फी न भरणाऱया विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट रोखता येणार नाही, शाळेविरोधात कारवाई करण्याचा बोर्डाचा इशारा

बोर्डाची परीक्षा देण्यापासून एकाही विद्यार्थ्याला वंचित ठेवता येणार नाही. तसेच फी न भरणाऱया विद्यार्थ्यांचे हॉलतिकीटही रोखता येणार नाही. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे अशा तक्रारी आल्या असून संबधित गट शिक्षण अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देणे अपेक्षित आहेत. मात्र एखादी शाळा विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित ठेवत असेल तर संबंधित शाळेविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिला आहे.

यंदा बारावीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची संख्या 56 हजार 616 ने वाढली आहे. यंदा 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा पेंद्रांवर बैठे पथक ठेवण्यात आले आहे. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाकडूनही परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. दिलेल्या वेळेनंतर परीक्षा पेंद्रावर न येणाऱया विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे शरद गोसावी म्हणाले.

कॉपी रोखण्यासाठी बोर्डाचा पायलट प्रोजेक्ट
परीक्षेवेळी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एका पायलट प्रोजेक्टवर काम करीत आहे. जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱया परीक्षेपासून प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले. पुरवणी परीक्षेची विद्यार्थी संख्या कमी असते. त्यामुळे कोणताही बदल करताना त्याची अंमलबजावणी करणे सोपे जाते, असेही गोसावी म्हणाले.