प्रा. दिनकर बोरीकर

63

प्रशांत गौतम

ज्येष्ठ विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी प्रा. दिनकर बोरीकर यांच्या निधनाने मराठवाड्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील एक सक्रिय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. संभाजीनगरातील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी शेवटपर्यंत सांभाळली. शहरातील शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक चळवळीत त्यांचे योगदान जसे महत्त्वाचे होते तसे मराठवाड्याच्या विकास चळवळीतही ते सदैव अग्रेसर होते. बोरीकरांचे वडील श्रीनिवासराव बोरीकर स्वामी रामानंद तीर्थांचे निकटवर्तीय असल्याने आणि या संस्कारांमुळे त्यांनी तरुणपणीच स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतला. मनमाडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात त्यांच्या मातोश्री स्वयंपाक करीत असत. विद्यार्थीदशेत बोरीकरांनी मुक्तिसंग्रामात उडी घेतली. हैदराबादेत असताना सेंट्रल को-ऑपरेटिव्ह युनियनमध्ये ‘सहकार समाचार’ या वृत्तपत्राचे उपसंपादक म्हणून काम केले. स्वामी रामानंद तीर्थांच्या आदेशाने तेलंगणा, हैदराबादेत खादी प्रचाराचे कार्य केले. भाषावार प्रांतरचनेनंतर संभाजीनगर गाठले. एम.ए., बी.कॉम., एलएलबी शिक्षण झाले असल्याने सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. प्राध्यापक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी १९९८ ते २००८ या कालावधीत सरचिटणीसपद, पुढे उपाध्यक्षपद आणि अध्यक्षपद सांभाळले. गोविंदभाई श्रॉफ यांनी स्थापन केलेल्या सर्वच संस्थांत बोरीकरांचा सहभाग होता. खऱ्या अर्थाने ते भाईंचे उत्तराधिकारी होते. मराठवाडा खादी समिती नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ संस्था हैदराबाद, मराठवाडा जनता विकास परिषद, स्वामी रामानंद तीर्थ संस्था, स्वातंत्र्यसैनिक समिती, हिंदी राष्ट्रभाषा समिती, गांधी तत्त्व विचार केंद्र असे काही सांगता येईल. विविध क्षेत्रांतील लोकांशी त्यांनी मैत्रीचे धागे जोडले. वाचन-लेखनाचाही छंद जोपासला. वैविध्यपूर्ण लेखन केले. बाल एकांकिका, संशोधन, कथा, कादंबऱया, वैचारिक, आध्यात्मिक, अनुवाद अशा विषयांवरच्या बत्तीस पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. ‘रविवारच्या शोधात’ या बाल एकांकिकेस २००७-२००८ या वर्षाचा राज्य पुरस्कार मिळाला होता. या बत्तीस पुस्तकांतील मौलाना आझाद एक पुनर्मूल्यांकन, महात्मा गांधींच्या स्वप्नातील ग्रामीण भारत, सरदार वल्लभभाई पटेल आणि हैदराबादचे विलीनीकरण, पालकत्वाची गुपितं, दी वन मिनीट मॅनेजर, ध्यानदर्शन ही महत्त्वाची पुस्तके अभ्यासकांसाठी आजही महत्त्वाची आहेत. दिनकर बोरीकर यांच्या निधनाने गोविंदभाई श्रॉफ यांच्या विचारांचा वारसा भक्कमपणे चालवणारा उत्तराधिकारी गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या