चिंतामण वनगा

36
  • माधव डोळे

खासदारकी किंवा आमदारकीची झूल एकदा पांघरली की सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र त्या लोकप्रतिनिधीपासून दूर जातो. अडव्होकेट चिंतामण वनगा मात्र त्यास अपवाद होते. तीन वेळा खासदार आणि एकदा आमदार होऊनही त्यांच्यातील कार्यकर्ता शेवटपर्यंत जिवंत होता. साधे कपडे, सामान्यांची भाषा, वागणे-राहणेही अत्यंत साधे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, वाडा, मोखाडा तसेच नाशिकमधील आदिवासी भाग हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीन भौगोलिक रचनांमध्ये हा जिल्हा विखुरला आहे. विक्रमगडसारख्या अत्यंत मागासलेल्या तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी वनगा यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. तलासरीमधील कवडा हे त्यांचे मूळ गाव. कवडा ते राजधानी दिल्लीपर्यंतचा प्रवास तसा सोपा नव्हता. पण जिद्द, आदिवासींचे जीवनमान उंचविण्यासाठी सतत कार्यरत राहणे आणि पक्षाबरोबर असलेली एकनिष्ठता यामुळे वनगा अधिक लोकप्रिय होते. वनवासी कल्याण आश्रम आणि प्रगती प्रतिष्ठान या दोन संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेले सामाजिक व सांस्कृतिक कार्य कुणीच विसरणार नाही. खडतर परिश्रम करून त्यांनी एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरची गरिबी असूनही त्यांनी शिक्षणाच्या जोरावर आपले कार्य सुरूच ठेवले. जव्हार तसेच ठाण्याच्या न्यायालयात त्यांनी वकिली केली. आदिवासींचे प्रश्न तसेच त्यांना न्याय देण्यासाठी वनगा यांनी न्यायालयात त्यांची बाजू समर्थपणे मांडली. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. १९९६ मध्ये लोकसभेवर ते पहिल्यांदा निवडून आले आणि नंतर कधीच त्यांनी मागे वळून बघितले नाही. ११९९ आणि २०१४च्या निवडणुकीतही वनगा हे आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर निवडून आले. संसदीय कामकाजाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. पालघरच्या आदिवासी भागातील शेती, पाणी, आरोग्य, शिक्षणाशी संबंधित अनेक प्रश्न त्यांनी समर्थपणे लोकसभेत मांडले. केंद्र सरकारच्या आदिवासी भागासाठी असलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वनगा सतत प्रयत्नशील असायचे. खासदार असूनही पुढारीपणाचा कोणताही आव ते आणायचे नाहीत. एकीकडे यशस्वीपणे संसदीय राजकारण करीत असतानाच त्यांनी पक्षीय पातळीवरही मोठे काम केले. १९९१मध्ये वनगा हे भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष होते. त्यांनी केलेली आंदोलने अजूनही अनेकांच्या लक्षात आहेत. विरार-डहाणू ही लोकल सुरू करावी यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला, पण प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर त्यांनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडले. आदिवासींनी पिकवलेल्या तांदळाला चांगला भाव मिळावा म्हणूनही त्यांनी प्रयत्न केले. पालघर जिल्ह्यातील वारली लोककलेला प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्यांनी संसदेच्या माध्यमातून प्रयत्न केले. दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव काणे यांचे संस्कार असलेल्या चिंतामण वनगा यांनी सर्वसामान्य आदिवासींचा विकास हाच ध्यास सतत डोळय़ांसमोर ठेवला. काम करण्याची त्यांची स्वत:ची वेगळी पद्धत होती. कमी बोलणे आणि जास्तीत जास्त काम करणे हा त्यांचा महत्त्वाचा गुण. ‘राजकारण बहुत करावे… मात्र कळोची ना द्यावे’ हा समर्थ रामदासांचा संदेश त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात आणला. दिलेला शब्द पाळणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. तारापूरमधील अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांनी संसदेपर्यंत पाठपुरावा केला. पालघरमधील काही मच्छीमारांनी चुकून सागरी हद्द ओलांडून पाकिस्तानच्या समुद्रहद्दीत प्रवेश केला होता. त्यांची सुटका करावी यासाठी वनगा यांनी सतत प्रयत्न केले. जव्हार, वाडा, मोखाडा या भागांत केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून येत असून त्यात स्थानिक आदिवासींच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. सध्या नगरसेवकाचा बँक बॅलन्स निवडून आल्यानंतर थोड्याच अवधीत वाढतो, मात्र चिंतामण वनगा हे तीन वेळा खासदार तसेच एकदा आमदार होऊनही स्वत:ची प्रॉपर्टी त्यांनी वाढवली नाही. त्यांच्या निधनामुळे आदर्श लोकप्रतिनिधी तसेच सच्चा कार्यकर्ता हरपला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या