आणखी एक यादी!

पाकडय़ांनी दाऊदचे वास्तव्य नाकारणे किंवा हाफीज सईदने तो दहशतवादी नसल्याचा कांगावा करणे हा त्यांच्या ‘चोर तो चोर वर शिरजोर’ या नेहमीच्या धोरणाला धरूनच आहे. युनोच्या यादीमुळे दहशतवाद पोसण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेत बदल होईल किंवा हाफीज सईद ‘अहिंसेचा पुजारी’ बनेल असे नाही. आणखी एक यादी एवढेच संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीबाबत म्हणता येईल.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘मोस्ट वॉण्टेड’ दहशतवाद्यांच्या यादीत तब्बल १३९ पाकिस्तानी आहेत. शिवाय कुख्यात दाऊद इब्राहिम आणि मुंबईतील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यांचाही समावेश या यादीमध्ये आहे. तसेच दाऊदचा कराचीतील पत्ताही या यादीत दिला आहे. या माहितीत नवीन काय आहे? संयुक्त राष्ट्रसंघाने कुठला नवीन शोध लावला असे अजिबात नाही. या यादीत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा भरणा मोठा असणे काय किंवा दाऊद पाकिस्तानातच असल्याचा दावा करणे काय हा शिळय़ा कढीला पुन्हा ऊत देण्याचाच प्रकार आहे. पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे नंदनवन आहे. दहशतवादी बनविण्याचा एक कारखाना म्हणून पाकिस्तान कुख्यात झाले आहे हे एक ‘उघड सत्य’ आहे. ज्या अमेरिकेने पाकिस्तानच्या या दुष्कर्मांकडे डोळेझाक करून त्या देशाला कालपर्यंत पोसले, अब्जावधी डॉलर्सचे अर्थसहाय्य त्या देशाच्या झोळीत टाकले त्या अमेरिकेलाही पाकिस्तान दहशतवाद्यांचा पोशिंदा असल्याचे आता जाहीरपणे मान्य करावे लागले. तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोस्ट वॉण्टेड यादीमुळे पाकिस्तानविषयीच्या ‘नापाक’ सत्याचा कोंबडा पुन्हा आरवला इतकेच म्हणता येईल. दाऊद पाकिस्तानातच असल्याचा दावा हिंदुस्थान नेहमीच करीत आला आहे. त्याचे पुरावे वगैरे दिल्याचे आपले सरकार सतत सांगत असते. पाकिस्तान मात्र त्याबाबत कायम नकारघंटाच वाजवीत असतो. त्यामुळे आता संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले म्हणून पाकड्यांची नियत बदलेल असे समजण्याचे कारण नाही. पुन्हा ‘मी दहशतवादी नाही, माझे नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीतून वगळा’ अशी उलटी बोंब हाफीज सईद हा गेल्या वर्षापासूनच मारीत आहे. तशी मागणीच त्याने संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली आहे. पाकड्यांनी दाऊदचे वास्तव्य नाकारणे किंवा हाफीज सईदने तो दहशतवादी नसल्याचा कांगावा करणे हा त्यांच्या ‘चोर तो चोर वर शिरजोर’ या नेहमीच्या धोरणाला धरूनच आहे. युनोच्या यादीमुळे दहशतवाद पोसण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेत बदल होईल किंवा हाफीज सईद ‘अहिंसेचा पुजारी’ बनेल असे नाही. आणखी एक यादी एवढेच संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीबाबत म्हणता येईल.

अंदाजाचा ‘शिडकावा’

यंदाचा पावसाळा समाधानकारक असेल या अंदाजाचा ‘शिडकावा’ शेतकरी, सरकार आणि जनतेसाठी नक्कीच दिलासादायक म्हणावा लागेल. ‘स्कायमेट’ या संस्थेने हा अंदाज वर्तवला असून देशभरात ९६ ते १०४ टक्के पाऊस या वर्षी होईल असे म्हटले आहे. हवामान खात्याच्या अंदाजांबद्दल, त्यातही मान्सूनविषयक अंदाजांबाबत पूर्वानुभव फारसा समाधानकारक नाही. मात्र मान्सून चांगला बरसणार हा अंदाजही पाणीटंचाई, दुष्काळ, नापिकी, रोगराई आणि कर्जबाजारीपणाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजाला दिलासा देऊन जातो. त्याची खरिपाची उमेद वाढवतो. कारण मान्सून हा लहरीपणासाठी कुप्रसिद्ध आहे. त्याच्या लहरी ‘सरी’ कशा आणि किती कोसळतील या अनिश्चिततेचे ओझे उरावर घेऊनच बळीराजाला पिके घ्यावी लागतात. त्यामुळे मान्सूनचा अंदाज, तो प्रवेश कधी करणार, देशभरात कधी पसरणार आणि मुख्य म्हणजे किती प्रमाणात बरसणार या तपशिलाबाबत शेतकरी दरवषीं एप्रिल-मेपासूनच डोळे लावून बसलेला असतो. त्यामुळे या वर्षी ‘स्कायमेट’चा अंदाज खरा ठरो आणि वरुणराजा कृपा‘वृष्टी’ करो अशीच प्रार्थना शेतकरी करीत असेल. कारण वर्षानुवर्षे हवामान खात्याची ‘भाकिते’ आणि मान्सूनचा लहरीपणा याच कोंडीत येथील शेतकरी भरडला जात आहे. सिंचन आणि जलसंधारण म्हणा किंवा कृषी धोरण म्हणा, मागील चार-पाच दशकांत ठोस असे काहीच न झाल्याने राज्यातील शेती आजही ‘मान्सून भरोसे’च आहे. बरे, ना हा भरोसा आपल्या हातात ना हवामान खात्याची भाकिते! आधुनिक तंत्रप्रणाली असलेले उपग्रह आपण यशस्वीपणे अवकाशात सोडत असलो तरी मान्सूनचा अंदाज आणि त्याचे प्रत्यक्ष बरसणे याचे अचूक गणित ना हवामान खात्याला आजपर्यंत जमले आहे ना मान्सूनने आपला लहरीपणा सोडून सुखद धक्का दिला आहे. अशावेळी ‘यंदा समाधानकारक पाऊस होणार’ या अंदाजाचा ‘शिडकावा’ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक म्हणता येईल.