गुजरातमधील काही कंपन्यांनी देशभरात तब्बल 200 बनावट कंपन्या उघडून हजारो कोटी रुपयांचा कर चुकवल्याचे अहमदाबाद गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आज ईडीने अहमदाबाद, भावनगर, जुनागढ, वेरावळ, राजकोट, सुरत आणि कोडिनारमध्ये तब्बल 23 ठिकाणी छापेमारी केली. दरम्यान, याच प्रकरणात सौराष्ट्रचे भाजप आमदार भगवान बरड यांचा मुलगा अजय बरड यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
याच महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबाद गुन्हे शाखेने अहमदाबाद, जुनागढ, सुरत, खेडा आणि भावनगरमध्ये 14 ठिकाणी छापे टाकले होते. कारवाई दरम्यान, एकूण 12 बनावट कंपन्या तयार करणाऱया 33 हून अधिक व्यवस्थापकांना ताब्यात घेण्यात आले. वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालक यांच्याकडून बनावट कंपन्यांबद्दल माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अहमदाबाद गुन्हे शाखेने छापा टाकला. देशभरात 200 हून अधिक बनावट कंपन्या तसेच संस्था स्थापन करून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यात आले. तसेच ते पास करून सरकारी तिजोरीचे नुकसान करण्यासाठी संघटित पद्धतीने डाव रचण्यात आला. अशा कंपन्या तयार करण्यासाठी बनावट ओळख आणि कागदपत्रे वापरणे यासारख्या फसव्या पद्धती समोर आल्याचे गुन्हे शाखेचे एसीपी भरत पटेल म्हणाले.
एका पत्रकारालाही अटक
कोटय़वधी रुपयांचा कर बुडवून देशाचे आर्थिक नुकसान करण्याचा गुन्हेगारी कट रचण्यात आला. या प्रकरणी पत्रकार महेश लांगा यालाही बनावट कागदपत्रांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरु केली आहे. गुन्हे शाखा, ईओडब्ल्यू आणि एसओजीच्या पथकांनी संयुक्त कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
या आहेत बनावट कंपन्या
ध्रुवीय उद्यम, अरहम स्टील, ओम कन्स्ट्रक्शन कंपनी, श्री कनकेश्वरी एंटरप्रायझेस, राज इन्फ्रा, हरमेश कन्स्ट्रक्शन कंपनी, डी.ए. उद्यम, इथिराज कन्स्ट्रक्शन, बीजे, आर. एम. दासा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, आर्यन असोसिएट्स, पृथ्वी बिल्डर्स.
डीजीजीआयची गुन्हे शाखेत तक्रार
अहमदाबादच्या ध्रुवी एंटरप्रायझेसच्या नावाने बनावट कंपनीची नोंदणी करून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दिले जात असल्याची तक्रार डीजीजीआयचे संचालक हिमांशू जोशी यांनी केली आहे. कर घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांनी देशभरात 200 हून अधिक बनावट कंपन्यांची नोंदणी करून हजारो कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवल्याची तक्रार आहे.
n अहमदाबाद गुन्हे शाखा, एसओजी आणि इओडब्ल्यू विभागाने करचोरी शोधण्यासाठी राज्यव्यापी छापे टाकले. प्राथमिक तपासात 200 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले. या घोटाळ्यांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे.
n यात अनेक प्रकरणे जोडली जाऊ शकतात. सध्या एकटय़ा गुजरातमध्ये जीएसटी बनावट बिलिंग घोटाळ्याचा आकडा 50 हजार कोटींच्या पुढे गेला आहे.