डॉ. तुलसी बेहरे आणि दत्तात्रय म्हैसकर

92

डॉ. तुलसी बेहरे

दशावतार ही लोककला म्हणजे कोकणच्या लाल मातीचा एक उत्स्फूर्त आविष्कार. कोकणी माणसाचा हा सांस्कृतिक ठेवा. दशावतार आणि डॉ. तुलसी बेहेरे यांचे नाते अगदी घट्ट होते. दशावतारात आजवर कुणी केले नसेल एवढे मोठे कार्य करून ते गेले आहेत. महाराष्ट्रात दशावतारावर संशोधन करणारे ते पहिले संशोधक होते. नुसते संशोधन करून ते थांबले नाहीत, तर त्यात नवे प्रयोग करीत राहिले. डॉ. तुलसी बेहरे यांनी फक्त महिलांचा दशावतार सादर करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. रूढी -परंपरेचे स्तोम माजवून स्त्रियांना या लोककला प्रकारापासून दूर ठेवणाऱ्या प्रवृत्तीवर त्यांनी प्रहार केला. पूर्वी गिरगावात प्रसिद्ध दशावतारी कलावंत बाबी नालंग यांनी दशावतारात स्त्री भूमिका एका कलावंतिणीला दिली होती. त्यावेळी बाबी नालंग यांची खूप टिंगलटवाळी झाली. पुढे मामा मोचेमाडकर यांनी कोकणातील खानावली गावात गोव्याच्या भाविणींना घेऊन दशावतार सादर केले होते. या दोन प्रयोगांव्यतिरिक्त दशावतारात महिलांना स्थान नव्हते. पण तुलसी बेहरे यांनी सर्व महिलांना एकत्र आणून दशावताराचा प्रयोग केला. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतील मुलींना घेऊन त्यांनी ‘गरुडजन्म’ हा दशावताराचा खेळ मुंबईच्या शाहीर अमरशेख सभागृहात सादर केला. त्याआधी प्रयोगात कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून त्यांनी सर्व मुलींना घेऊन संशोधन दौरा केला. दशावताराचा मेकअप आणि संगीत यांचा संपूर्ण अभ्यास केला. प्रयोगात संवादफेकपासून युद्धनृत्यापासून सारेच मुलींनी सराईतपणे केले होते. याचे श्रेय अर्थात बेहेरे यांचेच. कोकणातील तुळस हे बेहेरे यांचे गाव. गुणी नट आणि उत्तम अभ्यासक म्हणून ते ओळखले जायचे. त्यांच्या राजा दशावतारी, राजा रुखमांगत, गरूडजन्म या नाटकांनी आधुनिक मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. त्यांचा ‘झेलम’ या कवितासंग्रहामध्ये त्यांनी उत्तम निसर्गचित्रे आणि व्यक्तिचित्रे तसेच मुंबई महानगरीचे चित्रण केले आहे. मालवणी भाषेवर त्यांचे नितांत प्रेम होते. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आणि कोकण कला अकादमीच्या अनेक कार्यक्रमांमधून त्यांनी दशावतार आणि मालवणी लोककलांचे सादरीकरण केले आहे. आकाशवाणीसाठी त्यांनी लोककलेसंबंधी अनेक मुलाखती घेतल्या. समाजाच्या कानाकोपऱ्यांत लोककला पोचवण्यासाठी बेहरे यांनी आयुष्यभर काम केले. नव्या पिढीपर्यंत हा वारसा नेताना ते कायम उत्साही असायचे. त्यांच्या निधनाने लोककलेचा सच्चा उपासक हरपला आहे.

दत्तात्रय म्हैसकर

कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना मराठी माणूस नोकरी सोडून व्यवसाय करू शकतो आणि त्या व्यवसायात तो शिखरावर पोहचू शकतो जे ज्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले त्या दत्तात्रय तथा डी. पी. म्हैसकर यांच्या निधनाने अनेक सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला आहे. मुंबई महापालिकेत नोकरी करत असताना स्वतःचा उद्योग उभारावा हे स्वप्न त्यांनी पाहिले आणि अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी ८ ऑक्टोबर १९७८ रोजी आयआरबी या कंपनीची स्थापना करीत रस्ते बांधणीच्या क्षेत्रात पाऊल टाकले. जिद्द, चिकाटी आणि परिश्रम हे त्रिवेणी गुण अंगी बाणवलेल्या डी. पी. म्हैसकर यांनी १९७७ साली देशातील रस्ते बांधणीतील पहिला बीओटी प्रकल्प समजला जाणाऱया भिवंडी बायपास या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम मिळविले. सुरुवातीपासूनच रस्तेबांधणीचा दर्जा टिकवत या क्षेत्रातील विश्वासू नाव असा लौकिक त्यांनी मिळविला. त्यामुळे रस्तेबांधणीची अनेक कामे त्यांना मिळाली. खिशात रुपयाही नसताना लाखो-करोडे रुपयांचे काम करता आले पाहिजे हा मंत्र त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना शिकवला. भाभा ऑटोमिक रिसर्च रनवे या महत्त्वपूर्ण रस्तेबांधणीमुळे त्यांचे नाव देशभरात झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई-पुण्याला जोडणाऱया एक्प्रेस वेचे स्वप्न पाहिले. हा एक्प्रेस वे कमीत कमी वेळात आणि उच्च गुणवत्तेचा वापर करीत म्हैसकर यांनी उभारला. साधी राहणी, अबोल स्वभाव यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसत नसत, परंतु ६० हून अधिक सामाजिक संस्थांना त्यांनी मदतीचा हात दिला होता. त्यापैकी प्रमुख म्हणजे डोंबिवली जिमखाना होय. या जिमखान्याची स्थापना त्यांनी केली. तसेच यासाठी निधीसंकलनाचा प्रस्ताव आला तेव्हा स्वतः ७५ टक्के रक्कम देण्याची योजना त्यांनी मांडली. त्यांच्या पुढाकाराने आज डोंबिवलीत दर्जेदार क्रीडा संकुल उभे राहिले आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘माय जर्नी’ या आत्मचरित्रपर पुस्तकासाठी म्हैसकर यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. समाजात चांगली कामे करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी म्हैसकर फाऊंडेशनची स्थापना केली. रस्तेबांधणीसाठी एमआयडीसीला ९१८ कोटी रुपयांचा धनादेश देण्याचा विक्रमही त्यांनी केला. एकदा पाहिलेले स्वप्न पुरे करण्यासाठी वाट्टेल तितके कष्ट करायचे आणि ते स्वप्न पूर्ण करायचेच हा दादासाहेब म्हैसकरांचा गुण पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावा असाच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या