वेळ रात्री दीड, दोनची.. कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेले विषबाधाग्रस्त विद्यार्थी गाढ झोपेत होते. त्यातील काहींना सलायन लावले होते. डॉक्टर, नर्सेस यांची वॉर्डमध्ये धावपळ सुरू होती. तेवढ्यात कुणीतरी म्हटले, साहेब आले.. साहेब आले.. आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर मोठ्या लवाजमासह थेट हॉस्पिटलमध्ये घुसले. अधिकारी, पोलीस, बॉडीगार्ड यांचा गोंधळ आणि आवाज यामुळे उपचार घेत असलेल्या मुलांची मात्र अक्षरशः झोप उडाली. शिक्षणमंत्र्यांचा हा कसला दौरा अशी एकच चर्चा आज दिवसभर सुरू होती.
दीपक केसरकरांचा हा कसला दौरा?
विचित्र उग्र वास येत असतानाही कळव्याच्या सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत शिकणाऱ्या 40 विद्यार्थ्यांना मंगळवारी मटकीची आमटी जेवणात दिली. त्यानंतर काही वेळेतच मुलांना प्रचंड त्रास सुरू झाला व त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयास उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस व अन्य आरोग्य कर्मचारी औषधोपचारामध्ये व्यस्त होते. मात्र मध्यरात्री दोनच्या सुमारास शिक्षणमंत्री दीपक केसरकर रुग्णालयात फक्त ‘पाहणी’ करण्यासाठी आले. त्यामुळे बेडवर झोपलेल्या मुलांना आवाजामुळे उठून बसावे लागले. केसरकर कोणतेही आदेश वगैरे न देता फक्त थातूरमातूर पाहणी करून निघून गेले. दरम्यान 32 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. अन्य 12 मुलांना ताप असल्याने त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.
शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांची धाव
शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर व महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी कळवा रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट व डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांची भेट घेऊन उपचारासंबंधी चर्चा केली. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून राहणार असल्याची माहिती डॉ. राकेश बारोट यांनी दिली. यावेळी आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक प्रशांत भुइंबर, ठाणे जिल्हा समन्वयक एकनाथ अहिरे, जिल्हा आरोग्य सहसंघटक राजेंद्र शिंदे, शहर आरोग्य सहसचिव अक्षता पांचाळ, ओवळा-माजिवाडा समन्वयक सचिव अजिम शेख, रोहित भायजे, अर्चना बागवे, प्रकाश मोहिते, तेजस विचारे आदी उपस्थित होते.
शिवसेनेने विद्यार्थ्यांची केली विचारपूस; अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे व ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी कळव्यातील पदाधिकाऱ्यांसह रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, तसेच त्यांची विचारपूस केली. विद्यार्थ्यांसाठी कोणतीही मदत लागली तर आम्हाला कळवा असे ज्योती ठाकरे यांनी डॉक्टरांना सांगितले. याचवेळी त्यांनी शिक्षणाधिकारी मेहेत्रे यांना फोन केला आणि त्यांची झाडाझडती घेतली. मेहेत्रे यांनी शाळेच्या व्यवस्थापनानेच हे कंत्राट दिल्याचे सांगितले. त्यावर ठाकरे यांनी कंत्राटदार कुणाचाही असो, त्यावर शिक्षण विभागाचा वचक असलाच पाहिजे असे ठणकावून सांगितले. शाळा व्यवस्थापनाशीही त्यांनी चर्चा केली आणि यापुढे अशी चूक घडणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सूचनाही दिल्या.
शाळा प्रशासनावर गुन्हा
विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये झालेल्या विषबाधेप्रकरणी संतप्त पालकांच्या तक्रारीनंतर आज सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ज्यांनी हा पोषण आहार पुरवला त्या संस्थेवरदेखील गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोषण आहार जिथे बनवला जात होता त्या ठिकाणाला एफडीआयने सील ठोकले असून अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात येणार आहेत.