मंगळाचे थ्रीडी दर्शन

40

आभाळमाया – वैश्विक- [email protected]

पल्या ग्रहमालेतल्या पृथ्वीसकट सगळ्या ग्रहांबाबतचे संशोधन सतत सुरू असते. पृथ्वीवर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी महाकाय डायनासोर होते. अवघी पृथ्वी व्यापणाऱ्या या महाकाय प्राण्यांचं अस्तित्व हिंदुस्थानी उपखंडातही होते, परंतु एका विशाल अशनीच्या म्हणजे अवकाशातून कोसळलेल्या महापाषाणाच्या आघाताने ते सारेच्या सारे नष्ट झाले. त्यांची प्रचंड आकाराची भग्न अंडी आणि अनेक ठिकाणी सापडलेले भलेमोठे सांगाडे त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. ‘ज्युरासिक पार्क’सारख्या सिनेमात स्पीलबर्गने डायनासोर युग पडद्यावर पुन्हा जिवंत केले आणि जगाला या अक्राळविक्राळ प्राण्याची सहजतेने माहिती मिळाली.

चिक्स्लब या मेक्सिकोतील गावी एक महापाषाण (१२ किलोमीटर व्यासाचा) साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळला आणि त्याने डायनासोरचा सामूहिक बळी घेण्याबरोबरच आपल्या ग्रहावर कायमचे उत्पातही घडवले. महाकाय प्राण्याचा वंशविच्छेद करणाऱ्या या अशनीने पृथ्वीवरच्या ज्वालामुखीजन्य खडकांची अक्षरशः वाफ केली आणि त्यातून बाहेर पडलेल्या कार्बन डायऑक्साईड तसेच सल्फरमुळे पृथ्वीवर शीतयुग अवतरले. त्याआधी पृथ्वीच्या वातावरणात हे दोन घटक ज्या प्रमाणात होते त्याच्या तिपटीने त्यांची वाढ झाली आणि मोठं शीतयुग अवतरलं. नैसर्गिकरीत्या झालेलं हे आदिम महाप्रदूषण म्हणायला हवं. शुक्र ग्रहावरसुद्धा असेच कार्बन आणि सल्फरचे महाकाय आवरण आहे. त्यामुळे तिथून ‘झाले मोकळे आकाश’ असं कधीच होत नाही.

आता पृथ्वीकडून मंगळाकडे जायचं तर मंगळ वस्तीची स्वप्ने पाहणाऱ्या माणसाचे यांत्रिक डोळे मंगळाची बित्तंबातमी काढण्यात गर्क आहेत. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ २०२० मध्ये मंगळावर जे रोव्हर पाठवणार आहे त्यावर तेथील शक्तिशाली कॅमेरे असणार आहेत. या तीक्ष्ण डोळ्यांद्वारे मंगळाचं अतिशय जवळून आणि बारकाईने निरीक्षण केलं जाईल.

मंगळावरचं वातावरण, मंगळपृष्ठाची समग्र माहिती, त्याखालील भूगर्भात चालणाऱ्या प्रक्रिया, मंगळावरची खनिजे, पाण्याचे स्रोत वगैरे गोष्टींचा मिश्रित डेटा मिळवणे या उपक्रमातून शक्य आहे. यातून काहीतरी विस्मयकारक गोष्टी समजतील असं म्हटलं जातंय. रोव्हर मंगळावर उतरताना पॅराशूट उघडेल. त्याचंही चित्रण हे कॅमेरे करतील. मंगळावरच्या माती, खनिजाच्या नमुन्यांची तपासणीही हे ‘डोळे’ तपशीलवार करतील.

या रोव्हरवर पहिल्यांदाच त्रिमिती चित्र किंवा थ्री-डायमेन्शनल फोटो घेतले जातील. त्यामुळे प्रत्येक वस्तूचा साकल्याने अभ्यास करणे शक्य होईल. यापूर्वी पाठलेल्या रोव्हर, पाथफाइंडर किंवा क्युरिऑसिटी यांच्यावर बसवलेल्या कॅमेऱयांपेक्षा २०२० रोव्हरवरच्या कॅमेऱयांची क्षमता कैक पटींनी अधिक असून त्यामुळे लाल ग्रहाची जवळून ओळख होणार आहे.
मास्टरस्कॅन-झेड ही या रोव्हरवरची प्रमुख प्रभावी यंत्रणा असेल. यातील झेड म्हणजे झूम. त्यामुळे कोणत्याही हाय डेफिनेशन छायाचित्रणाची गुणवत्ता वाढणार असून या स्टीरिओस्कोपिक कॅमेऱ्यांमुळे केलेले मंगळपृष्ठाचे चित्रण पृथ्वीवरील अभ्यासकांना मंगळाच्या भूरचनेचा सखोल अभ्यास करण्यास अत्यंत उपयुक्त ठरेल.

येत्या पंचवीस वर्षांत अंतराळ संशोधनात प्रचंड बदल आणि प्रगती होणार आहे. वैज्ञानिक प्रगतीच्या या महायुगाचे साक्षीदार होणे हे जसे भाग्य आहे तसेच वैज्ञानिक संशोधनाच्या गैरवापरापायी पृथ्वीलाच संभाव्य विनाशाच्या गर्तेत लोटण्याचं भय अशा संमिश्र भावनांच्या काळात आपण राहत आहोत. पृथ्वी उजाड करून आधीच उजाड झालेल्या मंगळाकडे झेपावण्यात काय अर्थ? विज्ञानाचा दुरुपयोग थांबवण्यासाठी वैज्ञानिकांनी आणि सुज्ञ व्यक्तींनी चिकाटीने प्रयत्न करायला हवेत. तरच आपल्या वैज्ञानिक प्रगतीची रसाळ फळं आपल्याला सुखेनैव चाखता येतील.

आपली प्रतिक्रिया द्या