नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पातील बोगद्यात भीषण अपघात

22

सामना ऑनलाईन । भिगवण

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पातील बोगद्यातून वर येत असताना २०० फुटांवरून क्रेनचा वायरोप तुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दहा कामगार ठार झाले. तावशी ते डाळजदरम्यान इंदापूरजवळील अकोले गावात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यातील बहुतांशी कामगार आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेशातील आहेत. भिगवण पोलीस प्रशासनाच्या मदतीने मृतदेह काढण्यात आले.

बलराम स्वॉन, सुशांत पंढी, राहुल सुग्रीव नरुटे, मुकेश कुमार, अवेश सिद्धारेड्डी, समभांगी नायडू अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे असून इतरांची नावे समजू शकली नाहीत. २०० फूट खाली क्रेन ट्रॉली पडल्याने कामगारांच्या डोके, हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

– काय आहे नीरा-भीमा नदीजोड प्रकल्प
नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम तावशी ते डाळज या २४ किलोमीटर अंतराच्या सहा टप्प्यांत सुरू आहे. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर जमिनीवरून सुमारे २०० फूट खोल खाली बोगद्याद्वारे मशीनच्या सहाय्याने खोदाई सुरू आहे. प्रस्तावित कामासाठी ३०० कामगार काम करीत असून जेसीबी मशीन, मालवाहतूक करण्यासाठीची वाहने यांच्या सहाय्याने काम सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या