
नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीमध्येच बंडखोरी झाल्याने शिंदे गट आणि भाजपच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे नाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून सुरू आहेत. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रसाद हिरे यांनी नरेंद्र दराडे यांना आज आपला पाठिंबा जाहीर केला.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी १८ जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत नाशिक मतदारसंघाची जागा शिंदे गटाला सुटलेली असताना भाजपच्या गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने शिंदे गटाचे उमेदवार दराडे चांगलेच अडचणीत आले आहेत. दुसरीकडे जळगावमध्ये शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी भाजपच्या नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस उलटून गेल्यानंतरही महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
महाजन यांच्या सांगण्यावरून माघार
दराडे यांच्या विरोधात मंत्री गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून आपण अर्ज दाखल केला. माघारीबाबत महाजन यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कोणत्याही सूचना नाहीत असा गौप्यस्फोट प्रसाद हिरे यांनी रविवारी केला होता. त्यांनंतर हिरे यांनी आज महाजन यांच्या सांगण्यावरून निवडणुकीतून माघार घेत दराडे यांना पाठिंबा जाहीर केला.
नाशिकचा प्रश्न सुटला की जळगावचा सुटेल – महाजन
आमचे दोन्ही उमेदवार मागे घेणार हे सुरुवातीपासून सांगत होतो. प्रसाद हिरे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे त्यांनी दराडे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. नाशिकचा प्रश्न मिटला की जळगावचा प्रश्न सुटेल. गोकुळ गिते यांच्यासोबत फोनवर चर्चा सुरू आहे, लवकरच त्यांचा निर्णय होईल, असे गिरीश महाजन म्हणाले.

























































