मृत्यूचे तांडव थांबवा!

महाराष्ट्रात दरवर्षी ६० हजारांहून अधिक अपघात होतात आणि १२ ते १५ हजार लोकांचे यात हकनाक बळी जातात. अपघाती मृत्यूंची ही संख्या मन हेलावून टाकणारी आहे. सामान्य माणसाच्या आयुष्याला काही किंमत उरली आहे की नाही, असा प्रश्न हे सरकारी आकडे पाहिल्यावर पडतो. अपघाताच्या ताज्या घटनांनंतर तरी ठोसऍक्शन प्लॅनराबवून रस्ते अपघातांतील मृत्यूचे हे तांडव थांबवायलाच हवे!

अपघातात जाणारे बळी हा आपल्या देशातील अत्यंत गहन प्रश्न झाला आहे. अपघातांमध्ये रोज मृत्युमुखी पडणारे लोक आणि अपघाताची वर्णने वाचून मन सुन्न होते. गेल्या २४ तासांत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये झालेले वेगवेगळे अपघातही मन विषण्ण करणारे आहेत. या अपघातांमध्ये २१ लोकांनी आपले प्राण गमावले. रविवारी पहाटे गुजरातच्या धुंधका-बरवला महामार्गावर डोंबिवलीच्या शहा कुटुंबावर काळाने झडप घातली. पर्युषणाच्या समाप्तीनिमित्त पलिताना येथील मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या शहा कुटुंबीयांच्या जीपला एका भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली आणि क्षणार्धात एक हसतेखेळते कुटुंब संपले. या अपघातात १२ जणांचा दुर्दैवी अंत झाला. ट्रकचालकाच्या बेफाम गतीने त्यांचा बळी घेतला. वाहनचालकाची एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते याचे हे भयंकर उदाहरण आहे. नाशिक-पुणे महामार्गावर झालेली दुसरी दुर्घटनाही अंगावर शहारे आणणारी आहे. महामार्गावर पंक्चर झालेल्या एका ट्रकमुळे ९ जणांचे जीव गेले. पंक्चर झालेल्या ट्रकचे चाक बदलण्यासाठी रस्त्याच्या बाजूला जॅक लावण्याचे काम सुरू असतानाच पाठीमागून येणारी त्र्यंबकेश्वर-पुणे ही एसटी महामंडळाची बस या ट्रकवर आदळली. रात्री एक-दीडचा सुमार होता. बसमधील प्रवासी निद्राधीन झाले होते. काही कळायच्या आत ट्रकवर धडकलेली

बस मधोमध कापली

गेली आणि एका क्षणात बसमधील ७ प्रवासी आणि ट्रकचा चालक, क्लीनर असे ९ जण ठार झाले. अपघाताच्या अशा घटना सातत्याने घडत आहेत. दुर्घटना झाल्यावर पोलीस येतात, पंचनामे होतात, जखमींना रुग्णालयात हलवणे, मृतदेहांची उत्तरीय तपासणी वगैरे सोपस्कार पार पाडले जातात. या सगळ्या तांत्रिकतेचे एक सरावलेपण प्रशासनाने स्वीकारले आहे. मात्र दुर्घटनांच्या मुळाशी जाऊन नेमकी चूक कुठे झाली, वाहतुकीच्या कुठल्या नियमांचे उल्लंघन झाले, काय केले असते तर अपघात टाळता आला असता आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी काय करायला हवे, यावर फारसा ऊहापोह होत नाही. जखमी आणि मृतदेह उचलून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा मोकळा केला की प्रशासनाचे काम संपले, असे नाही. मात्र दुर्दैव असे की, प्रशासन या जबाबदारीच्या पुढे सरकायलाच तयार नाही. महामार्गांवरील वाहतुकीच्या नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन अपघातांच्या वाढत्या संख्येला जबाबदार असतानाही प्रशासन त्यापासून धडा घ्यायला तयार नाही. महामार्गांवर सामान्य लोक असे किडय़ामुंग्यांप्रमाणे अपघातांमध्ये मारले जात असताना डोळय़ांवर झापड लावून कसे चालेल? अतिवेग, पुढे जाण्याची घाई आणि

बेदरकारपणे वाहने चालवण्याचा उन्माद

यामुळे वाहनचालक आपला जीव तर धोक्यात घालतच असतात; पण इतरांच्या मृत्यूलाही ते कारणीभूत ठरतात. पुन्हा विदेशाप्रमाणे आपल्याकडे महामार्गांवर धावणाऱ्या वाहनांवर २४ तास निगराणी किंवा टेहळणी असा काही प्रकार नसल्यामुळे वाहनचालकांना कुठलाच धरबंध राहिला नाही. अवजड वाहनांना समोरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे, दोन्ही बाजूंना पिवळ्या रंगाचे आणि मागच्या बाजूला लाल रंगाचे ‘रिफ्लेक्टर्स’ लावणे कायद्याने बंधनकारक आहे. रेडियमच्या या पट्टय़ा दूर अंतरावरूनच चमकतात आणि मागचे-पुढचे वाहनचालक सावध होतात. थांबलेल्या वाहनावर दुसरे वाहन आदळू नये, यासाठी हे ‘रिफ्लेक्टर्स’ आवश्यक असतात. तथापि, ५-१० रुपयांना मिळणाऱ्या या रेडियमच्या पट्टय़ा आपल्या वाहनांना लावण्याचे सौजन्यही दाखवले जात नाही. या साध्या नियमाचे पालन केले तरी पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातांसारख्या शेकडो दुर्घटना टळू शकतील. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य आजही दुर्दैवाने महामार्गांवरील अपघातांच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात दरवर्षी ६० हजारांहून अधिक अपघात होतात आणि १२ ते १५ हजार लोकांचे यात हकनाक बळी जातात. अपघाती मृत्यूंची ही संख्या मन हेलावून टाकणारी आहे. सामान्य माणसाच्या आयुष्याला काही किंमत उरली आहे की नाही, असा प्रश्न हे सरकारी आकडे पाहिल्यावर पडतो. अपघाताच्या ताज्या घटनांनंतर तरी ठोस ‘ऍक्शन प्लॅन’ राबवून रस्ते अपघातांतील मृत्यूचे हे तांडव थांबवायलाच हवे!

आपली प्रतिक्रिया द्या