लक्ष्मीकांत देशमुख

प्रशांत गौतम

फेबुवारी २०१८ मध्ये बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथा-कादंबरीकार तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळवणारे लक्ष्मीकांत देशमुख हे मराठवाड्यातील चौथे लेखक आहेत. यापूर्वी हा सन्मान पद्मश्री डॉ. यू.म. पठाण (पुणे), डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (चिपळूण), कविवर्य फ.मुं. शिंदे (सासवड) यांना मिळाला होता. आता लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातमधील बडोदा येथे साहित्य संमेलनाची मांदियाळी रंगणार आहे.

देशमुख हे धाराशीव जिल्ह्याचे सुपुत्र असून अध्यक्षपदाच्या निवडीनंतर उमरगा तालुक्यातील मुरूम या मूळ गावी चौकाचौकांत फटाके फोडून आतषबाजी करण्यात आली. यंदाच्या साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षपद निवडणुकीसाठी तब्बल ५ उमेदवार उभे होते. नागपूर येथील डॉ. किशोर सानप, डॉ. रवींद्र शोभणे, राजन खान आणि रवींद्र गुर्जर (पुणे) या चार प्रमुख उमेदवारांप्रमाणेच लक्ष्मीकांत देशमुख यांनी मराठवाडा साहित्य परिषदेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या महिनाभरात पाचही उमेदवारांनी उत्तम प्रचार केला. एवढेच नव्हे तर सोशल मीडियाचादेखील वापर केला. या पाच उमेदवारांपैकी विदर्भातील उमेदवारांना विदर्भ साहित्य संघाचा तर पुण्यातील उमेदवारांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पाठिंबा होता. अशाही परिस्थितीमध्ये मराठवाड्याची साहित्य परिषद देशमुख यांच्या पाठीशी खंबीर उभी राहिली.

निवडणूक प्रचार काळात देशमुखांनी महाराष्ट्र, ब़ृहन्महाराष्ट्र भागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत आपले मतदारसंघ पिंजून काढले. त्यामुळेच महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष नेमका कोण होणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतीत मतांसाठी आवश्यक असणारा ४३५ मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता आला नाही. लक्ष्मीकांत देशमुख यांनी दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र शोभणे यांचा पराभव केला. या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख (४२७), रवींद्र शोभणे (३५६), राजन खान (१२३), किशोर सानप (४७), रवींद्र गुर्जर (४१) मते प्राप्त झाली. ५ सप्टेंबर १९५५ रोजी मुरूम येथे जन्म झालेल्या लक्ष्मीकांत देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एमएस्सी केमिस्ट्री, त्यानंतर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मराठी साहित्यात एम.ए. केले. बंगळुरू आणि अमेरिका येथे शिक्षणाच्या निमित्ताने प्रवास झाला. प्रशासन समितीचा त्यांना उत्तम अनुभव असल्याने विविध ठिकाणी त्यांनी काम केले.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, फिल्मसिटीचे सल्लागार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार अशी नोकरीनिमित्ताने होणारी भटकंती करत आपला वाचन-लेखनाचा छंदही जोपासला. प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी भरपूर लिखाण केले. देशमुख यांनी कथा, कादंबरी, नाटक, बालनाटय़, ललितेतर संपादन आणि हिंदी-इंग्रजीतही लिखाण केले. सलोमी (दोन लघु कादंबऱ्या), होते कुरूप वेडे, अंधेरनगरी, ऑक्टोपस, इन्कलाब विरुद्ध जिहाद, हरवलेले बालपण या कादंबऱ्या, कथांजली, अंतरीच्या गूढगर्भी, पाणी! पाणी!, नंबर १, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी, अग्निपथ, मृगतृष्णा हे कथासंग्रह, अखेरची रात्र, दूरदर्शन हाजीर हो (नाटक, बालनाट्य), प्रशासननामा (प्रशासकीय कथालेख), बखर भारतीय प्रशासनाची (भारतीय प्रशासनावरील ग्रंथ), अविस्मरणीय कोल्हापूर (कॉफी, टेबलबुक), मधुबाला ते गांधी ललितलेख संग्रह या मराठीतील साहित्याप्रमाणेच इंग्रजी आणि हिंदी भाषेतही देशमुख यांनी वैविध्यपूर्ण लिखाण केले.

साहित्याचे अभ्यासक डॉ. रणधीर शिंदे यांनी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या निवडक साहित्याची समीक्षा, लक्ष्यदीप आणि ‘अन्वयार्थ’ या समग्र ग्रंथात केली आहे. तसेच वि.ल. धारूरकर यांच्यासोबत सहलेखक म्हणून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा ग्रंथही देशमुख यांनी संपादित केला. साहित्य क्षेत्रातील वैविध्यपूर्ण लिखाण आणि प्रशासकीय योगदान यासाठी त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला. मसाप पुणे आणि संभाजीनगर या साहित्य संस्थांच्या पुरस्कारासह महाराष्ट्र फाऊंडेशन नॅसकॉम सोशल इम्पॅक्ट ऍवॉर्ड प्राप्त झाला. १९९५ साली झालेल्या ६८ व्या साहित्य स्मरणिकेचे त्यांनी संपादन केले. अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर बडोदा येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना लाभला आहे. ‘‘मी लेखक, प्रशासकीय अधिकारी असलो तरी कार्यकर्ता, अध्यक्ष म्हणूनच काम करणार आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे,’’ अशी विनम्र भावना अध्यक्षपद निवडीनंतर लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या