गुडबाय मि. ओबामा!

२० जानेवारीला अमेरिकेत सत्तांतर होईल. नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ओबामा यांच्या खुर्चीवर विराजमान होतील. मात्र ट्रम्प यांना ओबामा यांची जागा खरोखरच घेता येईल काय? प्रेसिडेंट बराक ओबामा यांना गुडबाय म्हणत असताना हाच प्रश्न अमेरिकन जनतेला पडला असेल!

गुडबाय मि. ओबामा 
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जगातील सर्वाधिक ताकदीच्या सिंहासनावरून पायउतार होत आहेत. सलग 8 वर्षे जागतिक महासत्तेचा महासत्ताधीश म्हणून काम करणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे. तथापि राष्ट्राध्यक्ष पदाच्या दोन्ही टर्म ओबामा यांनी समर्थपणे पार पाडल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्याने बुधवारी ओबामा यांनी देशवासीयांना उद्देशून निरोपाचे भाषण केले. शिकागो येथे राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेल्या अखेरच्या भाषणाच्या वेळी ओबामा भावूक झाले होते. खास करून पत्नी मिशेल, मालिया व साशा या दोन्ही मुलींचा उल्लेख करताना त्यांच्या डोळ्य़ांत अश्रू तरळले. निरोपाचा प्रसंगच मुळात भावूक असतो. जागतिक सत्तेचे केंद्र असलेल्या व्हाईट हाऊसमधून केलेला कारभार, आठ वर्षांच्या कार्यकाळात घेतलेले कटू-गोड निर्णय, समग्र कारकीर्दीत देशवासीयांनी दिलेले पेम, सहकारी मंत्री आणि प्रशासनातील मंडळींसोबत कुटुंबीयांची मिळालेली सर्वोच्च साथ अशा नानाविध भावनांच्या कल्लोळात निरोपाचे भाषण करायचे म्हटल्यावर डोळे तर पाणवणारच. ते जिवंत माणसाचेच लक्षण आहे. कुठलाही इगो नाही. दर्प नाही. अमेरिकेसारख्या
बलाढय़ देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी
विराजमान झाल्यावरही त्यांच्या मनाला अहंकाराने कधी स्पर्श केला नाही. आठ वर्षांचा सत्ताकाळ उपभोगल्यानंतरही सत्तेचा कैफ त्यांच्या डोक्यात शिरला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद सोडतानाही त्यांची आत्यंतिक विनम्रता देशवासीय अनुभवत आहेत. निरोपाच्या भाषणात अमेरिकन नागरिकांचे आभार मानतानाच देशवासीयांना उद्देशून ओबामा म्हणाले, मी रोज तुमच्याकडून शिकत होतो. एक चांगला माणूस म्हणून आणि उत्तम राष्ट्राध्यक्ष म्हणूनही अमेरिकन जनतेनेच मला घडवले. काहीसे हळवे झाल्यानंतर दुसऱयाच क्षणाला स्वतःला सावरून अमेरिकेच्या सामर्थ्याची डरकाळी त्यांनी फोडली. अमेरिकेकडे वाकडय़ा नजरेने पाहणारा कदापि सुरक्षित राहू शकणार नाही. ओसामा बिन लादेनसह हजारो दहशतवाद्यांना आम्ही ठार मारले. आता इसिसचाही लवकरच खात्मा होईल. मागच्या आठ वर्षांत अमेरिकेवर कुठलाही अतिरेकी हल्ला झाला नाही. इतकेच काय, हल्ल्याचे प्लॅनिंग कोणी करू शकले नाही, हे वाक्य टाळ्य़ांच्या कडकडाटात उच्चारताना त्यांच्यातील जरबयुक्त पेसिडेंट जागा झाला होता. अमेरिकेची अर्थव्यवस्था, जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेवर असलेली जबाबदारी, दहशतवाद, वर्णभेद अशा अनेक विषयांना ओबामा यांनी निरोपाच्या भाषणात स्पर्श केला. ‘ओबामा, तुम्ही आणखी चार वर्षे अध्यक्ष म्हणून हवे आहात’ अशा आशयाच्या घोषणा भाषणाच्या वेळी लोक देत होते. एवढे
अफाट प्रेम खचितच
आजवर कुठल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला मिळाले असेल. अमेरिकेतील ढासळती अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारी हे ओबामा यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. पहिल्या टर्ममध्ये या आघाडीवर काम करण्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही, मात्र दुसऱ्या टर्ममध्ये आर्थिक मंदीतून अमेरिकेला बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले. ओबामा यांच्या आठ वर्षांच्या कारकीर्दीचा एका ओळीत आढावा घ्यायचा तर ‘एक युद्धखोर देश’ ही अमेरिकेची खलनायकी प्रतिमा बदलण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. ओबामा यांची ही सर्वात मोठी कामगिरी आहे. आधीच्या बुश राजवटीने इराकला बेचिराख करून सद्दाम हुसेन यांना फासावर लटकावल्यापासून आंतरराष्ट्रीय जनमत अमेरिकेच्या विरोधात गेले होते. तथापि इराकमध्ये पाठवलेले सैन्य माघारी बोलावून ओबामा यांनी आपण युद्धखोर नसल्याचा संदेश दिला. याउलट अमेरिकेसारख्या महासत्तेवर ‘ ९/११ ’ दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या ओसामा बिन लादेनला त्यांनी थेट पाकिस्तानात सैनिक घुसवून ठार मारले. अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू ओबामा यांनी संपवला. अमेरिकन सैनिकांचे लादेनला समुद्राच्या तळाशी गाडेपर्यंतचे संपूर्ण ऑपरेशन ओबामा व्हाईट हाऊसमध्ये बसून बघत होते. अमेरिकेच्या इतिहासात लादेनचा खात्मा हे सुवर्णाक्षरांनी लिहावे असे पान आहे. या शौर्याचे मानकरी म्हणून ओबामांची नोंद इतिहासाला ठेवावीच लागेल. कृष्णवर्णीय असूनही श्वेतवर्णीयांची मने जिंकणारा अध्यक्ष ही ओबामा यांची सर्वात मोठी उपलब्धी होती. त्यामुळेच ते लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ झाले. येत्या २० जानेवारीला अमेरिकेत सत्तांतर होईल. नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ओबामा यांच्या खुर्चीवर विराजमान होतील. मात्र ट्रम्प यांना ओबामा यांची जागा खरोखरच घेता येईल काय? प्रेसिडेंट बराक ओबामा यांना गुडबाय म्हणत असताना हाच प्रश्न अमेरिकन जनतेला पडला असेल!