अभिजात शास्त्रीय संगीतातील प्रतिभावंत गायक – पं. उल्हास कशाळकर

  • प्रशांत गौतम

पं. उल्हास कशाळकर यांना नुकताच ‘तानसेन’ पुरस्कार घोषित झाला. अभिजात प्रतिभावंत गायकीने त्यांनी आपली स्वतंत्र मुद्रा तर उमटवलीच आहे, एवढेच नव्हे तर ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा या तिन्ही घराण्यांतील गायकी त्यांनी आत्मसात केली आहे. त्यात आपल्या प्रतिभेचे रंग भरत अनेक मैफली सशक्त ताकदीने रंगवल्या आहेत. एखाद्या मैफलीत अस्सल रागदरबारी सादर करून रसिकांना खिळवून ठेवणारे जे प्रख्यात कलावंत आहेत त्यात त्यांचा अग्रक्रम आहे. गेल्या ३५ वर्षांची ही संगीतसाधना वैविध्यपूर्ण टप्प्यावर विकसित झाली. या प्रदीर्घ तपश्चर्येतून त्यांच्या प्रगल्भतेचे नवनवे उन्मेष रसिकांनी अनुभवले.

उल्हास कशाळकरांचा जन्म नागपूर येथील एका संगीतकवी कुटुंबात झाला. वडील नागेश कशाळकर पेशाने वकील असले तरी उत्तम संगीतज्ञ होते. त्यामुळे उल्हासजींनी संगीत शिक्षणाचे प्राथमिक धडे आपल्या वडिलांकडेच घेतले. वडील जसे संगीतप्रेमी तसे त्यांचे दोन्ही भाऊही संगीताचे मर्मज्ञ जाणकार म्हणून परिचित होते. वडील आणि भावांच्या मार्गदर्शनातून उल्हास कशाळकरांनी स्वकर्तृत्वावर वाटचाल केली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, याप्रमाणे वडील नागेश कशाळकरांना उल्हासमधील संगीत शिक्षणातील पाऊलखुणा वेळीच लक्षात आल्या. त्यामुळे त्यांनी आवडीच्याच क्षेत्रात करीअर करण्याविषयी सांगितले. घरातून मिळालेल्या या प्रेरणेमुळे कशाळकरांनी नागपूर विद्यापीठामधून सुवर्णपदकासह संगीत विषयातील उच्च पदवी संपादन केली. त्यासोबतच पं. रामभाऊ कोकजे आणि प्रभाकर खर्डेणवीस यांच्याकडूनही बहुमोल मार्गदर्शन मिळाले. त्या पाठबळावर अधिक शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. उल्हासजींचे नशीब इतके थोर की, त्यांना पं. राजाभाऊ कोकजे, पं. राम मराठे, पं. गजाननबुवा जोशी या तीन घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्यवर गुरूंकडे प्रदीर्घकाळ अध्ययन करता आले.

ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा या तिन्ही घराण्यांची गायकी त्यांनी प्रयत्नपूर्वक संपादन केली. म्हणजे असे की, ग्वाल्हेरची शिस्त आणि स्वरांचे काम, आग्रा घराण्याची आक्रमकता आणि जोरकसपणा तर जयपूरची बलपेचदार लयकारी या गुणविशेषाचा त्यांनी आपल्या अभिजात संगीतात पुरेपूर वापर केला. एखादी मैफल रंगविण्यासाठी कशाळकर गायनातील सौंदर्यस्थळे, विचार आत्मसात करत. बंदिशीची निवड करताना शब्दोच्चार, नादमयता आणि सादरीकरणातील शालिनता यामुळे त्यांच्या मैफली उत्तरोत्तर रंगत असत. त्यामुळेच त्यांच्या गायनामध्ये तिन्ही घराण्यांचा त्रिवेणी संगम आढळून येतो. संगीत क्षेत्रातील अशा प्रकारचे नव्या शैलीचे काम ही एक अवघड जबाबदारी असते. एवढेच नव्हे तर प्रतिभेलाही आव्हान देणारी असते. अध्यापनाचे काम करताना विद्यार्थ्यांना काहीतरी सृजनात्मक देणे यासाठी कलावंत होणे फार महत्त्वाचे असते. ते कशाळकरांनी उत्तम प्रकारे केले आहे. आपल्या कारकीर्दीची सुरुवात त्यांनी आकाशवाणीवरील कार्यकारी निर्माता म्हणून केली आणि नंतर कोलकाता येथील जगप्रसिद्ध आयटीसी संगीत रिसर्च अकादमीशी जोडले गेले. तेथे लाभलेल्या कलापूरक वातावरणातून त्यांनी अनेक शिष्य निर्माण केले. ही २५ वर्षांची कशाळकरांची कारकीर्द ठसठशीत होती. त्यांच्या आजपर्यंतच्या संगीत प्रवासात पद्मश्री, संगीत अकादमी, पं. जसराज, कुमार गंधर्व, राम मराठे, पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या नावाचे सन्मान लाभले. त्यात आता तानसेन पुरस्काराने मौलिक भर पडली आहे.