विकास आणि विनाश

  • दि. मा. प्रभुदेसाई

साधारण ५० वर्षांपूर्वी म्हणजे १९६७-६८ साली मी पाठारे वक्तृत्वोत्तेजक समाजाच्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. विषय होता – ‘मुंबईच्या अवाढव्य विकासातच तिचा विनाश आहे’. पन्नास वर्षांनंतर तर हा विषय अधिकच गंभीर झाला आहे. बेडकी कितीही फुगली तरी तिचा बैल होत नाही. मुंबईला भौगोलिक मर्यादा आहेत. त्या दुर्लक्षून मुंबईचा अमाप विकास, विस्तार करण्याच्या प्रयत्नातून तिचा भौतिक, नैतिक आणि सांस्कृतिक विनाश होणार आहे असे प्रतिपादन मी केले होते. आज अत्यंत भेसूर स्वरूपात आपल्याला ते दिसत आहे. वृत्तपत्रांतल्या बातम्या वाचल्या तर मुंबईचा नैतिक आणि सांस्कृतिक नाश कसा होतो आहे हे आपल्याला सहज कळते. मुंबई पावसाळ्यात बुडते हा तिच्या भौतिक नाशाचाच प्रारंभ आहे असे मला वाटते. समुद्रावर आक्रमण केलेच आहे. आता मिठागरांची जागासुद्धा इमारतींसाठी वापरणार आहेत. मग समुद्राने तुमच्यावर आक्रमण केले तर ओरडण्यात काय अर्थ! समुद्राने श्रीकृष्णाची ‘द्वारका’ बुडवली, मुंबईची काय कथा! मुंबईच्या विनाशाला, सर्व समस्यांना एकच मुख्य कारण आहे ते म्हणजे बेसुमार लोकसंख्या. मुंबईवर रोज बाहेरून येणाऱ्या लोकांचे लोंढे आदळत आहेत. कुठूनही येतात, कुठेही, कसेही राहतात आणि मग ही आपलीच जहागीर असल्याप्रमाणे हक्क मागतात. मग त्यांचे नाव पुढे करून मुंबईचा विकास करतोय असे राज्यकर्ते सांगत राहतात. हे सर्व समजत असूनही राज्यकर्ते, विरोधक मतांच्या लालसेने त्याकडे दुर्लक्ष करतात. विकासामुळे मुंबईचे प्रश्न सुटणार असे सांगून मुंबईला विनाशाकडे नेत आहेत. रोगाच्या साथीने सुरत सुधारले, आगीमुळे लंडन सुधारले, महायुद्धामुळे नवीन जपान व जर्मनी उभे राहिले. मुंबईला काय हरकत आहे? हे अत्यंत कटू आणि कठोर आहे, पण तेच मुंबईचे वास्तव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या