ना. स. फरांदे

348

भाजपच्या विविध पदांवर काम करीत विधान परिषदेचे सभापतीपद भूषविलेले प्राध्यापक ना. स. फरांदे हे राजकारणातील तत्त्वशील व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांना परिचित होते. ओझर्डे (ता. वाई, जि. सातारा) येथे ना. स. ऊर्फ नारायण सदाशिव फरांदे यांचा जन्म झाला. वाई येथून १९५८ मध्ये ते मॅट्रिक झाले. मुलाने अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र ना. स. यांनी सोलापूर येथे मराठी विषयात बी. ए. केले. त्यावेळी ते पुणे विद्यापीठात प्रथम आले. तत्कालीन राज्यपाल विजयालक्ष्मी पंडीत यांच्या हस्ते त्यांचा सुवर्णपदक व सहा पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सोलापूरच्या शिवाजी विद्यापीठात एम.ए.मध्येही ते प्रथम आले होते. माजी ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे व फरांदे एकाच महाविद्यालयात शिकले. पुढे फरांदे यांना धुळ्यात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. १९७१ मध्ये त्यांनी कोपरगावच्या सोमय्या महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी पत्करली. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांच्यामुळे ते भारतीय जनता पक्षात आले आणि नगर जिल्ह्य़ातून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. विद्वत्ता, वक्तृत्व, अभ्यासूवृत्ती, व्यासंग आणि संघटन कौशल्य अशा अनेक गुणांच्या जोरावर त्यांनी त्यांचा राजकीय आलेख उंचावत नेला. कोपरगावच्या भाजप शहराध्यक्षपदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द पुढे नगर जिल्हा उपाध्यक्ष, प्रदेशाध्यक्षांपर्यंत बहरत गेली. तब्बल तीन वेळा ते विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. विधान परिषदेचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषविले. त्याशिवाय महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य, साईबाबा संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्य रोहयो समितीचेही कामकाज त्यांनी पाहिले. संघपरिवाराच्या मुशीमध्ये तयार झाल्याने एखाद्या विषयाचा मुळापासून अभ्यास करून तितक्याच ताकदीने ठामपणे मते मांडण्याची कुवत त्यांच्यामध्ये होती. त्यामुळे सरांचा एक वेगळाच दबदबा होता. जिल्हाभर पक्ष वाढविण्याच्या कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. फरांदे यांच्या पुढाकारातूनच साखर शाळा ही संकल्पना प्रत्यक्षात आली. एकीकडे मला ज्ञानेश्वर माऊली दिसते तर दुसरीकडे ऊसतोड कामगारांची शिक्षणापासून वंचित राहिलेली मुले मला दिसतात, असे उद्गार त्यांनी त्यावेळी काढले होते. त्याशिवाय मुक्त शाळा हा प्रकल्प, ६ ते १४ वयोगटातील बाल कामगार आणि शाळाबाहय़ शिक्षणासाठी महात्मा फुले शिक्षण हमी योजना सुरू करण्यातही त्यांचा पुढाकार होता. एवढेच नव्हे तर जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी कारवायांमुळे विस्थापित झालेल्या तेथील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रासह गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील विद्यापीठांमध्ये काही जागा निर्माण करण्याचे कामही फरांदे यांचेच. खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. नगर जिल्हा साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणूनही काम पाहिले. समाजातील सर्वच स्तरावरील घटकांसाठी फरांदे यांनी काही ना योगदान दिले आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या १९८६ च्या निवडणुकीत ते निवडून आले. पुढे ते दोनदा विधान परिषदेवर निवडून गेले. १९९२ ते ९८ या काळात ते विधान परिषदेचे उपसभापती होते. नंतर १९९८ ते २००४ या काळात म्हणजे युती सरकारच्या काळात त्यांनी सभापतीपद भूषविले. २१ वर्ष प्राध्यापक, १८ वर्षे आमदार असा राजकीयपट असलेल्या फरांदे यांच्या प्रयत्नातून पुणे युनिर्व्हसिटी ऍण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन ऊर्फ ‘पुक्टो’चा जन्म झाला. कडक स्वभावामुळे अनेकजण त्यांच्यासमोर उभे राहायलाही घाबरत, मात्र सर्वांना बरोबर घेऊन जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले. पक्षांमध्ये अनेक पदे घेतल्यानंतर दिवंगत प्रमोद महाजन यांनी फरांदे यांना नगर दक्षिण मतदारसंघातून खासदारकी लढविण्यासाठी सुचले व त्यांना तिकीटही मिळवून दिले. त्यावेळी पक्षांतर्गत अनेक घडामोडी घडल्या. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपमधील नाराज झालेला गट शेवटपर्यंत नाराजच राहिला. तरीही फरांदे यांनी हिरीरीने निवडणूक लढविली. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. ‘ज्ञानेश्वरी’ हा फरांदे यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांना नेवासा येथील ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीचे अध्यक्षपद दिले होते. आपल्याला बाहेरून काहीजण मदत करतात, पण स्थानिक लोकप्रतिनिधी मदत करत नाही याबद्दल नाराजी व्यक्त करून तीर्थक्षेत्र विकासासाठी आपले काम सुरू ठेवले होते. फरांदे हे सामान्यांसाठी राजकारण करणारे होते. पक्षीय बेशिस्त न खपवून घेणारे, पक्षात काम करताना पक्षासाठीच वेळ द्या आणि सामान्यांचे प्रश्न सोडवा असा आग्रह धरणारे होते. राजकारणातील या पिढीचा एक शिलेदार फरांदे यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या