राज्यात एक रंग-एक गणवेश योजना लागू

प्रातिनिधिक फोटो

राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘एक रंग एक गणवेश’ योजना लागू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सर्व सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एकाच रंगाचा गणवेश लागू असेल. मात्र काही शाळांनी या निर्णयापूर्वीच गणवेशासाठी कपडय़ांच्या ऑर्डर दिल्या असतील तर विद्यार्थी तीन दिवस सरकारी योजनेचा आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

येत्या 15 जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. शाळा सुरू होण्यासाठी अवघे 22 दिवस शिल्लक असताना शिक्षण विभागाने सर्व सरकारी शाळांसाठी एक रंग एक गणवेश धोरण जाहीर केले आहे. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱयांसोबत बैठक घेतली होती. आता खासगी शाळा व्यवस्थापनासोबतही एक बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यांनादेखील मोफत पुस्तके व गणवेश देण्यात येणार आहे.

दर्जेदार गणवेश देण्याचा हेतू

एक गणवेश करण्यामागे शिस्त लागते. या एक गणवेशामागे कुठलाही आर्थिक हेतू नाही, असेही केसरकर म्हणाले. यासाठी कंत्राट निघणार असून कुणीही त्यात भाग घेऊ शकते. याबाबत कुठल्याही कंपनीशी संगनमत नाही. मुलांना दर्जेदार गणवेश मिळावे, हाच यामागे हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एक रंग-एक गणवेश’ घोषणा झाल्यामुळे शाळा प्रशासनाची चिंता मिटली आहे. कारण गणवेशाचा रंग माहिती नसल्यामुळे प्रशासनासमोर प्रश्न होता. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात जिल्हास्तरावर गणवेशासाठी निधी मिळतो आणि विद्यार्थी संख्येनुसार तो शाळांना दिला जातो. त्यानंतर शाळा व्यवस्थापन कापड खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कपडय़ांचे माप घेऊन गणवेश शिवून घेण्याची ऑर्डर देते. नव्या शैक्षणिक वर्षात सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये एकच गणवेश करण्याचा विचार शिक्षण विभागाने घेतला आहे.