आता टेन्शन ईदचे! नमाज पढण्यासाठी होणारी गर्दी कशी टाळायची… सोशल डिस्टन्स इन बंधन कसं राखायचं…

1477

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे यामुळे मागील दीड महिन्यांपासून देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत वाढवला गेला आहे. यातच येत्या चोवीस मे रोजी मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची सांगता होणार आहे. कोरोना सारख्या भयंकर आजाराचे सावट सर्वत्र असताना ईद कशी साजरी होणार याचे टेन्शन सरकारी यंत्रणेपासून पोलीस प्रशासनाला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण रमजान पर्व यंदा जेमतेम उत्साहात पार पडले. बाजारपेठा फारशा गजबजलेल्या दिसल्या नाहीत. मात्र इस्लामी संस्कृतीचा महान सण म्हणून ओळखला जाणारा ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद निमित्त मुस्लिम श्रद्धाळू विशेष नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने दरवर्षी घराबाहेर पडतात. रमजान ईद निमित्त आयोजित नमाज पठणाच्या पारंपरिक सोहळ्याला असणारे विशेष महत्त्व लक्षात घेता या वेळी होणारी गर्दी कशी टाळायची, सोशल डिस्टन्सिंगचे बंधन कसं राखायचं याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, हनुमान जयंती निमित्त सार्वजनिक स्तरावर होणारे आयोजन टाळून ज्याप्रकारे लोकांनी सहकार्य केले तसेच सहकार्य रमजान ईद,पालखी सोहळा, गणेशोत्सव आदी धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने करावे असे आवाहन केले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच पोलिसांना थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रमजान पर्व काळात सर्व समाज बांधवांनी संयम, सदाचार कायम ठेवत पोलिस प्रशासनाला सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य ईदनिमित्त करावे. यानंतर येणारा पालखी सोहळा, गणेशोत्सव यासारख्या धार्मिक उत्सवाचे सार्वजनिक स्तरावर होणारे आयोजन टाळून सण आणि उत्सवांच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीवर सर्वांनी नियंत्रण ठेवावे ही शासनाची भूमिका आहे- अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र

ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून गर्दी टाळण्यासाठीच देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. धार्मिक स्थळे बंद असल्याने रमजान ईद निमित्त आयोजित खास नमाज पठणाच्या पारंपरिक सोहळ्यावरही बंधन आले आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील प्रमुख धर्मगुरु आणि उलेमांनी देखील अगदी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार आणि विविध राजकीय पक्षांकडूनही कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी ईद निमित्त गर्दी न करण्याचे आवाहन मुस्लिम बांधवांना करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या