीच्या विरुद्ध बंड केले व श्रीमंतीच्या स्वप्नांचा पाठलाग सुरू केला. देशातील जनतेने २०१४ साली हाच पाठलाग सुरू केला. तो अद्याप संपलेला नाही. ईशान्येकडील त्रिपुरासारखी राज्ये आता या मोहिमेत सामील झाली. विजयाचा उत्सव संपवून आता चिंतनाचा योग करावा.

आपली प्रतिक्रिया द्या