गैरसोयींचे स्थानक

  • शशिकांत दामोदर जोशी

रचेवर पनवेल येथे जाणे होते. त्यावेळी पनवेल स्थानकावरील पादचारी पुलावर जी समस्या येते ती येथे देत आहे. पनवेलला प्लॅटफॉर्म नं. १ ते ४ हे लोकलसाठी आहेत व ५, ६, ७ हे मेल, एक्प्रेस, कोकण रेल्वेसाठी आहेत. प्लॅटफॉर्म नं. ५ वरील एक पादचारी पुलावर जाऊन मेन पुलाला जो पूर्व-पश्चिमेला जोडतो, त्याला जाऊन मिळतो. जेव्हा एखादी लोकल येते तेव्हा लोकलमधील प्रवासी या ५ नं.च्या पुलावरूनच पूर्वेकडे जाण्यासाठी गर्दी करतात व त्याच वेळेस प्लॅटफॉर्म नं. ५ वर एखादी मेल, एक्प्रेस, कोकण रेल्वे आल्यास त्यातील बाहेर पडणारे प्रवासी यांची एकच झुंबड त्या ५ नं.वरील पुलावर उडते व त्यातच लोकल पकडण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांची उतरण्यासाठी चाललेली धडपड या परिस्थितीत एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना घडणे दूर नाही. पनवेलच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार रेल्वेने वेळेतच करावा. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढील सूचनांचा जरूर विचार करावा. १) प्लॅटफॉर्म नं. ५ वरील पुलाला लोकल एरियामधून दुसरा एक समांतर पादचारी पूल करावा. (तशी जागा उपलब्ध आहे), २) पनवेल तसेच पूर्ण मुंबईतील पादचारी पुलांना मध्यातून एक लोखंडी बार (डिव्हायडर) टाकावा. सदर कठड्याचे अंतर खालून वर जाणाऱ्यांसाठी दोनतृतीयांश भागात व वरून खाली येणाऱ्यांसाठी एकतृतीयांश भागात असावे. ३) रेल्वे प्रशासनाने पुलाला कठडे बसवून ज्येष्ठ नागरिकांची सोय केली आहे त्याबद्दल अभिनंदन. परंतु सूचना आहे की, या कठड्याची सुरुवात पायरी क्र. १ पासून करावी. सध्या ही पायरी क्र. ५, ६ पासून आहे. ४) पादचारी पुलांना मध्यातून कठडे (बार) टाकले असते तर एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मध्य भागातील प्रवाशांना कठड्याच्या आधाराने उभे राहता आले असते व मृत्यू वाचवता आले असते. तरी याचा जरूर विचार करावा व पुलाच्या एण्ट्रीला वर व खाली (डावीकडून जावे) असे बोर्ड लावावेत व प्रवाशांना अशी सवय होईपर्यंत पोलीस किंवा स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत घ्यावी.

आपली प्रतिक्रिया द्या